| वॉशिंग्टन | अमेरिकेत सुरू असलेले करोनाचे थैमान थांबण्याची कोणतीच चिन्ह दिसत नाही. मागील २४ तासांत अमेरिकेत करोनाच्या संसर्गामुळे ३१७६ जणांनी प्राण गमावले आहेत. अमेरिकेत करोनाच्या संसर्गाने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या ही ५० हजारांवर पोहचली आहे.
जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत शुक्रवारी सकाळपर्यंत एकूण ८ लाख ६७ हजार ४५९ जणांना करोनाची बाधा झाली आहे. तर, ४९ हजार ८०४ जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत ४६ लाख जणांची करोना चाचणी झाली आहे. अमेरिकेत दिवसेंदिवस करोनाबाधित रुग्ण आणि मृतांची संख्या यांच्यात वाढ होत चालली आहे. न्यूयॉर्क राज्यात सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. न्यूयॉर्कमध्ये २ लाख ६० हजारांहून अधिकजणांना करोनाची बाधा झाली असून २० हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. न्यूजर्सीमध्येही एक लाख नागरिकांना करोनाची बाधा झाली आहे. तर, ५ हजारजणांचा मृत्यू झाला आहे.
जगातील जवळपास २१० देशांमध्ये करोनाचा संसर्ग फैलावला आहे. अनेक देशांनी करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी लॉकडाउन जाहीर केला आहे. तर, अमेरिकेत पूर्णपणे लॉकडाउन जाहीर करण्यात आला नाही. मात्र, नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जगभरात २७ लाख नागरिकांना करोनाची बाधा झाली असून मृत्यूची संख्या १ लाख ८० हजारांहून अधिक झाली आहे.