‘ याचे ‘ दर वाढले पण सामान्यांना बसणार नाही फटका..!



| नवी दिल्ली | इंधनावरील उत्पादन शुल्कात केंद्राकडून घसघशीत वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलचे उत्पादन शुल्क प्रति लिटर १० रुपयांनी, तर डिझेलचे उत्पादन शुल्क १३ रुपयांनी वाढवण्यात आले आहे. मात्र उत्पादन शुल्कवाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या किरकोळ किमतीत कोणतेही बदल होणार नसल्याने सर्वसामान्य वाहनचालकांना या दरवाढीचा फटका बसणार नाही.

पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात केल्याने एक लाख ६० हजार कोटींचा वाढीव महसूल मिळण्याचा अंदाज आहे. कच्चे तेल स्वस्त झाल्याने तेलकंपन्या भार सोसणार असल्याची माहिती आहे. उत्पादन शुल्कवाढीचा किरकोळ विक्रीवर परिणाम होणार नाही

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (Central Board of Indirect Taxes and Customs) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पेट्रोलवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्कात प्रतिलिटर २ रुपये आणि रस्ते उपकरामध्ये (रोड सेस) ८ रुपये प्रतिलिटर वाढ करण्यात आली आहे. तर डिझेलच्या विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्कात प्रतिलिटर ५ रुपये आणि रस्ते उपकरामध्ये ८ रुपये प्रतिलिटर वाढ करण्यात आली आहे.

पेट्रोलवरील एकूण उत्पादन शुल्क आता लिटरमागे ३२.९८ रुपये, तर डिझेलवरील उत्पादन शुल्क आता लिटरमागे ३१.८३ रुपये इतके झाले आहे. २०१४ मध्ये मोदी सरकारने सत्ता हाती घेतली, तेव्हा पेट्रोलवरील कर ९.४८ रुपये प्रतिलिटर होता, तर डिझेलवरील कर ३.५६ रुपये होता, अशी माहिती ‘टाईम्स ऑफ इंडिया’ वृत्तपत्राने दिली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किंमती खाली आल्यामुळे नफ्यात वाढ करण्यासाठी सरकारने उत्पादन शुल्कात वाढ करण्याची मार्चनंतरची ही दुसरी वेळ आहे. मार्च महिन्यात पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर ३ रुपये वाढ करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय तेलाचे दर दोन दशकांच्या नीचांकी पातळीवर घसरल्यानंतरही १६ मार्चपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलण्यात आल्या नव्हत्या.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *