वॉशिंग्टन:- अमेरिकेत कोरोना विषाणूने चांगलेच थैमान घातले आहे. येथे जवळपास सव्वा लाख लोक कोरोना संक्रमित आहेत. अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत २ हजार ५०० लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोरोनाशी दोन हात करण्यासाठी लढत आहेत. आता ट्रम्प यांनी यासंदर्भात मोठी भीती व्यक्त केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, ‘आगामी दोन आठवड्यामध्ये मृत्यू दराचा आकडा सर्वाधिक होऊ शकतो. त्यामुळे याचा प्रसार रोखण्यासाठी सरकारद्वारे जारी करण्यात आलेली गाईडलाईन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात येईल.’ १ जूनपर्यंत सर्व ठिक होईल, अशी अपेक्षा आहे. याआधी ट्रम्प म्हणाले होते की, ईस्टरपर्यंत अमेरिकेतील परिस्थिती नियंत्रणात येईल.
व्हाईट हाऊसमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, आगामी दोन आठवड्यांमध्ये कोरोना विषाणूमुळे अमेरिकेत मृत्यू दराचा आकडा सर्वाधिक होऊ शकतो. त्यामुळे ते सरकारद्वारे जारी करण्यात आलेले ‘सोशल डिस्टंन्सिंग’ची गाईडलाईन फॉलो करत आहेत.
ट्रम्प प्रशासनातील विशेषज्ञ्जांनी रविवारी भीती व्यक्त केली की, अमेरिकेत कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे एक लाख ते दोन लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो. देशात जवळपास १ लाख २५ हजार लोक संक्रमित आहेत. ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲलर्जी अँड इन्फेक्शियस डिसीज’चे डायरेक्टर ॲंथनी फॉकी यांनी ‘सीएनएन’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, अमेरिकेत कोविड-१९ संक्रमणामुळे एक लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू होऊ शकतो.