महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची याचिका कोर्टाने कडक ताशेरे ओढत फेटाळली..!

| मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरण हाताळण्यास महाराष्ट्र सरकार अपयशी ठरत असल्याचा दावा करीत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली.

दिल्लीतील विक्रम गहलोत यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी घेताना सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना तसेच न्यायमूर्ती व्ही रामासुब्रमण्यम यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांचे कान टोचले.

‘तुम्हाला ही मागणी करायची असेल तर राष्ट्रपतींकडे करा, त्यासाठी ही जागा नव्हे, अश्या शब्दांत खंडपीठाने सुनावले. केवळ एका अभिनेत्याच्या मृत्यूनंतर अशा प्रकारची याचिका ऐकून घेतली पाहिजे का? असा सवाल सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी केला. अशा घटना महाराष्ट्रात वाढत असल्याचा युक्तीवाद यावेळी याचिकाकर्त्यांच्या वकिलांकडून करण्यात आला.

यादरम्यान याचिकेत नमूद असलेल्या घटना केवळ मुंबईच्या असून महाराष्ट्र हे किती मोठे राज्य आहे हे तुम्हाला माहिती तरी आहे का? असा संतप्त सवाल खंडपीठाने केला. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करता येत नसेल तर किमान मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील कायदा-सुव्यवस्था काही दिवसांसाठी सैन्याकडे सोपवायला हवी. घटनेच्या कलम- ३५२ चा आधार घेत न्यायालयाने यात हस्तक्षेप करावा अशी मागणी याचिकेतून करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *