“भावी अधिकारी होऊ इच्छित असलेल्या विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होऊन ते निराशेच्या गर्तेत जाण्याची परिस्थिती उद्भवली आहे तरी योग्य ती कार्यवाही तात्काळ करावी असे या मागणीच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. |
| पुणे : निलेश देशमुख| पुणे येथे राहून सारथी मार्फत स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील विविध भागातील विद्यार्थ्यांचे विद्यावेतन न मिळाल्याने दैनंदिन जेवण, घर भाडे इत्यादी बाबींसाठी विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे या विद्यार्थांचे विद्यावेतन तात्काळ अदा करावे व सदरील दिरंगाईची नोंद घेऊन जबाबदार अधिकार्यांवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन संभाजी बिग्रेडच्या वतीने पुणे विभागीय आयुक्तांना देण्यात आल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे पुणे पदवीधरचे उमेदवार इंजीनियर मनोजकुमार गायकवाड यांनी दिली.
पुण्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे खाणावळी व इतर सोयी बंद असल्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे दररोजच्या जेवणासाठी हाल होत आहेत, या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांच्या मूळ गावी पोहोचविण्यासाठी योग्य ती व्यवस्था करावी अन्यथा त्यांच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था करावी. काही ठिकाणी विद्यार्थिनी एकट्याच राहत असल्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेला देखील प्राधान्य देण्यात यावे असे या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे पुणे पदवीधरचे उमेदवार इंजीनियर मनोजकुमार गायकवाड, पुणे विभागीय अध्यक्ष किरणराज घाडगे, पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, पुणे शहर अध्यक्ष प्रशांत धुमाळ, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष प्रवीण कदम यांची नावे आहेत.