| मुंबई |सध्या जगभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. अशातच देशातील सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या महाराष्ट्रात आहे. देशासह राज्यात संचारबंदी लागू केल्यामुळे राज्यातील अनेक भागांतील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने औरंगाबाद, नवी मुंबई आणि वसई विरार महापालिकेचा समावेश आहे. या तिनही महानगरपालिकांच्या निवडणुका कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशातच आता या तिनही मोठ्या महानगरपालिकांवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील तीन महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असून आता या महापालिकांवर प्रशासकाची नियुक्त करण्यासाठी सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या तिनही महानगरपालिकांची मुदत संपत आली आहे. तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता येथे निवडणुका घेणं अशक्य असल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे या महानगपालिकांवर प्रशासकीय आयुक्त नेमावा असं पत्र राज्य निवडणुक आयोगाने राज्य सरकारला दिलं आहे. त्यामुळे राज्य सरकारने प्रशासकीय आयुक्तांच्या नेमणुकीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.