| मुंबई | श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण दिले जाणार आहे. येत्या ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन सोहळा होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह निवडक ३०० जणांना निमंत्रण पाठवण्याची तयारी सुरू आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंचे नाव आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
कोरोनाचे संकट असताना अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळा होत असल्याने रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीकास्त्र सोडले होते. राम मंदिर बांधून कोरोना जाईल असे भाजपवाल्यांना वाटत असेल तर हरकत नाही, अशा शब्दांत पवारांनी टीका केली होती. भूमिपूजनाच्या मुद्द्यावरून भाजप व महायुतीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घेरले आहे.
भूमिपूजनाचे निमंत्रण पाठवण्यामागे आहेत ही कारणे
• सन १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडली होती त्या वेळी “ते जर शिवसैनिक असतील तर त्याचा मला गर्व आहे’ अशा शब्दांत त्याची जबाबदारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती. बाबरी पतन खटल्यातही शिवसेनाप्रमुखांचे नाव होते.
• जुलै २०१९ मध्ये उद्धव ठाकरे परिवारासह अयोध्येत शिवसेनेच्या सर्व खासदारांना घेऊन गेले हाेते. राज्यात सत्ता स्थापनेस १०० दिवस झाल्यावर ते दुसऱ्यांदा अयोध्येला गेले होते. तसेच शिवसेनेच्या वतीने मंदिर न्यासाला ५ कोटी देणगी देण्यात आली आहे.
• भाजपबरोबरील युती तुटल्यानंतर शिवसेना राम मंदिर मुद्द्यावर मोदी व भाजपला टोकत होती.
• महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे महाराष्ट्रात सत्तेत असल्याने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेची राजकीय कोंडी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले जाते. अयोध्येतील उपस्थितीवरून आघाडीत वितुष्ट येऊ शकते असा त्यामागे होरा आहे.
विविध नेते आणि त्यांच्या प्रतिक्रिया :
• पवारांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे गप्प का ? शरद पवार यांनी हिंदू समाजाच्या श्रद्धेचा अपमान केला आहे. त्यांच्या वक्तव्यावर स्वत:ला हिंदू म्हणवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गप्प का आहेत, असा प्रश्न ‘शिवसंग्राम’चे नेते विनायक मेटे यांनी केला आहे.
• भूमिपूजन सोहळ्यासाठी पवारांची ‘एनओसी’ लागणार नाही ही अपेक्षा
अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांचे ना-हरकत प्रमाणपत्र लागणार नाही अशी अपेक्षा आहे. – प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, भाजप
• हिंदुत्व अजिबात सोडलेले नाही, हे सांगण्यासाठी शिवसेनेची धडपड
काँग्रेस-राष्ट्रवादी या धर्मनिरपेक्ष पक्षांबरोबर राज्यात सरकार स्थापन केले असले तरी हिंदुत्व अजिबात सोडलेले नाही, हे सांगण्याची धडपड शिवसेना करत आहे. मात्र मंदिराचा मुद्दा हातून गेल्याने शिवसेनेची गोची झाल्याचे मानले जाते. – राजकीय विश्लेषक
• राम मंदिर-शिवसेनेचे नाते राजकीय नव्हे अतूट, कायम
राम मंदिर आणि शिवसेनेचे नाते अतूट आणि कायम आहे. हे काही राजकीय नाते नाही. राजकारणासाठी आम्ही कधी अयोध्येला जात नाही. श्रद्धा आणि हिंदुत्व या भावनेतून शिवसैनिकांनी राम मंदिरासाठी बलिदान केलेले आहे. अयोध्येच्या रस्त्यातील सर्व अडथळे शिवसेनेने दूर केले आहेत. – संजय राऊत, खासदार-प्रवक्ते, शिवसेना
• अयोध्येला जाणे हा उद्धव ठाकरेंच्या श्रद्धेचा विषय
कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याने जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी मोदी सरकारकडून राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्यास तो त्यांच्या श्रद्धेचा विषय आहे. – बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .