मुंबई : मुंबईत कोरोनाचा वाढता कहर पाहायला मिळत आहे. अनेक दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर, आता डॉक्टर आणि काही पोलिसांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसू लागली आहेत. मुंबईत एका पोलीस उपायुक्त अर्थात डीसीपी रँकच्या अधिका-याला कोरोनाची लक्षणे दिसून आली आहेत. त्यामुळे या अधिका-याला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अधिका-याच्या घशातील नमुने/ स्वॅब चाचणीकरिता पाठवले आहेत. त्याचा रिपोर्ट शनिवारी येण्याची शक्यता आहे. या रिपोर्टची प्रतीक्षा सर्वांना आहे. दरम्यान, या अधिका-याच्या कार्यालयातील १२ पोलिसांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे.
सध्याच्या परिस्थितीत डॉक्टर आणि पोलीस समाजरक्षणासाठी काटेकोर कर्तव्य बजावत असताना, त्यांनाही आता कोरोनाची लागण होत असल्याने, सध्यस्थितीचा अंदाज येऊ शकतो.
दरम्यान, डीसीपी रँकच्या या अधिका-याला काल रुग्णालयात दाखल केल्यानंतर, काही प्राथमिक चाचण्या केल्या. त्यावेळी त्यांना कोरोनाची लक्षणे दिसल्याने, घशाचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले. खबरदारी म्हणून या अधिका-याच्या कार्यालयातील १२ पोलिसांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांना पुढील १४ दिवस आहेत. त्याच ठिकाणी म्हणजे, डीसीपी कार्यालयातच राहावे लागणार आहे.
इतकेच नाही तर कोरोना संशयित अधिकारी अॅडिशनल कमिशनर कार्यालयातही एक-दोनवेळा गेल्याने, ते कार्यालयही सील करण्यात आले आहे.