दैनिक लोकशक्ती ऑनलाईन , १६ एप्रिल , गुरुवार..
सोलापूर : नाही म्हणता म्हणता सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात एकाच दिवशी १० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. सोलापुरातील कोरोनाबाधितांची संख्या आता १२ वर पोहोचल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.
सोलापूर जिल्ह्यात एकही रुग्ण नव्हता. मात्र, म्हणता म्हणता मागील चार दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 12 वर पोहोचला आहे. किराणा दुकानदाराच्या मृत्यूनंतर पुढील चार दिवसांत हा आकडा वाढल्याने जिल्हा प्रशासन चांगलेच धास्तावले आहे. मंगळवारी त्याच्या संपर्कात आलेल्या आणखी एक महिलेची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर आज तिच्या संपर्कातील 42 जणांची टेस्ट घेतली असता त्यापैकी 10 जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
मात्र, असं असलं तरी सोलापुरातील पॉजिटिव्ह रुग्णांची ट्रॅव्हल हिस्ट्री मात्र अद्यापपर्यंत समोर आलेली नाही. त्यामुळे कोरोनाचा शिरकाव झाला, कसा हा प्रश्न जिल्हावासीयांना पडला आहे. जिल्हा प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली आहे.
सोलापूर पोलिस प्रशासनाने आता आणखी पाऊले उचलत उपाययोजना सुरु केल्या आहेत. मात्र, असं असलं तरी सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झालाच कसा याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. त्यामुळे सुरवातीच्या दोघांची ट्रॅव्हल हिस्ट्री समोर येणे गरजेचे आहे. त्याचबरोबर हा संसर्ग शहरातून ग्रामीण भागात गेल्यास कोरोनाबाधितांची संख्या आणखी वाढू शकते. त्यामुळे सोलापूर शहर पूर्णतः सील करणे गरजेचे असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे..