आमच्या आयुष्याशी खेळत आहात हे पुरेसे नाही का सारख्या असंख्य नाराजीच्या कमेंट्स सह मोदींच्या मन की बात वर डिसलाईकचा धुवांधार पाऊस..!

| मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी ‘मन की बात’मधून देशवासीयांशी संवाद साधला. लोकलसाठी व्होकल व्हा, याचा पुनरुच्चार मोदींनी केला. खेळण्यांच्या निर्मितीत देशाला अग्रेसर होण्याची संधी आहे. त्यामुळे यासाठी स्टार्टअप्स कंपन्यांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहनही मोदींनी केलं. मात्र मोदींची ‘मन की बात’ बहुसंख्यांना पटलेली दिसत नाही. भाजपच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवरील आकडेवारीतून ही बाब अधोरेखित झाली आहे.

पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’मधून त्यांचे विचार मांडले. भाजपनं त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनवरून ‘मन की बात’चा व्हिडीओ शेअर केला आहे. सध्याच्या घडीला (१ सप्टेंबर सकाळी ९ वाजेपर्यंत)४० लाख जणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. आतापर्यंत १.८ लाख लोकांनी व्हिडीओ लाईक केला. तर डिसलाईक करणा-यांची तब्बल संख्या ८ लाख ८० हजार इतकी आहे. म्हणजेच डिसलाईक करणा-यांचं प्रमाण आठपट आहे.

मोदींच्या ‘मन की बात’वर अक्षरश: डिसलाईक्सचा पाऊस पडला आहे. कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी मोदींच्या ‘मन की बात’बद्दल स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. या व्हिडीओवर १ लाख ५० हजार कमेंट्स आल्या आहेत. यातल्या ८०% कमेंट्स नकारात्मक आहेत.

आमच्या आयुष्याशी खेळत आहात, ते कमी आहे का की आता यांना आणखी खेळणी हवी आहेत?, मोदींना निवडून दिलं हीच आमची चूक आहे. ती २०२४ मध्ये दुरुस्त करू, २०१९ मध्ये तुम्हाला मतदान केलं, याचं दु:ख वाटतं, शेतक-यांच्या पिकांचं नुकसान झालंय आणि हे मन की बात करताहेत, रोम जळत असताना निरो गिटार वाजवत होता आणि भारतीय मरत असताना मोदी मन की बात करताहेत, अशा कमेंट्स मन की बातच्या खाली आल्या आहेत.

दरम्यान या प्रकरणावर राहूल गांधी यांनी परीक्षेवर चर्चा होणे गरजेचे होते असे म्हंटले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’मध्ये नीट, जेईई परीक्षेच्या मुद्यावर बोलतील, अशी विद्यार्थ्यांना आशा होती; परंतु पंतप्रधान खेळण्यांवर बोलले, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवर व्यक्त केली आहे. ‘मन की नहीं स्टुडन्ट की बात’ अशा हॅशटॅगचा वापर करून राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले की, पंतप्रधान ‘परीक्षा पे’ चर्चा करतील, अशी जेईई, नीट परीक्षार्थींना आशा होती; परंतु पंतप्रधानांनी ‘खिलौने पे’ चर्चा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *