गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः॥
आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा असे म्हणतात.
महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला. ज्ञानियांचा राजा म्हणून ज्याला मानतात, त्या ज्ञानदेवांनीसुध्दा ज्ञानेश्वरी लिहिताना ‘व्यासांचा मागोवा घेतू’ असे म्हणून सुरुवात केली.
गुरूचा ठसा बालपणात मनात उमटतो, त्यात आपले शिक्षक काही अवलिया करत असतील तर ते विद्यार्थ्यांकडून कधीही विसरले जात नाहीत. अशाच एका वस्तीवरच्या सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या समोर सगळं शिक्षण पणाला लावण्याचा योग आला. संगणक सुद्धा माहीत नसलेल्या या मुलांच्या आयुष्यात मला तंत्रज्ञानाचा खजिना उभा करायचा होता, आव्हान सोपे नव्हते, पण सुरवात रोपटे लावून करावी लागतेच ना, ती केली आणि उभा राहिला तो वटवृक्ष..!
ज्ञानदानाचे काम सर्व शिक्षक करतात; पण आजच्या युगात शिक्षण क्षेत्रात माहिती तंत्रज्ञान, डिजिटल शाळा या सारखे शब्द पुढे येत आहेत अशा वेळी शिक्षक म्हणून स्वतःला अद्ययावत ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे. बदलत्या प्रवाहानुसार शिक्षण क्षेत्रातील आव्हाने स्वीकारून विद्यार्थ्यांना २१व्या शतकासाठी सज्जे कसे ठेवता येईल यासाठी पायाभूत व सखोल शिक्षण महत्त्वाचे व यासाठी काय करता येईल या विचारात असतांनाच हातातील मोबाईलच सर्व प्रश्नांची उत्तर म्हणून समोर आला. मोबाईलचा वापर शाप समजत असताना माझ्यासाठी व माझ्या विद्यार्थ्यांसाठी हाच मोबाईल एक वरदान ठरला. गुणवत्तावाढीसाठी अडथळा ठरणाऱ्या घटकांचा अभ्यास केल्यावर माझ्या असे लक्षात आले की दिलेला गृहपाठ वेळेवर न करणे, तसेच अध्ययनात विद्यार्थ्यांना गोडी नसणे म्हणजेच शाळेबद्दल पण गोडी नसणे व त्यातूनच विद्यार्थ्यांची शाळेत अनुपस्थिती हिच तर महत्त्वाची कारणे आहेत. शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविता येते, त्यासाठी पालक व शिक्षक यांच्यात समन्वय असणे गरजेचे असून मोबाईल च्या साहाय्याने सुरू केलेली एसएमएस प्रणाली निश्चित उपयुक्त ठरेल असे वाटले आणि ते घडले.
विद्यादान करताना एखादा अवघड भाग पुन्हा शिकूनही मुले गोंधळली असतात, त्यावरील उपाय करताना व्यवस्थापनाकडे मागणी करून संगणक जेव्हा उपलब्ध झाला नाही, तेव्हा स्वतः लॅपटॉप खरेदी केला व अभ्यासक्रमातील अवघड वाटणाऱ्या पाठांचे व्हिडिओ बनवले. पीपीटी तयार केलेल्या संगणक व इंटरनेटचा वापर करून पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन अभ्यासक्रमाशी निगडित नवनवीन माहिती मिळवून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आली. मुलांचे रंजक विश्व त्यांच्या शिकण्यासाठी काय असतं हे कधी टीव्ही सिनेमातून तर अलीकडे मोबाईल वरून अधिक फुलत आहे हाच धागा पकडून त्यांना एखादा भाग सहजरित्या समजून सांगता येत असे.
शासनाने शिक्षक आणि प्रशासन यासाठी उपयुक्त असे मित्रा अँड्रॉइड ॲप तयार केले व राज्य शासनाच्या मित्रा या महत्वकांक्षी अँपसाठी काम करण्याची संधी मला मिळाली, यासाठी तात्कालिक शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पुरस्कृत केले व आत्ताच्या राज्यशासनाच्या दीक्षा ऍपवर ही शैक्षणिक साहित्य उभारण्याची संधी मिळाली. मी तंत्रस्नेही झाले व विद्यार्थ्यांना मी जी अभ्यासात रुची निर्माण केली तसेच मैत्रिणींनी पण त्यांच्या शाळेत करायला हवे यासाठी शिक्षकांना तंत्रस्नेही प्रशिक्षण घेण्यासाठी प्रेरित केले; परंतु मला हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता तेव्हा शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव, शिक्षण संचालक यांच्याशी चर्चा करुन महिला शिक्षिकांना तंत्रस्नेही करण्यासाठी महिला शिक्षिका तंत्रस्नेही चळवळ उभारण्यात राज्य शासनाला मदत केली व असे करतांना राज्यातून जेव्हा ८०० शिक्षिकांना कॉल केले तेव्हा प्रत्यक्षपणे ८० शिक्षिका पुढे आल्या. त्यांना राज्य स्तरावर राज्य शासनाच्या शिक्षण विभागाच्या मदतीने तंत्रस्नेही प्रशिक्षण देण्यात आले, जेणेकरून त्यांच्यामार्फत पूर्ण राज्यभर तंत्रस्नेही प्रशिक्षण चालू राहील अन आज त्याच तंत्रस्नेही चळवळीचा परिणाम म्हणून पूर्ण राज्यभरात हजारोंच्या संख्येने महिला शिक्षिका तंत्रस्नेही आहेत. तंत्रज्ञानाच्या मदतीने त्या शिक्षण सोपे करून विद्यार्थ्यांसमोर मांडत आहेत.
मायक्रोसॉफ्ट ची ३ वर्षा पासून एम आई इ एक्स्पर्ट असल्यामुळे स्काईप कॉल च्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांचा जगातील सर्व देशातील शाळांच्या मुलांशी संवाद घडून आणणे व सर्व देशाचा परिचय, तेथील संस्कृती, शिक्षण पद्धतीची ओळख घडवून आणणे हा माझा मानस आहे व आजपर्यंत कितीतरी देशाशी असा संवाद घडवून आणला आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन त्यांच्यात एकविसाव्या शतकाला सामोरे जाण्याचे कौशल्य निर्माण होईल. तसेच शहरी भागात उपलब्ध असलेल्या सुविधांना कायम ग्रामीण विद्यार्थी मुकलेले आहेत, पण आधुनिक युगात मोबाईलच्या माध्यमातून मायक्रोसॉफ्टच्या मदतीने विविध ऍपची माहिती करून घेत विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिक एक्सप्लोरर ॲपच्या मदतीने खगोलीय विषयाबद्दल रुची वाढवण्यासाठी सूर्यमालाच प्रत्यक्ष वर्गात आणली तो प्रयोग राज्यभर गाजला. प्रत्येक शाळेत त्याच्या मदतीने सूर्यमाला शिकवली गेली. मग अँप च्या मदतीने सूर्यमाला, हत्ती, वाघ, सिंह डायनासोरसारखे अवाढव्य प्राणी वर्गातले वर्गात टेबलावर दुनिया उभी राहिली.
आज ग्रामीण भागातला विद्यार्थी सर्व काही उभे करू शकतो त्याचे कारण तंत्रज्ञानात झालेल्या क्रांतीचा शिक्षण क्षेत्रात झालेला उपयोग होय. महिलांच्या बुजरेपणाला दूर करत त्यांना मुंबई ते दिल्ली आणि चेन्नई ते ऑस्ट्रेलिया वारी करण्यात या छोट्याश्या मोबाईल नामक यंत्राचा खूप मोठा वाटा आहे हे पटवून देण्यात यश मिळाले. गुरू म्हणून एखाद्या विद्यार्थ्याला कदाचित ज्ञानदान करणं परिपूर्ण होणार नाही, मात्र त्या योग्य मार्ग निवडण्याचे स्वातंत्र्य आणि स्वतंत्र विचार करण्याची शिकवण देणं, आणि वेगळा मार्ग चोखाळण्याची संधी निर्माण करणं हे एका गुरुसाठी कायम अभिमानास्पद असते.
अखेरीस इतके सांगेल की रस्त्यावरून चालताना ठेच लागलेला दगड ही शिकवतो की खाली बघून चला, आपण तर चालती बोलती माणसं असतो, प्रत्येकाकडून काही ना काही शिकले जाते, ते शिकणे महत्वाचे. आजच्या या पुण्य दिनानिमित्त सर्वच आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या ज्ञात अज्ञात गुरुवर्याना मनःपूर्वक शुभेच्छा.
– श्रीमती मनीषा गिरी, राहुरी ( लेखिका सन २०१७ मधील माहिती तंत्रज्ञानातील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पहिल्या महाराष्ट्रीयन महिला शिक्षिका आहेत. )
- उद्धव ठाकरेंची धडपड मुख्य विरोधी पक्ष होण्यासाठीच ??
सभेत भाजपवर तोंडसुख घेणाऱ्या उद्धव ठाकरे गटाची वास्तवात भाजपशी लुटूपुटूची लढाई ?? - बीड मधून लीड कुणाला ???3M आणि 3B ठरवणार…
वरकरणी भाजप साठी सोप्प्या वाटत असलेल्या बीड लोकसभेचा लेखाजोखा - | अन्वयार्थ | भाजपाचे निष्ठावान आमदार रविंद्र चव्हाण पक्षात अस्वस्थ..?
- सर्व सामान्यांच्या स्वयंपाक घरातील खर्चाची गणित दिलासादायक करणारा अर्थतज्ञ लोकप्रतिनिधी..
- एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री…!
ताई आपल्यामुळे मला तंत्रज्ञानाची ओढ लागली
खूपच सुंदर लेख.
Excellent.good job.well done.congratulation.