कल्याण:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनचा नागरी विकासकामांवर परिणाम होण्याची भिती व्यक्त होत असताना कल्याण-डोंबिवलीकरांसाठी एक सकारात्मक माहिती समोर आली आहे. कल्याण-डोंबिवलीकरांच्या वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असणाऱ्या नविन पत्रीपुलाचे काम पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहे. 5 दिवसांपूर्वीच पत्रीपुलाचे काम पुन्हा सुरू झाल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्याभरापासून संपूर्ण देशासह महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. तसेच संपूर्ण शासकीय, निमशासकीय यंत्रणा, खासगी, सामाजिक संस्था या कोरोनाशी दोन हात करताना दिसत आहेत. तर या लॉकडाऊनचा परिणाम अनेक महत्वाच्या विकासकामांवरही होताना दिसत आहे. त्यातही विशेष करून पायाभूत सुविधांची सुरू असणारी कामांवर याचा सर्वाधिक परिणाम जाणवत आहे. कल्याणातील वाहतूक सोडवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आणि संवेदनशील बनलेल्या पत्रीपुलाचे कामही कोरोनामुळे प्रभावित झाले होते.
मात्र सध्याचा लॉकडाऊन, मोकळे असणारे रस्ते आणि बंद असणारी रेल्वे वाहतूक ही पुलाचे काम गतीने होण्यासाठी अनुकूल अशीच आहे. त्यामुळे 5 दिवसांपूर्वीच याठिकाणी आवश्यक त्या गतीने हे काम पुन्हा सुरू झाल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.
कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम अशा दोन्ही बाजूने हे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच हे काम करणारे इंजिनिअर, कर्मचारी आपापल्या आरोग्याची योग्य ती खबरदारीही घेत असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले. या पुलासाठी नेहमीच खासदार डॉ श्रीकांत शिंदे आग्रही होते.. गर्डरच्या कामाची पाहणी करायला ते थेट हैदराबाद पर्यंत पोहचले होते. खऱ्या अर्थाने खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे आणि स्थानिक नागरिक यांना या वातावरणात दिलासा देणारी ही बातमी आहे हे नक्की..!