‘ क्या हुवा तेरा वादा ‘ – ऋषी कपूर यांची अकाली एक्झिट..!



| मुंबई |  अभिनेता इरफान खान यांच्या निधनानंतर बॉलिवूडच्या चाहत्यांसाठी चिंता वाढवणारी अजून बातमी येऊन धडकली आहे. बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते ‘ऋषी कपूर’ यांचे आज निधन झाले आहे. अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला पुष्टी दिली आहे.

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे मुंबईत निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. बुधवारी त्यांना मुंबईतील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिकेत कर्करोगावर उपचार घेतल्यानंतर ऋषी कपूर सप्टेंबरमध्ये भारतात परतले होते. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये ऋषी कपूर यांना दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

अभिनेता इरफान खानच्या निधनाला २४ तासदेखील पूर्ण होत नाहीत, तर कलाविश्वातील ही दुसरी दु:खद बातमी समोर येत आहे. संपूर्ण चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला. ‘तो गेलाय.. ऋषी कपूर गेलाय.. आणि मी उध्वस्त झालोय’; असं ट्विट बिग बींनी केलं.

ऋषी कपूर यांनी जवळपास ९२ चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. सगळ्याच पिढ्यांमध्ये त्यांचा चाहतावर्ग आहे. ‘मेरा नाम जोकर’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. ‘बॉबी’, ‘दामिनी’,’दो दुनी चार’, ‘कर्ज’, ‘प्रेमरोग’, ‘चांदनी’ या चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *