भाड्याने राहणाऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारचा दिलासा देणारा निर्णय…!
घरभाडे थकल्याने कुणालाही घराबाहेर काढू नये, अशा गृहनिर्माण विभागाच्या सूचना


दैनिक लोकशक्ती ऑनलाईन


मुंबई : राज्यात लॉकडाऊन असल्याने अनेकांच्या हाताला काम नाही. परिणामी हातात पैसा नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशातच घरभाडे कसे भरावे असा प्रश्न अनेकांसमोर उभा राहिला आहे. या पार्श्वभूमीनर गृहनिर्माण विभागाने भाड्याने राहणाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. घरभाडे वसुली किमान तीन महिने पुढे ढकलावी, घरभाडे भरले नाही म्हणून किंवा घरभाडे थकल्याने कुणालाही घराबाहेर काढू नये, अशा सूचना गृहनिर्माण विभागाने राज्यातील घरमालकांना दिल्या आहेत. राज्यात भाड्याच्या घरात राहणाऱ्या लोकांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या सर्वांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.

घर मालकांसाठी गृहनिर्माण विभागाने सूचना दिल्या आहेत. ज्यामध्ये २३ मार्च ते ३ मे २०२० या काळात लॉक डाऊन असल्याकारणाने बाजारपेठा, व्यावसायिक संस्था कारखाने व एकूणच आर्थिक गतीविधी बंद आहे. याचा सर्वसामान्य जनतेच्या रोजगारावरही परिणाम झाला असून अनेकांचे उदरनिर्वाहचे साधन बंद आहेत. त्यामुळे अनेकांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या बिकट आर्थिक स्थितीमध्ये घर भाडे वसुली किमान तीन महिने पुढे ढकलावी व या काळात भाडे भाडेकरू कडून थकल्याने त्याला भाड्याच्या घरातून निष्कसित करण्यात येऊ नये, अशा सूचना गृहनिर्माण विभागाकडून घर मालकांना देण्यात आल्या आहेत.

राज्यात भाड्याच्या घरात राहणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीमध्ये भाडेकरुंना ते राहत असलेल्या घरांचे भाडे नियमितरित्या भरणे शक्य होत नसल्याने भाडे थकले आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे भाडेवसुली किमान तीन महिने पुढे ढकलावी व या काळात भाडे न भरल्यास कुणालाही घरातून काढू नये, अशा सूचना राज्यातील सर्व घरमालकांना देण्यात येत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *