| पुणे | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत येणारी महाविद्यालयं 11 जानेवारीपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण देणारी सर्व महाविद्यालयं सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत पुणे, नाशिक आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यातील महाविद्यालयांचा समावेश होतो. ही महाविद्यालयं सुरु करताना कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत. महाविद्यालयं कधी सुरू करायची याचा निर्णय घेण्यासाठी विद्यापीठाकडून एक समिती गठीत करण्यात आली होती. या समितीन हिरवा कंदील दाखवल्यानंतर महाविद्यालयं सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
इंजिनिअरिंग, वास्तुकला, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, शारीरिक शिक्षण आणि व्यवसायिक अभ्यासक्रमांची द्वितीय वर्ष आणि त्या पुढील वर्षाचे वर्ग सुरू होणार आहे. तसेच कला, विज्ञान, वाणिज्य, समाजशास्त्र, ग्रंथालयशास्त्र, पत्रकारिता आणि संज्ञापन अशा अभ्यासक्रमांचे द्वितीय वर्ष व त्यापुढील वर्ग सुरू होणार आहे.