विशेष लेख : नगरी भाषा – अफलातून आणि राकट बोली भाषा..!


मी ही तसा मूळ , नगर जिल्ह्यातला ! नगर म्हणजे अहमदनगर ! तसे महाराष्ट्रात नगर म्हणलं की अहमदनगर असे वेगळं सांगायची गरज पडत नाही . 

मराठी भाषा आपण नेहमीच म्हणतो की जशी वळेल तशी वळते , पण त्यातल्या त्यात आमची नगरी भाषा तर खूपच वेडी-वाकडी वळणे घेते असे मला वाटते . भाषा म्हणजे म्हणजे आपल्या पूर्वजांनी आपल्याला सोपविलेला अमूल्य असा वारसा असतो , आणि ही संपत्ती आपल्याला फुकटच मिळते ..त्यामुळे ही संपत्ती पुढच्या पिढीला देणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे . ते हिंदीत धरोहर म्हणतात तसेच काहीसे आपली मातृभाषा म्हणजे आपले धरोहरच असते .

आज मी तुम्हाला या नगरी शब्दांच्या अदभुत प्रदेशाची सफर घडविण्याचा प्रयत्न करतो, मला आशा आहे तुम्हाला ते नक्कीच आवडेल .

ही नगरी भाषा तशी इतर महाराष्ट्रीय लोकांना बरीच गावंढळ वगैरे वाटते , पण तिचे आपले एक स्वस्वरूप आहे जे फार रूपवान नसले तरी रोखठोक आहे . तिच्यात प्रांजळ पणा च्या पुढची स्टेप अशी ती स्पष्टता आहे . त्यामुळे प्रथम आम्ही नगरी लोक काही साधे साधे जरी बोलतो तर कधी कधी बाकीच्यांना दुखवल्यासारखे वाटते .त्याला आमचा नाईलाज आहे ..

एखाद्याला खूप मारला याला किती प्रकारे आम्ही सांगतो बघा ‘ मोक्कार मारला ‘ , चिक्कार चोपला ‘ , ‘ निब्बार हाणला ‘, बेक्कार बुकलला ‘ ‘ बेक्कार धुतला ‘ किंवा , ‘ मोक्कार पिसला’ ( पत्ते खेळताना आपण ते एकमेकांवर पिसतो तिथून हा शब्द आलाय) ‘ खरे तर ज्याने मारले त्याने एकदोनच फटके मारलेले असतात पण तो तो त्याच्या मित्रांना सांगताना असे वरील अनेक वाक्ये वापरून वाढवून – चढवून सांगतो.

आता थोडे खाणे ,पिणे वा किचन च्या कडे वळतो . चतकोर (२५ % ) भाकरी ला शब्द बघा , ‘ चोखंड भाकर ‘ , ‘ कोरभर भाकर ‘ एखाद्याला प्रेमाने जेवला का विचारायचे असेल तर , ‘ खावला का ‘ , तेच रागाने विचारले , ‘ गिळले का फुकटचे ‘ ( म्हणजे तेच काहीही काम न करता आयते बसून खाल्ले का ? ) . पातळ भाजीला , ‘ कालवण ‘ काही ठिकाणी , ‘ कोरड्यास ‘ .. एखादी भाजी तिखट झाली तर त्याला , ‘ कालवण लै चिखाट झालं ‘ असे म्हटलं की जिभेला त्याचा झणझणीत पणा येतोच . ज्याला बाकीचे धिरडे म्हणतात तिकडे नगरला त्यालाच बेसन चपाती म्हणतात .बुकणी किंवा फकी म्हणजे चहाची पावडर ..शाबुचे तांदूळ म्हणजे साबुदाणा ..रॉकेल ला घासलेट … ज्वारीला जवारी …लै गूळचाट (म्हणजे खूप गोड ) .. टामटे म्हणजे टोमॅटो ….किचन मधील चिमटा म्हणजे सांडशी .. असे किती शब्द .

लई हा शब्द नगरकडे लै ( लैला मजनू मधला लै ) असा उच्चार होतो . तसा ‘ खूप ‘ या अर्थाने हा शब्द मराठी भाषेत लई म्हणून बोलतात .

सहजगत्या रोजच्या भाषेत ( बोली भाषेत ) बोलली जाणारी वाक्ये पहा , ‘ तुला काय धाड भरली का ?’ , म्होरच्या दारी (म्हणजे पुढल्या दारात )
‘ वाढूळू चा ढुंढळू राह्यलोय ना तुला ‘ ( म्हणजे कधीचा शोधतोय तुला ) , ‘ कुढ चालला ‘ , कायला घेतो ‘ कामून ( का म्हणून ) , ‘ नदीच्या वरल्या आंगाला , नदीच्या खालल्या आंगाला ‘ , ‘ येरवाळी गाठ घे , तू माही , मग सांगतो ‘ , ‘ काय घंगाळे कपडे घातले रे ( म्हणजे किती loose कपडे घातले ) , ‘ काय राव तुमी बी ना काय पण बोलताय ‘ ( हा राव शब्द बऱ्याचदा आदरार्थी येतोच) अशी आणू अजून बरीच वाक्ये नगरी भाषेचा uniqueness आहे .

आता जी आमच्या नगरकर जातीला अभिमान आहे ते म्हणजे शिव्या ..नगरी शिव्या म्हणजे खऱ्या अस्सल शिव्या आहेत हे आम्ही अभिमानाने व छातीठोकपणे सांगतो … शिव्या अशाच पाहिजे की आपण ज्याला देतोय त्याला राग आलाच पाहिजे नाही तर त्या शिव्या , शिव्याच कसल्या ? च्यायला , च्यामायला ह्या प्रचलित शिव्या मराठी भाषेला आमच्याच नगरचे देणं आहे . एखाद्याला टोचून बोलायचे असेल तर, चिडवायचे असेल तर किती समृद्ध शब्दभांडार आहे बघा , ‘ फुकणीच्या ‘ , ‘ बाराच्या ‘ , ‘ भंगरी ‘ (भंगार पेक्षा अधिक भंगार ) , ‘ बेण्या ‘ ( म्हणजे अगदीच टुकार पोरगं ) , ‘ बावळाट ‘ ( बावळट पेक्षा जास्त बावळट ) , ‘ बिनडोक ‘ , ‘ लेका’, ‘ भडवीच्या’ , ‘ गधडीच्या ‘ , ‘ कुपितार ‘ ( म्हणजे येडा माणूस) या झाल्या शब्दाने द्यायच्या शिव्या . हेच जर भांडण जास्त हमरीतुमरीवर आले तर वाक्यात द्यायच्या शिव्या बघा तरी , ‘ जा तिकडं काशी घाल तुझी ‘ , थोबाड घेऊन कुठं निघला’ , ‘ एखादी बाई एखाद्या टुकार पुरुषाला सहज शिवी देते , ‘ मुडदा बसविला तुझा ‘ , नाही तिथे जो नाक खुपसतो त्याला, ‘ नाघाण दुसऱ्याचे शेण खायची सवें (सवय) हाय त्याला ‘ ह्या शिव्या आम्हा नगरी लोकांच्यात रोजच्या प्रचलित असतात . ..यातल्या बऱ्याच शिव्या आम्ही गमतीने पण हाणतो (म्हणजेच म्हणतो बरं का ) सहजगत्या एकमेकांना …

घरातील व बाहेरच्या नात्यांना पण शब्द आहेत . जसं बापाला म्हातारं , आईला म्हातारी ( हे आईबाप कितीही तरुण असले तरी ते म्हातारा-म्हातारी च )अर्थात हे शब्दप्रयोग मित्रांमध्ये बोलताना सर्रास वापर होतात … आत्याला ‘ माळवन ‘ तर् बहिणीला एकदम, ‘ भन ‘ असा शॉर्टकट् …भावाला ‘ भावड्या ‘ तर असे या नात्यांना respect bispect काही नाही ( हे असे दोन शब्द जोडताना मध्ये बी ( bi ) लावायची पद्धत ही नगरीच बरं का ! )

व्यक्तीच्या स्वभाव नुसार त्याला उद्धेशुन पण त्याच्या तोंडावर नाही तर त्याच्या मागे बोलताना बघा आमच्या या नगरी भाषेने काय बहार उडवून दिलीय , गावाकडे पूर्वी राजदूत कंपनीची फटफटी (हा ही two wheeler ला समानार्थी नगरी शब्द) ज्याच्याकडे असायची पण त्याला पेट्रोल परवडत नसेल तर तो गाडीत रॉकेल घालून फिरायचा त्याला गावातले सगळे ‘ रॉकेल पाटील ‘ म्हणून चिडवायचे . एखादं म्हातारं वाया गेलेलं असेल तर , ‘ म्हातारं लै डंगरी हाये ‘ असे म्हणायचे …एखादा मुलगा/माणूस सारखाच गोंधळलेला असेल तर त्याला ‘ गणगण ‘ … किन्नर ( खरे तर हा शब्द cleaner आहे ) म्हणजे ट्रक च्या ड्रायव्हर बरोबर त्याचा साथीदार असतो तो … कझाक म्हणजे भांडकुदळ बाई … झिंगेल म्हणजे दारू पिऊन ज्याला चढली आहे असा… ठोली म्हणजे जाड किंवा लठ्ठ मुलगी वा जाडीमुळे आळशी झाली अशी …
‘ चबढब्या ‘ म्हणजे हुशार , स्मार्ट माणूस ज्याला छक्के पंजे लगेच समजतात व दुसऱ्याने फसवायच्या आधीच ओळखून त्यालाच कुठेतरी फसवितो (म्हणजे गावाकडे जो दुसऱ्याला फसविण्यात मास्टर आहे असा तो म्हणजे चबढब्या) 
याचा अर्थ असा की गावाकडे प्रत्येकाला दुसऱ्या ला फसवायची बहुधा एक आंतरिक इच्छा असते , पण हे सगळ्यांना जमत नाही , आणि ज्याला ते जमते तो म्हणजे ‘ चबढब्या ‘ असो ‘ चबढब्या ‘ प्रकरण फारच लांबले ..

आता वेगवेगळ्या वस्तुंना/ शरीर अवयव/ इ यांना कसे शब्द दिलेत या भाषेने बघा ….
खेटर म्हणजे चप्पल …तंगड्या म्हणजे पाय …लेंघा म्हणजे पायजमा …बारी म्हणजे खिडकी … पायताण म्हणजे पण चप्पलच (पण इथे खेटर पेक्षा कदाचित चांगल्या quality च्या चप्पल ) … मुंडासे ( डोक्यावर असलेले पागोटे किंवा फेटा ) …घासलेट (रॉकेल) टाऊक ( म्हणजे खाऊ , बऱ्याचदा बाजारातून आणलेली भेळ ) , हाच टाउक शब्द कुणी सारखाच एखाद्याच्या मागावर ( followup ) असेल तरी वापरतात . .. सुईचं म्हणजे सरळ आणि उरफाटे म्हणजे उलटे .. जित्रब ( म्हणजे जनावर जसे गाई , म्हशी , शेळ्या इ , काही ठिकाणी याला जित्राब ही म्हणतात ) …
लंगार म्हणजे खूप मोठे …

असे किती शब्द सांगू अन किती नाही . एखादी किरकोळ वस्तू नकळत चोरणे याला, ‘ ढापणे ‘ म्हणतात तर एखादी वस्तू बाजारात विकणे याला , ‘ वपणे ‘ म्हणायचे …
काही वेळा हे शब्द खूप सोप्पे रूप घेऊन येतात तर काही वेळा कोंडीत पकडतात .
शेताला ‘ वावर ‘ हा खूप सुंदर व अर्थपूर्ण शब्द आहे .म्हणजे ज्या भागात माणसाचा (शेतकऱ्याचा ) कायम ‘ वावर’ असतो ते म्हणजे वावर वा शेत . शेताला नगरच्या काही तालुक्यांत ‘ रान ‘ ही म्हणतात …. ढवळा (म्हणजे पांढरा रंग) … चिरगुट म्हणजे चिंधी …हाच चिरगुट शब्द एखाद्या किरकोळ शरीरयष्टी असलेल्या बद्दलही येतो … वर यंगणे म्हणजे वर चढणे … चम्मन गोटा करणे म्हणजे टक्कल करणे .. मच्कळा होणे म्हणजे विचका वा बेरंग होणे .. यंधळा म्हणजे वेंधळा( गोंधळून गेलेला) …
म्या इध ठुल व्हतं ( मी इथे ठेवलं होतं) हे तर अस्सल नगरी व ग्रामीण ढंगाचे वाक्य आहे.

अजून बरेच काही लिहता येईल एव्हडे शब्द या माझ्या नगरच्या भाषेत आहेत ..हा लेख लिहण्याचा अजून एक हेतू आहे की शहराकडे नोकरी वा धंद्याच्या निमित्ताने आलेल्या काही जणांना या आपल्याच नगरी मातृभाषेची लाज वाटते . तर त्यांना सांगणे आहे की लाज नका बाळगू तर अभिमान बाळगा व ही संपत्ती आपल्या पुढच्या पिढीबरोबर मुक्तहस्ते वाटा .

 हेमंत सांबरे
( हा लेख मी बऱ्याच मित्र , नातेवाईक इ च्या सहकार्याने लिहला आहे , त्यांचे विशेष आभार , व हा लेख त्यांनाच समर्पित आहे)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *