| मुंबई | कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन काळात शाळा, महाविद्यालये बंद आहेत. लॉकडाऊनमुळे अनेक शाळा, महाविद्यालयांच्या परीक्षांबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला होता.
मात्र आता पदवीच्या परीक्षांबाबत उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घोषणा केली आहे. केवळ पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा होणार आहे. जुलै महिन्यात अंतिम वर्षाची, अंतिम सत्राचीच परीक्षा होणार आहे. मात्र अन्य वर्गांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. UCGच्या नियमांनुसार 15 ऑगस्टपर्यंत निकाल लावले जातील अशी माहिती देण्यात आली आहे.
अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या विध्यार्थ्यांच्या परीक्षा १ जुलै ते ३० जुलै ह्या कालावधीत होणार … त्या आधीच्या सत्रातील परीक्षा होणार नाहीत .. त्या विद्यार्थ्यांना नवीन वर्षात प्रवेश देणार ..लोकडाऊन वाढल्यास अंतिम सत्राच्या परीक्षांचा पण २० जून नंतर आढावा घेणार ..
— Uday Samant (@samant_uday) May 8, 2020
दरम्यान, यूपीएससीची प्रीलिम परीक्षा ३१ मे रोजी होणार होत्या परंतु या सर्व परिक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. परीक्षेसंदर्भातील पुढील तारीख २० मे नंतर दिली जाणार आहे. लॉकडाऊनमुळे इंडियन सिविल सर्विसेस आणि फॉरेन सर्विसच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातून सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांनी यूपीएससी परीक्षेसाठी अर्ज भरला आहे.