जळगाव – कोरोना नामक व्हायरसने सध्या संपुर्ण जगाला वेठीस धरले आहे. संपूर्ण जग कोरोनाच्या महामारीमुळे संकटात आहे. दररोज कोराना बाधीत रुग्णांची संख्या व मृत्यु वाढत चालला आहे. कोरोनावर अद्यापही कुठलीही लस वा औषध नसल्याने कोरोनाला पळवुन लावायचे असेल तर घरात बसणे हाच एक रामबाण उपाय आहे. त्यामुळे 14 एप्रिल पर्यंत संपूर्ण भारतात लाँकडाऊन करण्यात आले आहे.
आरोग्य विभाग व पोलीस प्रशासन कोरोना विरोधात जीवाचे प्राण लावुन लढत आहे. याच कोरोनाचे संकट दुर व्हावे म्हणुन गोंडगाव येथील आरोग्य सेवक संजय सोनार कळवाडीकर यांनी मुंडन करुन चक्क कोरोनाचे तेरावे केले आहे. याबाबतीत अधिक माहीती अशी की देश कोरोनामुक्त व्हावा म्हणून २२ मार्च रोजी जनता कर्फ्यु पाळण्यात आला. तसे पाहता जनता कर्फ्यु ही कोरोना विरोधातील संपूर्ण देशाची पहिली लढाई होती. म्हणून 22 मार्च पासून तेराव्या दिवशी म्हणजे 3 एप्रिल रोजी कोरोनाचे तेरावे करण्यासाठी त्यांनी मुंडन केले आहे. ते स्वतः आरोग्य सेवक असून ते कार्यरत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र कजगाव व गुढे यात येणाऱ्या 34 गावांमध्ये जनजागृती करत आहेत.
ही कोरोनाबाबत जनजागृती करतांना त्यांना आलेल्या अनुभवांविषयी सांगतांना ते म्हणतात की, लॉकडाऊन असतांनाही नागरीक चौका-चौकात गर्दी करतात, तोंडाला रुमाल अथवा मास्कचा वापर करीत नाही, सोशल डिस्टन्सबाबत काळजी घेतली जात नाही, अनेक ठिकाणी तरुण क्रिकेट खेळतात, अनेक गावांमध्ये नागरीक बसुन घोळका करतात हे सारे बदलेले पाहिजे. कारण जर अशीच परिस्थिती सर्वत्र राहीली तर येणारा काळ आपल्यासाठी खूपच भयानक असणार आहे. त्यामुळे प्रबोधन करण्यासाठी त्यांनी स्वतः कोरोना मुक्तीसाठी मुंडन करुन तेरावे साजरे केले आहे. त्यांच्या ह्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.