संपादकीय : ओबीसी तथा बहुजन चळवळीमधील आत्मघाती विचार !

बहुतेक सामाजिक किंवा जातीय चळवळीमध्ये एक अत्यंत धोकादायक विचार नेहमीच मांडला जातो. तो असा की, ‘पक्ष कोणताही असो, पण आपला माणूस निवडून आला पाहिजे..!’

आणि ह्यात नवोदित कार्यकर्ते जसे असतात, तसेच फुले, शाहू, आंबेडकर या महापुरुषांचे अनुयायी म्हणवून घेणारे लोक देखील असतात. शिवाजी महाराजांचे भक्तही असतात. तर तुकाराम महाराज, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांच्या नावाचा अखंड जप करणारे आणि समाजाला नियमित डोज पाजणारे तुफानी वक्ते, विचारवंत लोकही आघाडीवर असतात. हे भयानक आहे. याचाच अर्थ असा की, ह्या लोकांचे राजकीय, सामाजिक आकलन तरी कमी असले पाहिजे किंवा हे लोक ढोंगी तरी असले पाहिजेत.

मुळात हा विचार अतिशय चुकीचा आहे. ही सरळ सरळ समाजाची दिशाभूल आहे. खरं तर, सरकार कुणाचं आहे, पक्ष कुणाचा आहे आणि त्या पक्षाची मूळ भूमिका नेमकी कोणती आहे, यावरच सारं अवलंबून असते. पक्षाची धोरणं लोकप्रतिनिधीना उचलून धराविच लागतात. जर त्यांनी पक्षाच्या मूळ भूमिकेला विरोध केला, तर लगेच ते ब्लॅक लिस्ट मध्ये जातात ! आणि राजकारणातील लोक तेवढे येडपट मुळीच नसतात. त्यामुळे त्यांना पक्षाच्या धोरणाचा पुरस्कार करावाच लागतो, उलट त्यातच त्यांना धन्यता वाटत असते ! त्याशिवाय त्यांना मोठी पदं किंवा पुढील निवडणुकीत तिकीट कसं मिळणार ?

सुरुवातीला मंडल आयोगाचे समर्थक असलेले तेव्हाचे धडाकेबाज शिवसेना नेते छगन भुजबळ यांना मंडल आयोग प्रकरणी रातोरात कसा ‘यु टर्न’ घ्यावा लागला होता, हा इतिहास समजून घेण्यासारखा आहे. त्यामुळे जात आणि निवडून येणं ह्या गोष्टी महत्वाच्या नाहीत. त्या व्यक्तीची त्या त्या प्रश्नाच्या बाबतीत कमिटमेंट किती पक्की आहे, तत्वासाठी त्याग करण्याची किती तयारी आहे, ही गोष्ट महत्वाची आहे ! यासाठी उदाहरणच द्यायचं झालं, तर..
• शाहू महाराज कोण होते ? ते मागासवर्गीय होते का ?
• बाबासाहेब ओबीसी होते का ?
• वीपी सिंग ओबीसी होते का ?
• अर्जुन सिंग ओबीसी होते का ?
तेव्हा आपण उगाच असल्या जातीपातीच्या भ्रमात न राहिलेलं बरं !

…आणि शिवाय जसा गाजावाजा केला जातो त्याप्रमाणे.. मग..
• मोदी हे तर ओबीसी आहे म्हणतात..किंवा ते कागदोपत्री तरी ओबीसी नाहीत का ?
• मुनगंटीवार ओबीसी नाहीत का ?
• खडसे ओबीसी नाहीत का ?
• तावडे ओबीसी नाहीत का ?
• बावनकुळे ओबीसी नाहीत का ?
• पंकजा मुंडे ओबीसी नाहीत का ?
मग हे लोक ओबिसीची जनगणना व्हावी यासाठी का बोलत नाहीत ? पक्षावर दबाव का आणत नाहीत ? सत्ता तर त्यांचीच आहे ना ? की आपण ह्यांच्यापेक्षा आणखी मोठे असे कोणते लोकप्रतिनिधी निवडून आणणार आहोत ?

तेव्हा मित्रांनो,
• उगाच भ्रमात राहू नका.
• लोकप्रतिनिधी आपल्याशी गोडगोड बोलला, आपल्याला फोटो वगैरे काढायला मिळाला, त्यावर हुरळून जावू नका. ( अलीकडे हे लोक सर्वांनाच ताई, भाऊ म्हणून बोलत असतात. पण खाजगीत मात्र तुमची, तुमच्या चळवळीची टवाळी करत असतात, एवढं लक्षात घ्या. )
• पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका त्याला घेता येत नाही, हे कटू सत्य आहे, याचा विसर पडू देवू नका.
• पक्ष असो की लोकप्रतिनिधी धोरणात्मक प्रश्नावर त्यांची करणी आणि कथनी काटेकोरपणे तपासून बघा. त्यानंतरच त्याच्यावर विश्वास ठेवा.
• बहुतेक नेत्यांची डायलॉगबाजी किंवा जाहीर सभेत केलेल्या घोषणा ह्या ९५ टक्के बकवास असतात. त्यावर विश्वास ठेवू नका.
• सरकारकडे मागणी करणं, हे काम विरोधी पक्षात असताना फार सोपं असते. पण ते त्यांच्या पक्षाच्या प्लॅटफॉर्म वर किती गंभीरपणे मांडतात, हे महत्वाचं आहे. आणि पक्ष जर अनुकूल नसेल, तर तो पक्षाच्या भूमिकेला विरोध करतो का हे बघायला हवं. अन्यथा राजकारणी लोक नौटंकी करण्यात वस्ताद असतात, हे लक्षात ठेवा.

तात्पर्य काय,
आपल्याला आपला उद्धार व्हावा असं वाटत असेल..तर..
• स्वतंत्र भूमिका घ्यायला शिका.
• स्वतःच्या विचाराशी एकनिष्ठ असलेला वेगळा राजकीय पर्याय तयार करा. चळवळ आणि दबाव, असल्या गोष्टी आजकाल कुणीही ऐकत नाहीत. तो काळ आता संपला. तेव्हा लौकरात लौकर त्या भ्रमातून बाहेर या.
• सद्याचे प्रस्थापित पक्ष आपल्या कामाचे नाहीत, हे नीट लक्षात घ्या. त्यासाठी नीट अभ्यास करा.
• कुणावरही आंधळे पणानं विश्वास ठेवू नका.
• स्वतःही फसू नका, समाजालाही फसवू नका.
• मात्र तरीही तुम्हाला राजकारण करायचं असेल, तर तो तुमचा अधिकार आहे. खुशाल तुमच्या आवडीच्या पक्षात जा. तिकडे मोठे व्हा. स्वतःचं, कुटुंबाचं कल्याण करा. पण कृपया समाजाचं भलं करण्याचा आव आणू नका.
• या भूमिकेवर गंभीरपणे विचार करा. चिंतन करा. पटत नसेल तर, स्पष्टपणे विरोध करा. कारण तो तुमचा अधिकार आहे. आम्ही त्याचे स्वागतच करू !
• मात्र.. पटत असेल तर कृती करा. स्वतःपासून सुरुवात करा. जिथे असाल तिथून सुरुवात करा. किंमत मोजायला तयार व्हा.
• जगात सामान्य माणसांनीच इतिहास घडविला आहे, याची जाणीव ठेवा. ( ..आणि आणखी एक.. कृतिविना उगाच तोंडदेखली तारीफ करण्याचं टाळा. तुमचाही वेळ वाचेल, प्रामाणिक कार्यकर्त्यांचाही वेळ वाचेल..)
असो..

– ज्ञानेश वाकुडकर, अध्यक्ष, लोकजागर अभियान ( अतिथी संपादक )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *