सर्वप्रथम ज्ञान, व्यवहार, आत्मविश्वास आणि वैचारिक प्रगल्भता देणाऱ्या माझ्या विश्वातील सर्व गुरूंना गुरुपौर्णिमा निमित्त वंदन…
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु र्गुरुर्देवो महेश्वरः
गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः
आषाढ पौर्णिमेस गुरुपौर्णिमा किंवा ‘व्यासपौर्णिमा’ असे म्हणतात. या दिवशी व्यासपूजा करण्याची प्रथा आहे. महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार होत. भारतीय संस्कृतीची मूळ संकल्पना आणि पुढची जोपासना व्यासांनीच केली आहे. या दिवशी गुरूंची पुजा केली जाते. संपूर्ण देशात हा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो.
गुरु घाली ज्ञानांजन..
मनुष्यजीवन अनेक संघर्षांतून अस्वस्थतेच्या विचारातून बऱ्याचदा मार्गक्रमण करत असते. अशावेळी मनाला भरभक्कम असा आधार देणारा एक रसमय, रहस्यमय , आश्चर्यकारक रसायन जर आयुष्यामध्ये कोणते असेल तर ते आहे गुरू.
गुरु खऱ्या अर्थानं जीवाला आनंदाची प्राप्ती करून देत असतात आणि म्हणून गुरूला सुखाचा सागर म्हणतात- गुरु हा सुखाचा सागरु |
आयुष्यातल्या खऱ्या प्रेमाची ओळख कोणते प्रकारे लाभाची अपेक्षा न ठेवता देणारा एकमेव घटक म्हणजे गुरु -गुरु हा प्रेमाचा आगरु।
संकटाच्या प्रसंगी निराशेच्या प्रसंगी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं सांगणारे वाक्य ज्यांचं असतं ते असतात आपले गुरु… गुरु हा धैर्याचा डोंगरु।
गुरू हे कामधेनु गायीसारखे आहेत ज्या इच्छा कराव्या त्या त्या पूर्ण करण्याचं सामर्थ्य गुरु मध्ये असतं स्वतःची ओळख करून देण्याचं सामर्थ्य गुरूच्या शब्दांमध्ये असतं. आपल्यातील दुष्टप्रवृत्तीचा नाश करून चांगुलपणा व सद्भाव वाढवणारं अजब रसायन म्हणजे गुरू.
जीवन सुखमय आणि आनंदमय करण्याकरता आयुष्यात गुरुचरणी निरंतर नतमस्तक राहिले पाहिजे. गुरुचे सामर्थ्य प्राप्त असतांना असल्यावर इतर कोणत्या गोष्टीची काळजी करण्याचे कारणच नाही कारण
श्री गुरु सारखा असता पाठीराखा|
इतरांचा लेखा कोण करी।।
ज्ञानाचा असीम सागर असलेल्या श्री ज्ञानदेवांनी सुद्धा म्हटले आहे-
ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ।
आता उध्दरलो गुरुकृपेने।।
असा हा गुरुंचा अगाध महिमा आणि गुरूंचे हे अगाध महिमेचे अनमोल दान लाभलेले ते व्यक्तिमत्त्व म्हणजे मी.. आजपर्यंत ज्या ज्या क्षेत्रात प्रगती करायला सुरुवात केली त्या त्या क्षेत्रात गुरू लाभले. याच गुरूंच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या परीस पावन स्पर्शाने तसेच ते नेहमी दाखवत असलेल्या परम प्रकाश पावन पथ दर्शनाने चिंब होऊन निघालेलो आहे.
भारतीय संस्कृतीतील सर्वात महत्त्वाची परंपरा म्हणजे गुरु-शिष्य परंपरा.. हे गुरुच आपल्याला अंधकारातून अज्ञानातून बाहेर काढतात.
सर्वसाधारणपणे मनुष्याच्या जीवनातील तीन गुरु ..
१. आपल्यावर निरनिराळे संस्कार करून समाजाशी एकरूप व्हायला शिकवणारे आई वडील हे आपले पहिले गुरु.. त्याच आईवडिलांच्या जोरावर आणि त्यांच्या पूर्वपुण्याईवर आजपर्यंतची मजल मारता आली.
२. आपल्याला विद्यार्थीदशेत ज्ञानदान करणे पासून ते अनेक गोष्टी शिकवणारे शिक्षक, संस्कार करणारे हे मनुष्याचे दुसरे गुरु. या गुरु बाबतीत कदाचितच माझ्यापेक्षा कोणी भाग्यवान असेल विद्यार्थीदशेपासून आजपासून शिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्या काळापासून आजतागायत शिक्षक म्हणून लाभलेले सर्वच गुरु अफलातून होते आणि त्यांच्या त्या अध्यापन कलेमुळे आज रोजी मलाही गुरु होता आले हेच माझे भाग्य… कदाचित या ठिकाणी नावे घेतली, तर आजचा हा लेख अपुरा पडेल,यामुळे या ठिकाणी सर्वांची नावे घेता येणार नाही असेही गुरु ज्यांच्या मुळे आज मी उभा तो गुरू..
३. जीवन जगत असताना त्या आपल्या आयुष्याला अर्थ प्राप्त व्हावा म्हणून आवश्यक असते ती अध्यात्मिक गुरूची.. असे अध्यात्मिक गुरु जे मनुष्याला संकटात असताना पथदर्शक यांची भूमिका निभावतात. आनंदी असताना पाय जमिनीवर ठेवण्याचा सल्ला देतात, मग ते आध्यात्मिक गुरु दृश्य स्वरूपात समोर असोत व अदृश्य स्वरूपात मार्गदर्शन करणारे असोत. अशा गुरूंची मनुष्याला गरज असते.
गुरु म्हणजे ईश्वराचे सगुण साकार रूप, आयुष्यात चांगला गुरु मिळणे हे भाग्याचे लक्षण समजलं जातं आणि असे गुरु मला लाभले या सर्व गुरूंना मानाचा त्रिवार सलाम..
जीवन पथावर मार्गक्रमण करत असताना मला मार्ग दाखविणाऱ्या विविध क्षेत्रातील माझ्या सर्व गुरुजनांना विनम्र हृदयस्थ भावनेने समर्पित…
– योगेश मोहन इंगळे, जळगाव ( मा. तज्ञ संचालक ग.स.सोसायटी जळगाव )