| कल्याण | आज शिवसेना नेते तथा युवासेनाप्रमुख तसेच राज्याचे पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसादिनी नेवाळी नाका येथे धर्मवीर आनंद दिघे साहेब फिरता दवाखाना या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष व वन रुपी क्लिनिकच्या माध्यमातून स्व. रामचंद्र मढवी (शिवसेना उपतालुका प्रमुख) यांच्या स्मरणार्थ हा फिरता दवाखाना मलंगगड आणि जवळपास परिसरातील गावांतील नागरिकांकरिता प्रत्येक गावांगावात तसेच घराघरांमध्ये पोहोचणार आहे. या फिरत्या दवाखान्यामध्ये रुग्णांच्या तपासणीकरिता डॉक्टर आणि परिचारिका असणार असून तपासणीनंतर लागणारी औषधे सुद्धा उपलब्ध असणार आहेत. याव्यतिरिक्त अत्यावश्यक सेवेसाठी लागणारी सर्व यंत्रणा देखील यामध्ये असून यामध्ये ऑक्सिजन मशीन्स, इमर्जन्सी वेळी लागणारी औषधांचा देखील यामध्ये समावेश आहे.
या उपक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील गंभीर रुग्णास जिल्हा तथा तालुक्यांबाह्य अन्य ठिकाणी हलविण्याकरिता अत्याधुनिक रुग्णवाहिकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त जीव वाचविण्याच्या दृष्टीने व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी प्राथमिक उपचार त्वरित घेण्याच्या अनुषंगाने येथील ग्रामीण भागांत दारोदारी हा धर्मवीर आनंद दिघे साहेब फिरता दवाखाना पोहोचणार असून कोरोना साथीच्या संकंटकाळात कोरोना व्यतिरिक्तही इतर आजारांवरील तपासणी व निदान करण्यासाठी या ग्रामीण भागातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन याप्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले आहे. या उपक्रमासाठी ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.