| औरंगाबाद | शिवस्वराज्य पक्षाचे अध्यक्ष तथा कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नीचा ग्रामपंचायत निवडणुकीत दारूण पराभव झाला आहे. हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव यांनी कन्नडच्या पिशोर ग्रामपंचायतीमधून पॅनल उभे केले होते. निवडणुकीत १७ पैकी हर्षवर्धन जाधव यांना ४ जागा तर संजना जाधव यांचे २ उमेदवार विजयी झाले. विशेष म्हणजे महाविकास आघाडीने ९ जागांवर यश मिळवत ग्रामपंचायत ताब्यात घेतली. तर दोन अपक्षांनी आपला विजय मिळवला.
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजनाताई जाधव आणि दानवे यांचे जावई माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचे पॅनल समोरासमोर असल्याने सुरुवातीला संपूर्ण राज्याचे लक्ष या ग्रामपंचायतीकडे वेधले गेले होते.
प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात शिवशाही ग्रामविकास व आदर्श परिवर्तन ग्रामविकास या दोन्ही पॅनलने गावात काढलेल्या प्रचार रॅलींनी सर्वांचे लक्ष वेधले होते. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचे पुत्र आदित्यवर्धन जाधव, माजी सरपंच पुंडलिक डहाके आणि जिल्हा परिषदेची शिक्षकाची नोकरी सोडून निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले राजेंद्र मोकासे व प्राचार्य नारायण जाधव यांच्या प्रचार सभांनी चांगलीच गर्दी खेचली.
हर्षवर्धन जाधव समर्थक कै. रायभानजी जाधव ग्राम विकास पॅनल, संजनाताई जाधव समर्थक ग्रामविकास पॅनल, माजी सरपंच पुंडलिक डहाके यांचे शिवशाही ग्राम विकास पॅनल, माजी सरपंच नारायण मोकासे यांचे लोकशक्ती ग्रामविकास पॅनल आणि राजेंद्र मोकासे व माजी उपसरपंच नारायण जाधव यांचे आदर्श परिवर्तन ग्रामविकास पॅनल अशी एकूण पंचरंगी चुरशीची लढत यावेळी पहायला मिळाली.