- दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : बुधवार, २२ एप्रिल
| नवी दिल्ली | कोरोनाविरुद्धच्या लढाईत डॉक्टर्स आपल्या जीवाजी बाजी लावून लढत आहेत. असं असतानाही अनेक ठिकाणी डॉक्टरांवर हल्ल्यांच्या घटना घडत आहेत. उपचार करणाऱ्या डॉक्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांना काही सोसायट्यांमध्येही अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचं पुढे आलंय. या पार्श्व भूमीवर Indian Medical Association म्हणजेच IMA या डॉक्टरांच्या संघटनेनेनं आंदोलनाचा इशार दिला होता.
डॉक्टरांविरुद्ध होणाऱ्या हल्ल्याच्या विरुद्ध तातडीने अध्यादेश काढण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत केंद्र सरकारने अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
IMAच्या इशाऱ्यानंतर संघटेनेच्या पदाधिकाऱ्यांशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी बैठक घेतली आणि चर्चा केली आणि आंदोलन मागे घेत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर सरकारने तातडीने पाऊल टाकत डॉक्टर्स आणि इतर मेडिकल स्टाफवर हल्ला केल्यास कडक शिक्षेची तरदूत असणारा अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाल्याची माहिती जावडेकरांनी दिली. ते म्हणाले, मंत्रिमंडळ बैठकीत डॉक्टर आणि हेल्थकेअर कर्मचार्यांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनेवर चर्चा झाली. बर्याच ठिकाणी त्यांच्या शेजार्यांनाही संक्रमणाचा प्रसार करणारे मानले जाते.
यापुढे डॉक्टरांविरोधातले हल्ले सहन केले जाणार नाहीत आणि त्यासंदर्भातील अध्यादेश मंजूर करण्यात आला आहे. जर कोणी डॉक्टर आणि आरोग्य सेवकांवर हल्ला केला तर 3 ते 5 वर्षे शिक्षेची तरतूद त्यात करण्यात आली आहे. नव्या अध्यादेशाअंतर्गत डॉक्टरांच्या मालमत्तेचं नुकसान केल्यास बाजार मूल्याच्या दुप्पट दंड आकारला जाईल अशी माहितीही जावडेकरांनी दिली, राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यावर या कायद्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
दरम्यान, या बाबतीत कल्याण लोकसभा खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी पहिल्यापासूनच प्रयत्न केले होते. त्यांनी या बाबतचे खाजगी विधेयक देखील संसदेत मांडले होते. डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांना कडक शिक्षा देण्याची तरतूद देखील त्यांच्या खाजगी विधेयकात होती. एकंदरीत या महत्वाच्या विधेयकावर अभ्यासपूर्ण काम करून खासदार डॉ श्रीकांत शिंदे हे देशभरातील डॉक्टरांच्या गळ्यातील ताईत झाले होते. हे आजचे यश खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचे देखील आहे, म्हणून त्यांचे या क्षेत्रातून कौतुक केले जात आहे.