ट्रोलधाडे समोर भाजपने हात टेकले..!
पोलिस आयुक्तांना घातले साकडे..!



| मुंबई | गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते प्रचंड ट्रोल होताना दिसत आहेत. विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार हे सारे भाजपचे नेते या पूर्वी ट्रोल झाले असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या ट्रोल धाडीने त्रस्त झालेले दिसून येत आहेत. त्यामुुळे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोशल मीडियातून आक्षेपार्ह भाषेत ट्रोल करणाऱ्यांना रोखलं जावं अशी मागणी भाजपा नेत्यांनी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याकडे केली आहे.

ज्या पद्धतीने सोशल मीडियावर बदनामी कारक पोस्ट टाकून देवेंद्र फडणवीस, भाजपा कार्यकर्त्यांना धमकी दिली जात आहे, तसंच अश्लील पद्धतीने ट्रोलिंग व सोशल मीडियावर गैरसमज पसरविणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी भाजपा शिष्टमंडळांने मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली आहे. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार मंगलप्रभात लोढा परमबीर सिंह यांच्या भेटीला पोहोचले होते. तसेच भाजपा नेत्यांनी यावेळी पोलिसावंर होणारे हल्ले चिंताजनक असून हल्लेखोरांवरही कठोर कारवाई केली जावी असं देखील म्हटलं आहे.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “पोलीस आयुक्तांना आम्ही निवेदन दिलं आहे. आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. तात्काळ एफआयआर केला जाईल अशी आमची अपेक्षा आहे”. प्रवीण दरेकर यांनी यावेळी पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांसंबंधी चिंता व्यक्त केली. “पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे ते सुरक्षित नसल्याचं समोर येत आहे. रोज हल्ले होत असल्याने पोलिसांचं मनोबल खचत आहे. पोलिसांचं खच्चीकरण झालं तर करोनाशी लढणं मुश्कील होईल. त्यांच्या सुरक्षेसाठी टोकाची कठोर कारावई करणं गरजेचं आहे,” असं प्रवीण दरेकर यांनी सांगितलं आहे.

म्हणजे एके काळी फडणवीस यांच्यावर स्तुतीचा वर्षाव करणाऱ्या सोशल मीडियातून सध्या फडणवीस ट्रोल होत आहेत, हा विषय चर्चेचा ठरत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *