पलावा उड्डाणपुलाच्या सर्वसाधारण आराखड्यास रेल्वेची मंजुरी, महिन्याभरात होणार कामाला सुरुवात खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांची माहिती..!

| कल्याण | कल्याण – शिळ-कल्याण रस्त्यावरील पलावा परिसरातील वाहतूककोंडी दूर होण्यासाठी महत्वाच्या असलेल्या पलावा उड्डाणपुलाच्या सर्वसाधारण आराखड्यास (जीएडी) रेल्वेने मंजुरी दिल्यामुळे एक महत्त्वाचा टप्पा पार पडला असल्याची माहिती या कामाचा सातत्याने पाठपुरावा करणारे कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. या उड्डाणपुलाच्या अंतिम आराखड्याला मंजुरी मिळून महिन्याभरात कामाला पुन्हा सुरुवात होईल.

शिळ-कल्याण रस्त्याच्या सहापदारीकरणाचे काम प्रगतीपथावर असून याचाच एक भाग म्हणून पलावा गृहसंकुल परिसरात देसाई खाडी ते काटई टोल नाका अशा उड्डाणपुलाचे कामही सुरू करण्यात आले होते. परंतु, या उड्डाणपुलाखालून जाणाऱ्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरसाठी अतिरिक्त २ मार्गिकांसाठी जागा सोडण्याची विनंती हे काम करणाऱ्या प्राधिकरणाने केल्यामुळे या उड्डाणपुलाचा आराखडा बदलावा लागला. या उड्डाणपुलात एकूण ४५ फाऊंडेशन असून त्यापैकी ३७चे काम पूर्ण झाले आहे, तर ४५ पिलरपैकी १२चे काम पूर्ण झाले आहे.

आराखडा बदलावा लागल्यामुळे रेल्वेला सर्वसाधारण आराखडा पुन्हा मंजुरीसाठी पाठवावा लागला. याला आता मंजुरी मिळाली असून अंतिम आराखडाही महिनाभरात मंजूर होऊन कामाला सुरुवात होईल. या वर्ष अखेरीपर्यंत पत्री पूल वाहतुकीसाठी खुला होत असून त्याच बरोबरीने पलावा उड्डाणपुलाच्या कामालाही सुरुवात होत असून वाहतुककोंडीतून दिलासा मिळेल, असा विश्वास खा. डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *