| सोलापूर | पैलवान जेव्हा कुस्तीच्या फडात असतो तेव्हा अनेक संस्था, संघटना, शासन त्यांच्या मदतीसाठी हजर असतात. त्यांच्या खुराकपासून सगळ्या गोष्टींच्या खर्चासाठी दत्तक घेतलं जातं. मात्र जेव्हा हाच पैलवान कुस्तीच्या आखाड्यातून बाहेर पडतो तेव्हा मात्र तो एकाकी पडतो. अशीच काहीशी अवस्था राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये कुस्तीत सुवर्णपदक मिळवून देणारे, १९९२ साली महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवणारे, ज्यांचा सन्मान शासनाने शिवछत्रपती पुरस्कार देऊन केला त्या आप्पालाल शेख यांची झाली आहे. भल्या भल्या पैलवानांना आस्मान दाखवणाऱ्या आप्पालाल शेख यांची अवस्था आज दयनीय झाली आहे. या बाबतची बातमी एका खाजगी वृत्त वाहिनीवर प्रसारित करण्यात आली होती. त्या बातमीची दखल घेऊन संवेदनशील व्यक्ती व कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी तात्काळ १ लाखांची मदत जाहीर करत सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांच्या कुटुंबीयांना दिले आहे.
पैलवान आप्पालाल शेख हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावातील रहिवासी आहे. त्यांचे बंधू इस्माईल शेख हे देखील पैलवान होते. इस्माईल यांनी कुस्तीच्या सरावासाठी कोल्हापूर गाठलं. त्यांच्या खाण्यापिण्याची सोय व्हावी म्हणून आप्पालाल देखील कोल्हापूरला गेले. तिथे त्यांना देखील कुस्तीची आवड निर्माण झाली. १९८० साली आप्पालाल यांचे बंधू इ्स्माईल यांनी महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला. भावाचा वारसा पुढे नेत पुढे १९९२ साली आप्पालाल देखील महाराष्ट्र केसरी झाले. त्याआधी अनेक छोट्या मोठ्या कुस्त्या आप्पालाल यांनी लढल्या. बल्गेरिया आणि इराण येथे झालेल्या विश्वचषक कुस्ती स्पर्धेसाठी देखील आप्पालाल यांची निवड झाली. त्यात त्यांना यश आले नाही. मात्र १९९१ साली न्युझिलंड येथे झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत आप्पालाल यांनी भारतासाठी सुवर्ण पदक देखील पटकावलं. आप्पालाल यांचे पुतण्या मुन्नालाल शेख यांनी देखील २००२ साली महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. एकाच परिवारात तीन-तीन महाराष्ट्र केसरी आहेत.
दरम्यान आप्पालाल शेख यांनी केवळ राज्यातच नाही तर देशाचं नाव जगभर गाजवलंय. त्यांची मुलं गौसपाक, अशपाक आणि अस्लम हे देखील तोच वारसा पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतायत. एकीकडे ज्यांना वस्ताद मानतो त्या वडिलांचं आजारपण दुसरीकडे कुस्तीचा सराव या दोन्ही गोष्टीच्या पूर्ततेसाठी गरज आहे ती आधाराची. असे म्हणतात की शेर कभी बुढा नही होता मात्र लाल मातीतला वाघ या जंगलामध्ये एकाकी पडला आहे. त्याला गरज आहे ती तुमच्या मदतीची. खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्यासारख्या संवेदनशील व्यक्ती सारखे इतर सर्वांनी पुढे येऊन सहकार्य करणे आवश्यक असल्याच्या भावना कुटुंबीयांनी व कुस्ती क्षेत्राने व्यक्त केल्या आहेत.