| नवी दिल्ली | ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी त्यांचा भारत दौरा रद्द केला आहे. भारताने त्यांना २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुण्याचे निमंत्रण पाठवले होते. त्यांनी ते स्वीकारले होते. यानंतर ते भारतात येणार नाही अशी अटकळ बांधली जात होती. मंगळवारी याची पुष्टी झाली.
वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, जॉनसन आता भारतात येणार नाहीत. जॉनसन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. ब्रिटनमध्ये ज्याप्रकारे कोरोनाचा नवीन स्ट्रेन पसरत आहे, त्यानुसार मला देशात राहणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
ब्रिटनमध्ये मार्चपर्यंत ७ आठवड्यांचा लॉकडाउन :
ब्रिटनमध्ये लसीकरण सुरू झाले आहे मात्र कोरोनाचा कहर थांबण्याचे नाव घेत नाहीये. या पार्श्वभूमीवर बोरिस जॉनसन सरकारने मार्चपर्यंत देशभर कडक लॉकडाउनचे निर्देश दिले आहेत. हा लॉकडाउन ७ आठवड्यांचा राहणार आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृतांचा आकडा एक लाखापर्यंत पोहोचू नये यासाठी यूके सरकार प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. ब्रिटनमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत ७५ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. २२ फेब्रुवारीपर्यंत या निर्बंधांमध्ये दिलासा मिळण्याची अपेक्षा नाही. त्याचबरोबर सरकारने फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत शाळा बंद ठेवण्याचीही घोषणा केली आहे.