नवी दिल्ली: देशभरात गेल्या १२ तासांमध्ये कोरोनाचे ४९० रुग्ण आढल्यामुळे भारतातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ४०६७ इतका झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार कोरोनाचे हॉटस्पॉट निश्चित करण्यात आले आहेत.
केंद्र सरकारने आतापर्यंत देशभरात कोरोनाचे १० हॉटस्पॉट निश्चित केले आहेत. यामध्ये दिल्लीतील दिलशाद गार्डन, निझामुद्दीन परिसराचा समावेश आहे. तर महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे ही दोन्ही शहरे कोरोनाचे हॉटस्पॉट आहे. याशिवाय, नोएडा, मेरठ, भिलवाडा, अहमदाबाद, कासरगोडा आणि केरळमधील पतनमतिट्टा ही ठिकाणेही कोरोनाची हॉटस्पॉट आहेत.
दरम्यान कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून निश्चित करण्यात आलेल्या परिसरातील सर्व नागरिकांची अँटीबॉडी टेस्ट करण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच भारतीय वैद्यक संशोधन परिषदेला (ICMR) सात लाख अँटीबॉडी टेस्ट कीट उपलब्ध करून देण्यात येतील. यापैकी पहिल्या टप्प्यात ICMR ला पाच लाख किटस् मिळतील. त्यामुळे कोरोनाचा मोठ्याप्रमाणावर प्रादुर्भाव झालेल्या परिसरातील लोकांच्या वेगाने टेस्ट केल्या जातील..