जागर इतिहासाचा : वीरगळ वीरांची प्राचीन लेखमाला..!

दुर्ग भ्रमंती, प्राचीन वास्तू भ्रमंती, ऐतिहासिक वारसा भ्रमंती करत असताना एखाद्या गावात युद्धप्रसंग कोरलेली दोन-तीन फूट उंचीची शिळा आपल्याला कधीतरी दिसते. हे नेमके काय आहे याची माहिती नसतेच, पण कधी कधी अज्ञानापोटी गावकऱ्यांनी देखील त्याची उपेक्षा केलेली असते. अनाम वीरांच्या स्मृतींच्या या खुणा इतिहासाच्या मूक साक्षीदारच असतात. महाराष्ट्रात बर्‍याच ठिकाणी गावच्या वेशीजवळ, मंदिरांच्या प्रांगणात, किल्ल्यांच्या वाटांवर काही शिळाशिल्पे आढळतात. त्यावर युद्धातील प्रसंग तसेच धारातीर्थी पडलेले वीर आढळतात. तेच हे वीरगळ. वीरगळ हा शब्द वीर(संस्कृत) आणि कल्लू (कन्नड) अशा दोन शब्दांचा मिळून झाला आहे. कल्लू म्हणजे दगड अथवा शिळा. वीरपुरुषाची शिळा म्हणजेच वीरगळ. हे वीरगळ महाराष्ट्रात आणि कर्नाटकात बहुसंख्येने दिसतात.

वीरगळ : 

पूर्वीच्या प्रथेप्रमाणे एखाद्या वीरपुरुषाने गावावर आलेल्या परचक्राचा सामना केला, गाईगुरांना पळवून लावणार्‍यांपासून त्याचे संरक्षण केले, दरोडेखोरांकडून गावाचे संरक्षण केले आणि हे करता करता लढाईत त्याचे प्राणोत्क्रमण झाले तर त्याचे स्मारक ऊभारण्यात येई. रणांगणावर वीरमरण येणे हे भारतीय लोकजीवनात गौरवास्पद आणि पुण्यप्रद मानले गेले आहे. असे वीरमरण प्राप्त झालेल्या वीराचे उचित स्मारक वीरगळच्या रूपाने गावोगावी उभारलेले आपल्याला पाहायला मिळते. स्थानिक लोक तर वीर गळून पडला म्हणून त्याचे स्मारक ते वीरगळ, असा अगदी सुटसुटीत अर्थ सांगतात.

एका पाषाणाच्या शिळेवर काही विशिष्ट शिल्पांकन करून तो पाषाणस्तंभ उभारणे. हे वीरगळ तयार करण्याची एक खास पद्धत आहे. उभट, आयताकृती दगड, त्याच्या चारही बाजूंना चौकटी कोरलेल्या, वर घुमटी अशी याची रचना. आकाराने सामान्यत: अडीच ते तीन फूट उंचीच्या शिळेवर एकावर एक असे तीन किंवा चार चौकोन खोदून त्यात या वीराच्या कथेचे अंकन केलेले असते. सर्वात खाली तो वीर मृत्युमुखी पडलेला दाखवतात. त्याच्या वरच्या थरात त्याचे युद्ध चाललेले दाखवले जाते. त्याच्या वर तो मृत झाला असून त्याला अप्सरा स्वर्गात घेऊन जात असल्याचे कल्पिले आहे. तर सर्वात वरच्या चौकोनात तो शिवमय झाला असे दाखवण्यासाठी तो शिवपिंडीची पूजा करताना दाखवण्याची प्रथा आहे. युद्धात मरण आले तर तुम्हाला हमखास स्वर्गप्राप्ती होते हे जनमानसावर बिंबवणे हा देखील त्यामागील दृष्टिकोन असावा. यात अजून वर त्या पाषाणाच्या दोन बाजूंना चंद्र-सूर्य दाखवलेले असतात. याचा अर्थ असा की जोपर्यंत आकाशात चंद्र-सूर्य आहेत तोपर्यंत त्या वीराचे स्मरण आम्हाला होत राहील असे सूचित करायचे असते. मृत्युमुखी पडलेल्या वीराची पत्नी जर त्याच्यासोबत सती गेली असेल तर त्या वीरगळावर स्त्रीचा हातदेखील कोरलेला असतो. त्या हातात बांगडय़ा दाखवलेल्या असतात. काही ठिकाणी नुसताच स्त्रीचा हात कोरलेले दगड दिसतात. यांना सतीशिळा असे म्हटले जाते. चारी बाजूंच्या चौकटींमध्ये युद्धाचे प्रसंग कोरलेले, एका चौकटीवर आडवा पडलेला वीर आणि घुमटीवर चंद्र सूर्य कोरलेले अशी यांची सर्वसाधारण रचना. वीरगळांवर वीराचे नाव कोरण्याची प्रथा नाही किंवा युद्धाची माहिती लिहिलेले शिलालेखही त्यावर आढळत नाहीत. काही वीरगळांवर सागरी युद्धेही कोरलेली आढळतात. मुंबईतल्या एका वीरगळावर जहाजांमधील युद्ध कोरलेले आहे. हा वीरगळ उत्तर कोकणातल्या शिलाहार राजवटीमध्ये खोदला गेला. महाराष्ट्रातील बहुतांश वीरगळ हे शिलाहारकाळ आणि यादवकाळात मोठ्या प्रमाणावर उभारले गेले आहेत.

खरे तर संशोधकांच्या अभ्यासानुसार, वीरगळांची परंपरा कर्नाटकातून महाराष्ट्रात आल्याचे सांगितले जाते. कर्नाटकात दहा-बारा फूट उंचीचे मोठे शिल्पपट असलेले वीरगळ पाहायला मिळतात. त्यांच्यावरील युद्धप्रसंग अगदी तपशीलवर कोरलेले दिसतात. कर्नाटकात अनेक वीरगळांवर लेखदेखील कोरलेले आहेत. महाराष्ट्रात मात्र अगदी अपवादानेच लेख पाहायला मिळतात. त्यामुळे आपल्याकडचे वीरगळ हे कुठल्या वीरासाठी तयार केलेले आहेत याचा संदर्भ मिळणे कठीण जाते. महाराष्ट्रात देखील अनेक गावागावांतून असे वीरगळ पाहायला मिळतात. एखाद्या गावात वीरगळ असणे हे त्या गावाचे प्राचीनत्त्व अधोरेखित करणारे असते. भूतकाळात इथे युद्धाचा प्रसंग घडला होता आणि कोणी वीर धारातीर्थी पडले होते याची मूकपणाने साक्ष आज हे वीरगळ आपल्याला देत असतात.

रायगड जिल्ह्यतल्या माणगाव तालुक्यात असलेले उंबर्डी हे गाव म्हणजे वीरगळांचे संग्रहालयच म्हणावे लागेल. इथे असलेल्या शिवमंदिराच्या आवारात अत्यंत देखणे असे ४५ वीरगळ ठेवलेले आहेत. इथे सतीचे हात असलेले अत्यंत रेखीव वीरगळ पाहायला मिळतात. कोणी महत्त्वाचा सरदार इथल्या लढाईत मृत्युमुखी पडला असणार. इथूनच शेजारच्या दिवेआगरच्या रस्त्यावरील देगावला शिवमंदिरात चारही बाजूंनी घडवलेले अनेक वीरगळ ठेवले आहेत. त्यातल्या एका वीरगळावर दहा डोकी आणि वीस हात असलेल्या व्यक्तीचे अंकन केलेले दिसते. अगदी आगळावेगळा हा एकमेव वीरगळ आहे. तसेच मुंबई नाजिक असलेल्या बोरिवली जवळच्या एक्सर या गावात तर वीरगळावर नौकायुद्ध दाखवलेले आहे. अत्यंत अप्रतिम असा हा वीरगळ शिलाहार राजा सोमेश्वर आणि देवगिरीचा राजा महादेव यांच्यातील युद्धाचा प्रसंग दाखवणारा आहे. इतका आकर्षक आणि देखणा वीरगळ महाराष्ट्रात आपल्याला सापडत नाही. सातारा जिल्ह्यतील किकली, नगर जिल्ह्यतल्या श्रीगोंदा या गावी असेच अनेक वीरगळ दिसतात. राजापूरच्या धूतपापेश्वर मंदिराच्या बाहेर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यतील वाडा इथल्या विमलेश्वर मंदिराच्या बाहेर असे देखणे वीरगळ रांगेत मांडून ठेवलेले आहेत. त्याचबरोबर अनेक किल्ल्यांवर आजही असे अनेक वीरगळ विखुरलेले पाहायला मिळतात. पालीजवळील सुधागडवर अनेक वीरगळ आणि काही सतीशिळा आहेत. मुरबाडजवळील सिद्धगडावर असेच अनेक वीरगळ दिसतात. तसेच रतनववाडीतील अमृतेश्वर मंदिराच्या बाजूला असणारा वीरगळ, राजमाचीच्या भैरवनाथ मंदिराच्या बाजूस असणारा वीरगळ, माहुली किल्ल्यावरील भग्नावस्थेतील वीरगळ या देखील याचे उत्तम उदाहरण आहेत.

गधेगाळ किंवा हत्तीगाळ :

वीरघळीशी साधर्म्य साधणारी पण पराक्रमाऐवजी शापवाणी, तसेच नियम मोडल्यास मिळणारी शिक्षा आदी बाबत माहिती देणारी शिल्पे असतात. ही शिळाशिल्पे बहुतेक वेळा शापवाणी (कर्स मेकर्स) करण्यासाठी निर्मिली गेली. वीरगळांप्रमाणेच यांचा उगम शिलाहार कालीन. यादव काळातही हे गधेगाळ कोरले गेले. वीरगळांसारखीच यांची रचना. उभट आयताकृती दगड आणि वर घुमटी. मात्र या गधेगाळांवर शिलालेख आढळतात. मुख्य म्हणजे हे शिलालेख देवनागरीत आहेत ते ही मराठी भाषेत.
घुमटीवर चंद्र सूर्य कोरलेले, त्याखालच्या चौकटीवर शिलालेख कोरलेला. वर काही मंगलवचने तर खालच्या बाजूस अभद्र वचने कोरलेली व त्या खाली अजून एक शिल्प कोरलेले. त्या शिल्पात स्त्रीचा गाढवाबरोबर किंवा हत्तीबरोबर संकर दाखवलेला. हे गाढव शिल्प म्हणजे गधेगाळ व जिथे हत्ती असेल ते हत्तीगाळ.

गधेगाळ :

• नागाव येथील गधेगाळ
नागाव, अलिबाग येथील अक्षी गावातील गधेगाळ शिल्प सर्वात प्राचीनतम मानले जाते. शके ९३४ अर्थात इ.स. १०१२ मधला हा संकृत मिश्रीत मराठी शिलालेख मराठीतील सर्वात आद्य लेख आहे. श्रवणबेळगोळच्या गोमटेश्वराच्या सर्वमान्य आद्यलेखापेक्षाही जुना असल्याचे इतिहास अभ्यासक सांगतात. डॉ. शं. गो. तुळपुळे यांनी याचे संपूर्ण वाचन केले.

गीं सुष संतु। स्वस्ति ओं। पसीमस- मुद्राधीपती।
स्त्री कोंकणा चक्री- वर्ती। स्त्री केसीदेवराय।
महाप्रधा- न भइर्जु सेणुई तसीमीनी काले प्रव्रतमने।
सकु संवतु: ९३४ प्रधा- वी सवसरे: अधीकू दीवे सुक्रे बौ- लु।
भइर्जुवे तथा बोडणा तथा नऊ कुवली अधोर्यु प्रधानु।
महालषु- मीची वआण। लुनया कचलीज-

ह्याचा अर्थ असा :
कल्याण होवो. पश्चिम समुद्राधिपती श्री. कोकण चक्रवर्ती श्री. केसीदेवराय याचा महाप्रधान भइर्जू सेणुई याने शक संवत ९३४ प्रभव संवत्सर अधिक कृष्ण पक्ष शुक्रवार या दिवशी देवीच्या बोडणासाठी नऊ कुवली धान्य नेमून दिले. जगी सुख नांदो.
त्या खालच्या तीन ओळींत मात्र अभद्र वचन कोरलेले आहे. ते असे, हे शासन कुणी भंग करील तेहाची माय गाढवे झबिजे व त्या खालच्या शिल्पामध्ये गाढव व स्त्रीचा संकर दाखवलेला आहे. ह्या शिलालेखाच्या वरील भागात चंद्र सूर्य कोरलेले असून मधल्या ओळी मात्र आता बर्‍याचशा पुसट झालेल्या आहेत.

अंबेजोगाई-वेळापूर इथल्या गधेगाळामध्ये संस्कृतमध्ये शापवाणी कोरलेली आहे.

स्वदत्तां परदत्तां वा यो हरेत वसुंधरा |
षष्टिं वर्ष सहस्त्रानि विष्ठायां जायते कृमि: ||

अर्थ : स्वकीय किंवा परकीय जो या वसुंधरेचे हरण करेल, असं करणारा सहा हजार वर्ष विष्ठेमधला कृमी बनेल

तर काटी येथील गधेगाळात ‘हे जो मोडी राजा अथवा प्रजा तेयाची मायेसि गाढोअ’ अशा प्रकारची मराठी वाक्यरचना आहे.

महाराष्ट्रातील काही गधेगाळ पुढीलप्रमाणे
१. कदंब भरूडदेव याचा सावरगाव लेख (इ.स. ११६४)
२. शिलाहार अपरादित्य याचा लोनाड लेख (मराठी)
३. शिलाहार अपरादित्य(द्वि.) याचा परळ लेख.
४. शिलाहार सोमेश्वरदेव याचा चांजे लेख( या लेखात शब्दरूपात गधेगाळ नसून शिल्परूपात आहे)
५. यादव रामचंद्र देव याचा पूर शिलालेख (इ.स. १२८५ फक्त शिल्परूपात)
६. यादव रामचंद्र देव याचा वेळापूर शिलालेख (इ.स. १२८५)
७. वेळूस शिलालेख (इ.स. १४०२)
९. शिलाहार राजा अनंतदेवाचा दिवेआगर शिलालेख(इ .स. १२५४)

अशी हीन दर्जाची शापवाणी कोरीव लेखांमध्ये कशी काय वापरली गेली याचा काहीच अंदाज येत नाही. यादव-शिलाहारांच्या लेखांतच आणि मुख्यत्वे मराठी भाषेतच ती आढळली आहेत आणि त्यातही गधेगाळीबरोबर बरेच वेळा शिवलिंगही असल्याने शैवपंथियांमध्येच अशा प्रकारची शिल्पे जास्त प्रचलित असावीत.

हत्तीगाळ :

रतनवाडीतल्या अमृतेश्वर मंदिराच्या प्रांगणात एक हत्तीगाळ जमिनीत अर्धवट रोवलेला आढळतो. घुमटीवर चंद्र-सूर्य कोरलेले असून मधल्या चौकटीत शिवपिंडीचे पूजन दाखवले आहे. तर खालच्या बाजूस हत्तीबरोबर संकर दाखवला आहे. शिलालेखाच्या ओळी पूर्णपणे बुजलेल्या आहेत. जो कोणी ह्या शिवलिंगाच्या पूजेचा अव्हेर करेल त्याची अशी अवस्था होईल असा ह्या शिल्पाचा अर्थ काढता येतो. हे शिल्प शिलाहार झंझ राजाच्या कारकिर्दीत घडवले गेले असावे (साधारण १० वे शतक) कारण अमृतेश्वराच्या मंदिराचा कर्ताही तोच आहे. मंदिराशेजारीच काही वीरगळ पण आहेत.

‘‘जान जाय, पर वचन न जाय,’’ म्हणत देश-धर्मासाठी प्रसंगी प्राणाची आहुती देणाऱ्या राजस्थान भूमीतील धारातीर्थी पडलेल्या वीरांच्या स्मरणार्थ उभारलेल्या वीरगळांना ‘पालिया’ या नावाने ओळखले जाते. मात्र या वीरगळांचे स्वरूप स्मृतिस्तंभ असून, ते दगडांचे नाहीत. त्यांच्या निर्मितीसाठी टिकाऊ लाकडांचा उपयोग केला गेला आहे. रणांगणावर प्राणाची आहुती देणाऱ्या सैनिकांच्या स्मरणार्थ कायमस्वरूपी वीरगळ उभारण्यासाठी इंग्रज राज्यकर्ते बरेच दक्ष होते. १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामात वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांसाठी दिल्ली-लखनौ येथे जे स्मृतिस्तंभ (वीरगळ) उभारले गेले, त्यापाठीमागे इंग्रज शास्ते आहेत. पहिल्या महायुद्धात धारातीर्थी पडलेल्या भारतीय सैनिक – अधिकाऱ्यांच्या स्मरणार्थ उभारलेले ‘इंडिया गेट’ म्हणजे दिल्ली महानगरीची ओळखच झाली. ग्रीक – रोमन कमान कलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून ते प्रसिद्ध आहे.

वीरगळ आपल्याला अज्ञात इतिहासाच्या पाऊलखुणा उलगडण्यासाठी मदत करत असतात, परंतु अज्ञानामुळे अनेक ठिकाणी त्यांना शेंदूर फसलेला दिसतो. अनेक ठिकाणी त्यांना शनीचा दगड म्हणून तेल वाहिलेले दिसते. त्यांचा वापर हा कपडे धुण्यासाठी घासायला उत्तम दगड म्हणून करणारेही कमी नाही. तर रांजणगाव जवळच पिंपरी दुमाला या गावात, मंदिराचा जीर्णोद्धार करताना मंदिराच्या भिंतीत अनेक वीरगळदेखील बसवलेले आढळतात. वीरगळ म्हणजे आपल्या इतिहासाचा थेट साक्षीदार असलेला ठेवा. त्याचे काळजीपूर्वक जतन करायला हवे. त्याचे संवर्धन पूर्णार्थाने शक्य नसले तरी किमान त्याची नोंद करून, गावकऱ्यांना त्याचे महत्त्व समजावून देणे इतपत तरी आपण करू शकतो.

संदर्भः
१. प्राचीन मराठी कोरीव लेख’ व ‘मराठी वाङ्मयाचा इतिहास’ संपादक : डॉ. शं. गो. तुळपुळे
२. महाराष्ट्राच्या इतिहासाचे साक्षीदार -प्रा. कल्पना रायरीकर, डॉ. मंजिरी भालेराव.
३. आशुतोष बापट यांचा विशेष लेख
४. अरुण मळेकर यांचा विशेष लेख

– प्राजक्त झावरे पाटील, ठाणे 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *