मागील भागात आपण स्वराज्यात आणि एकूणच मध्ययुगीन राज्यसत्तांच्या दृष्टीकोनातून एकंदर दुर्गांचे महत्व पहिले. या लेखापासून पुढे आपण फक्त दुर्गदुर्गेश्वर रायगड ची विशिष्ट माहिती पाहणार आहोत. अगदी अश्मयुगीन काळापासून ते स्वराज्यात येण्या अगोदरची रायगडाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण या लेखात अभ्यासणार आहोत.
आज जनमाणसांत रायगड नाव अगदी रूढ झाले असले तरी हे एकच नाव रायगडाने धारण केले असे मात्र नाही. कालपरत्वे या डोंगराला वेगवेगळी नावे दिली गेली. तणस, रासिवटा, नंदादीपाचा डोंगर, जंबुद्वीप, रायगिरी अथवा राजगिरी, रायरी आणि अखेरीस शिवरायांनी दिलेले रायगड असा हा नावाचा प्रवास. सर्वच नावे साजेशी. त्या त्या काळात रूढ झालेली. रायगडचा सुसंगत असा इतिहास फारसा उपलब्ध नाही. इ.स. १२ व्या शतकापासून पुढचा इतिहास त्रोटक स्वरुपात उपलब्ध आहे. रायगडासारखा बेलाग व दुर्गम दुर्ग दुर्लक्षित राहणे शक्य नाही परंतु ठोस पुरावे अथवा लिखाण उपलब्ध नसल्याने काही ठिकाणी आपल्याला तर्काचा आधार घ्यावा लागतो.(history of Raigad fort)
|| १) रायगडाच्या परिसरात अश्मयुगीन वस्ती : ||
उत्क्रांतीच्या टप्प्यावर माणूस नावाचा प्राणी पृथ्वीवर नेमका कधी वावरू लागला हे सांगण थोड कठीण असल तरी इतर प्राण्यांच्या तुलनेत ह्या माणसाकडे एकच गोष्ट वेगळी होती आणि ती म्हणजे बुद्धी. याच बुद्धीचा वापर करून माणसाने दगडी हत्यारे वापरायला सुरुवात केली आणि तिथपासून त्याच्या अस्तित्वाचे पुरावे मिळायला सुरुवात झाली. हत्यारांची बांधणी व दगडाचा प्रकार यावरून अश्मयुगाचे तीन टप्पे पडतात. पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग. रायगडाच्या परिसरात अश्मयुगीन वस्ती असावी अशी धारणा पुण्याच्या डेक्कन कॉलेज मधील संशोधक श्री. आर.व्ही.जोशी यांची होती. आज आपण रायगडावर जातो तेंव्हा जर रोप वे ऐवजी पायी चढत जाण्याचे ठरवले तर आपण चित्त दरवाजा मार्गे जातो. चित्त दरवाजा उजव्या बाजूला ठेवून जिथे गाड्या लावण्याची सोय आहे असे छोटेसे हॉटेल आपल्या डाव्या हाताला लागते. त्या हॉटेलच्या बाजूने जी पायवाट वर जाते त्या टेकडीवर एक गुहा आहे. तिला नाचटेपाची गुहा किंवा वाघबीळ म्हणतात.
याच गुहेत श्री. आर. व्ही. जोशी यांनी एक “TRIAL PIT’’ घेतला होता आणि त्यांना त्या ठिकाणी अश्मयुगीन हत्यारे सापडली देखील होती. त्यावर एक शोधनिबंध देखील त्यांनी प्रसिद्ध केला आहे. डेक्कन कॉलेज प्रशासनाशी वेळोवेळी संपर्क करून देखील तो शोध निबंध मिळू शकला नाही. तो शोधनिबंध प्रसिद्ध झाला तर बरीच माहिती प्रकाशात येऊ शकते आणि रायगड परिसरातील मानवी वस्तीचा इतिहास लाखो वर्ष जुना आहे यावर शिकामोर्तब होऊ शकेल.(history of Raigad fort)
|| २) ऐतिहासिक दृष्ट्या रायगड : ||
रायगडाच्या प्राचीनत्वाविषयी लख्ख उल्लेख करणारा एखादा शिलालेख आज तरी उपलब्ध नाही. रायगड आणि त्याच्या सभोवताली मात्र अशा अनेक वास्तू प्रमाणभूत बनून उभ्या आहेत. रायगडाच्या अस्तित्वाविषयी साक्ष देत एक वास्तू रायगडापासून थोडीशी दूर महाड शहराजवळ उभी आहे. ती म्हणजे महाड जवळील गांधारपाले येथील बौद्ध लेणी. महाड शहरापासून जवळच एका टेकडीवर हा ३० लेण्यांचा समूह आहे. कुठलीही लेणी हि एखाद्या राजाच्या अथवा मजबूत दुर्गाच्या आश्रयाने बांधली जात असतात. कार्ल्याची लेणी लोहगड किल्ल्याच्या, भाजे लेणी विसापूर किल्ल्याच्या, जुन्नरची लेणी शिवनेरी किल्ल्याच्या आणि जगप्रसिद्ध वेरूळ ची लेणी हि देवगिरी किल्ल्याच्या आश्रयाने बांधली गेली. महाड म्हणजे बाणकोटच्या खाडीवरील नावाजलेले बंदर. पश्चिमेकडील जहाजे नाना परींचा बहुमोल माल घेऊन महाडच्या बंदरात रिकामी होत आणि मग हा आयात माल बैलांच्या पाठीवर लादून वेगवेगळ्या घाटमार्गांनी देशावर पाठविला जात असे.
बौद्ध काळात व्यापाऱ्यांनी वर्षावास काळात भिक्कुंना सोय सुविधा व्हावी म्हणून हि लेणी कोरली असावीत. या लेण्यांना अभय देऊ शकेल असा दुर्ग रायगड वगळता दुसरा आसपास नाही. सुदैवाने गांधारपाले येथील शिलालेखाचे वाचन झाले असून हा शिलालेख व पर्यायाने लेणी सातवाहन काळात निर्मिले गेल्याचे दिसते. विष्णूपालीत नावाच्या राजकुमाराने अथवा नामांकित व्यक्तीने लेण्यांसाठी तर वादसिरी नावाच्या व्यक्तीने लेण्यांखालील काही शेते देणगी दाखल दिल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे दुर्ग म्हणून रायगड किमान २००० वर्षे उभा आहे असा अनुमान करता येतो. रायगडावर असलेली काही पाण्याची टाकी आणि गांधारपाले येथील लेण्यांचे बांधकाम यात देखील साम्य आहे त्यामुळे सातवाहन काळात सुद्धा महाड बंदरातून देशावर होणार्या वाहतुकीला संरक्षण देण्यासाठी म्हणून रायगडावर काही जुजबी बांधकाम असावे परंतु कालौघात पाण्याची टाकी वगळता इतर काही बांधकामे टिकली नसावीत.(history of Raigad fort)
|| ३) रायगडचा ज्ञात इतिहास : ||
इसवी सनाच्या बाराव्या शतकापासून पुढे मात्र रायगडचा म्हणा किंवा रायरीचा म्हणा बर्यापैकी इतिहास उपलब्ध आहे. बाराव्या शतकात रायरीचा डोंगर आणि त्याचा परिसर मराठा पाळेगारांच्या ताब्यात होता. कोकणाचा हा प्रदेश जात्याच दुर्गम. घनदाट झाडी, बेलाग कडे आणि घाटावर जाणारे दुर्गम घाट. त्यामुळे व्यापारी मार्गाचा रखवालदार.. यापलीकडे रायरीच्या डोंगरास फारसे महत्त्व नसावे. मुख्य राज्यात सत्ता कुणाचीही असली तरी त्याचे नाममात्र आधिपत्य पत्करून हे मराठे पाळेगार स्वतंत्रच असत. बहुतेक पाळेगारांची कुटुंबे रायरीच्या डोंगरावर वस्तीला होती. १४ व्या शतकात काही काळ ह्या पाळेगारांनी विजयनगरचे मांडलिकत्व पत्करले मात्र इ.स. १४३६ मध्ये बहमनी सुलतान दुसरा अल्लाउद्दिन शाह याने रायरी आपल्या अधिपत्याखाली आणला. इ.स. १४७९ मध्ये बहमनी सत्तेचा शेवट झाला व त्यातून पाच शाह्यांचा उदय झाला त्यापैकी अहमदनगर हि राजधानी असलेल्या निजामशाहा ने रायरी आपल्या ताब्यात घेतला. रायरीचा डोंगर आणि पर्यायाने जावळीच्या सुभ्यावर निजामशाही अंमल पुढे अनेक वर्षे चालू राहिला.
जावळीच्या सुभ्यासाठी निजामशाही व आदिलशाही यांच्यात चकमकी होत असत परंतु मुख्यत्वे आधिपत्य हे निजामशाहीचे राहिले ते अगदी १६३६ पर्यंत. १४७९ ते १६३६ म्हणजे जवळपास १५० वर्ष रायरी वर अहमदनगरच्या निजामशाही राजवटीचा अंमल होता. दिल्लीचा मुघल बादशहा शहाजहान याने १६३६ मध्ये निजामशाही वर स्वारी केली आणि संपूर्ण निजामशाही जिंकून घेतली. आधीच मुघल राजधानी पासून दूर असलेला हा प्रदेश आणि त्यातही दुर्गम. या प्रदेशावर अधिसत्ता कायम राखणे जिकीरीचे जाणार हे ओळखून शहाजहान ने आदिलशाहीशी तह केला. इ.स. १६३६ तारीख ६ मे रोजीच्या या तहानुसार रायरीचा मुलुख आणि निजामशाहीच्या अधिपत्याखाली असलेला कोंकण चा प्रदेश मुघल बादशहाने ८० लक्ष रुपये घेऊन आदिलशाहीस विकून टाकला आणि रायरीवर आदिलशाही अंमल सुरु झाला. १६३६ ते १६४८ या वर्षात वेगवेगळ्या मुस्लीम हवालदारांच्या मार्फत आदिलशाही अंमल सुरु राहिला. १६३६ ते १६४४ पर्यंत शेख इब्राहीम, सय्यद कबीर लष्करी व शेख अली हे रायरीचे हवालदार म्हणून काम करून गेले. १६४४ मध्ये हवालदारी भेटलेल्या रहीमखानाचे व जावळीचे चंद्रराव मोरे यांचे वितुष्ट आले व मोऱ्यांनी त्याच्या अनेक तक्रारी आदिलशाही दरबारास केल्या त्यामुळे त्याची हवालादारी काढून घेण्यात आली व शेख आली ह्यास पुन्हा हवालदार म्हणून नेमले.
मुळात हा रायरीचा प्रदेश दुर्गम, घाटमाथ्यावर जाणार्या मार्गावरून होणारी वाहतूक आणि त्यातून मिळणारी जकात हेच उत्पन्नाचे मुख्य साधन त्यामुळे रायरी आणि रायरीचा प्रदेश यातून आदिलशाहीस चांगले उत्पन्न मिळत असले तरी इथल्या जनतेत सुव्यवस्था नव्हती. रायरीचा हवालादारांचे मनमर्जी वागणे आणि जावळीच्या मोऱ्यांची अरेरावी याला जनता कंटाळली होती. अश्या ह्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या रायरीचे व जावळीच्या खोऱ्याचे भाग्य १६४८ मध्ये मात्र चमकले. सह्याद्रीच्या पटलावर उगवलेल्या स्वराज्य सूर्याचा प्रकाश १६४८ मध्ये ह्या प्रदेशावर पडला आणि रायरीचे अंधारयुग संपले. १६४८ मध्ये शिवरायांचा रायरीचा प्रदेशासी संपर्क आला आणि एक न्यायी आणि सामर्थ्यवान राज्यकर्ता महाराष्ट्र्भूमीवर आला आहे याची जाणीव जावळीच्या त्रासलेल्या जनतेला झाली. त्यायोगे जावळीचे मोरे आणि शिवरायांचा संघर्ष होऊन रायरी स्वराज्यात कसा दाखल झाला हे पुढच्या भागात अभ्यासुया.
तूर्तास इथेच थांबूया. (history of Raigad fort)
|| श्री राजा शिवछत्रपती असे शक्तिदाता ||
– दुर्गसेवेसी तत्पर , मावळा निरंतर
प्रविण काशिनाथराव काळे-देशमुख , रायगड
संदर्भसूची :-
१) रायगड किल्ल्याचे वर्णन – गो.बा.जोशी
२) राजधानी रायगड – वि.वा.जोशी
३) रायगड – प्रबोधनकार ठाकरे
४) चला रायगडला – श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ
५) Oxinden’s Diary – Henry Oxinden
५) Book Of Bombay – James Douglas
६) रायगडची जीवनकथा – शां. वि. आवळसकर
७) शिवतीर्थ रायगड – गो.नि.दांडेकर
८) दुर्गदुर्गेश्वर रायगड – प्र.के.घाणेकर
९) शिवकाळातील दुर्ग व दुर्गाव्यवस्था – महेश तेंडूलकर
१०) श्रीमद रायगीरौ – गोपाळ चांदोरकर
११) फिरंगाणातील किल्ले – भा.वि.कुलकर्णी
१२) महाराष्ट्र व गोवे शिलालेख-ताम्रपटांची सूची – शांताराम भालचंद्र देव
- जागर इतिहासाचा : शिवाजी महाराजांवर विदेशात प्रथमच टपाल तिकीटे !
- “जेव्हा बैलगाडीवरच्या मराठ्यांनी तोफांसह तयार असलेल्या शत्रूला नेस्तनाबूत केलं”
- !… आणि ती माती हाती घेऊन भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण हमसून हमसून रडू लागले…!
- एका झाशीच्या राणीची गोष्ट…
- जानु भिंताडा – पानिपत मधील आपल्या धन्याच्या एक इमानदार सेवक…!
अतिशय उपयुक्त माहिती अतिशय सहज सोप्या शब्दात उपलब्ध करुन देत असल्याबद्दल धन्यवाद मित्रा.
माहीती अचूक टिपलेली आहे वाचून आनंद झाला खुप जुनी माहिती आहे वाचताना डोळ्यासमोर अक्षरशः रायगडचा उभा आहे असे वाटले
अगदी प्राचीन काळापासून ची खूप छान माहिती…
Nice information
SUPER SIR