- १ मे २०२० रोजी आपल्या राज्याच्या स्थापनेला ६० वर्ष पूर्ण होत आहेत.
- यावर्षी राज्यात महाराष्ट्र दिन ” हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याच्या दृष्टीने निर्देश देण्यात येत आहेत.
मुंबई / प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दिन साजरा करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, त्यासाठी शासनाने नियमावली बनवली आहे. १ मे २०२० रोजी आपल्या राज्याच्या स्थापनेला ६० वर्ष पूर्ण होत आहेत. परंतु कोरोनाचे थैमान आणि ३ मे पर्यंत असलेला लॉक डाऊन यामुळे महाराष्ट्र दिन कसा साजरा होणार या बाबत संभ्रावस्था होती. परंतु आजच्या शासन निर्णयाने त्या बाबत सुस्पष्टता आणली आहे..
शासन परिपत्रकानुसार महाराष्ट्र राज्य स्थापनेला दिनांक १ मे, २०२० रोजी ६० वर्षे पूर्ण होत आहेत. परंतु कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी, यावर्षी राज्यात महाराष्ट्र दिन ” हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याच्या दृष्टीने खालील निर्देश देण्यात येत आहेत:
१. राज्यातील मंत्रालय व सर्व जिल्हा मुख्यालयातील जिल्हाधिकारी कार्यालये या ठिकाणी एकाच वेळी सकाळी ८.०० वा. फक्त ध्वजारोहण करण्यात यावे.
२. या ठिकाणी केवळ पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद एवढयाच पदाधिकारी/अधिकारी यांनी उपस्थित रहावे.
३. इतर मान्यवरांना आमंत्रित करण्यात येवू नये.
४. कवायतीचे आयोजन करण्यात येवू नये.
५. विधीमंडळ, मा.उच्च न्यायालय व इतर संविधानिक कार्यालयांमध्ये कमीत कमी उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात यावे.
६. ध्वजारोहण करणारे पालकमंत्री महोदय काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित राहू न शकल्यास, जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी यांनी ध्वजारोहण करावे.
यामध्ये शाळांमध्ये साजरा होणारे झेंडावंदन या बाबत स्पष्ट उल्लेख नाही. त्यामुळे त्या बाबत अंशतः संभ्रम निर्माण झाला आहे.