लोक संवाद : समवेत प्रतिभावान युवा कवयित्री ज्योती भारती..!

आज लोकसंवाद मध्ये आपल्या सोबत आहेत, युवा कवयित्री ज्योती भारती…! त्यांचे शिक्षण मुंबई विद्यापीठातून एम ए (मराठी आणि हिंदी साहित्य), बी.एड झाले आहे. त्यांनी महाविद्यालयांमध्ये मराठी, हिंदी विषयांचे अध्यापन केले असून सध्या त्या स्वतःचे इंटरनॅशनल बोर्ड चे मराठी आणि हिंदी विषयांचे अध्यापन देणारे वर्ग घेत आहेत..! सोशल चौकट सोसण्यापलीकडची हा त्यांचा काव्यासंग्रह प्रकाशनच्या वाटेवर आहे. एकंदरित त्यांचे कविता आणि हिंदी शेर सहजतने रसिकांना भावत असून ते मनाचा ठाव घेतात..!

त्यांच्याशी दैनिक लोकशक्ती ने साधलेला संवाद :


प्राजक्त झावरे पाटील ( मुलाखतकार) : नमस्कार ज्योती जी 🙏🏻 चला तर मग आपण गप्पा मारायला सुरूवात करूया..!

ज्योती भारती : नमस्कार प्राजक्त सर ..! चला करूया

प्राजक्त झावरे पाटील ( मुलाखतकार) :  लिहायची, वाचण्याची आवड किंवा प्रेरणा म्हणुया कुठे आणि कशी निर्माण झाली..?

ज्योती भारती : वाचनाची आवड सातवीत असल्यापासून निर्माण झाली. माझे वडील हिंदी आणि मराठी भाषेचे गाढे वाचक होते, त्यांच्यामुळे खूप प्रसिद्ध लेखकांचे साहित्य घरातच वाचनासाठी उपलब्ध होते (अण्णाभाऊ साठे, डॉ.आंबेडकर आणि महात्मा फुले मुख्यत्वे) त्यानंतर महाविद्यालयीन जीवनात मी अत्याधिक वाचन केले. विशेषतः कथा आणि आत्मचरित्र वाचण्याची आवड जास्त होती. कविता लिहिण्याची प्रेरणा अमृता प्रीतम यांच्या साहित्यातून निर्माण झाली.

प्राजक्त झावरे पाटील : व पु म्हणतात तसे स्वतःची ओळख पटण्याचा क्षण एकदाच येतो आयुष्यात..! असा क्षण या लिखाणाच्या प्रवासात आला आहे, असे वाटते..?

ज्योती भारती : हो नक्कीच आला. माझी पहिलीच कविता जी मी “अमृता प्रीतम” यांच्या जीवनावर आधारित लिहिली होती, त्याच कवितेला तेव्हा आंतर महाविद्यालयीन काव्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला त्यामुळे काव्य लेखनाचा उत्साह वाढला पण तो उत्साह मला फार काळ टिकवता आला नाही. लग्नानंतर जणू कवितेशी, साहित्याशी नाते तुटले.

चार वर्षांपूर्वी माझे वडील वारले, त्यांच्या जाण्याने आयुष्यात एकटेपणाची एक पोकळी निर्माण झाली आणि त्याच वेदनेतून बाहेर पडण्यासाठी जगण्याचा मुख्य आधारस्तंभ म्हणून मी कवितेला पुन्हा आयुष्यात नवी वाट करून दिली. अर्थात त्या एकाकीपणाने मला स्वतःला ओळखण्याची संधी दिली.

प्राजक्त झावरे पाटील: आपण व्यक्त होताना अधिकतर माध्यम कविता हेच दिसून येत आहे..? मध्ये मध्ये हिंदी शेर पण दिसतात, तर कविताच मनाला अधिक भावते का? आणि कविताच का.?

ज्योती भारती : मला स्वतःला नेहमी या गोष्टीचे आश्चर्य वाटते की चारोळी, हिंदी शेर किंवा एक पूर्ण कविता अथवा गजल या सगळ्या काव्य प्रकारातून मी स्वतःला इतक्या सहजपणे कशी व्यक्त करू शकते ? It’s a god gift..! कदाचित; पण वास्तव हे आहे की संदर्भ कोणताही असो…मी त्यावर कविता करू शकते. ती कविता फार ग्रेट नसेल पण तो क्षण मी काव्यात पकडू शकते, म्हणून “कविता” हे माध्यम मला व्यक्त होण्यासाठी प्रभावी वाटते. एखादे माध्यम काळजाचा ठाव घेते. ते माध्यम माझ्यासाठी कविता आहे. मला असे वाटते की, “प्रत्येक माणसाचे जगणे ही एक नितांत सुंदर कविता असते” म्हणूनच मला कविताच अधिक भावते.

प्राजक्त झावरे पाटील : लेखक किंवा कवी या उपजत असतो की जिवनाभुवातून घडत जातो..?

ज्योती भारती : लोक जेव्हा माझी कविता वाचतात तेव्हा एखादे दोन लोक असे म्हणतात की, “ताई तुमच्या लेखणीत एक दैवी देणगी आहे असे वाटते” कारण मी कोणत्याही विषयावर कविता करू शकते म्हणून ते असे म्हणतात. पण मला वैयक्तिक विचारलं तर माझं मत असे आहे की, “कवी त्याच्या जीवनातील अनुभवातून आणि पिडेतून घडत असतो, संघर्ष हा कवितेचे मूळ आहे.” अर्थात, हे मूळ व्यक्तीसापेक्ष वेगळे असू शकते.

प्राजक्त झावरे पाटील : आपण बऱ्या अंशी स्त्रीवादी साहित्याकडे झुकलेल्या वाटता..! स्त्री आणि वेदना, स्त्री आणि भोग ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू वाटतात का.?

ज्योती भारती : जवळ जवळ सत्तर टक्के कविता या स्त्रीकेंद्री आहेत, एखाद दोन (चंडी, सावित्री किंवा विटाळ) यांसारख्या कविता स्त्रीवादी असतील. स्त्रीवादी कविता आणि स्त्रिकेन्द्री कविता यामध्ये फरक आहे, स्त्रीकेंद्रि कविता फक्त स्त्री विश्व- दुःख रेखाटतात पण स्त्रीवादी कविता त्यापुढे जाऊन स्त्रीच्या समान हककासाठी बंडखोरी करतात, त्या स्त्री विटंबनेच्या आणि दुय्यम स्थानाच्या संघर्षातून येत असतात.

“स्त्री आणि वेदना” या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत… हे सत्य आहे! कारण स्त्री म्हणून कोणत्या न कोणत्या बाबतीत ती प्रत्येक मुलगी शारीरिक, मानसिक अथवा भावनीक पातळीवर आयुष्यात अनेकदा स्त्री म्हणून अनेक वेदनांचा अनुभव घेते.

पण “स्त्री आणि भोग” हे मुद्दे वेगळे आहेत. स्त्री म्हणून काही वेदना या समाजात स्त्रीच्या वाट्याला येतातच. पण स्त्री म्हणून विटंबना सहन करत ती जे भोग स्वीकारत जाते ते भोग ती प्रतिकार करून टाळू शकते, किंबहुना तिने ते टाळावेत.

प्राजक्त झावरे पाटील : आपला जीवनसाथी, आपले मित्र यांचा आपल्या कवितेवर काही प्रभाव असतो का..?

ज्योती भारती : हो नक्कीच असतो. मित्र मैत्रीण यांचे आयुष्य, त्यातील त्यांचे अनुभव आपल्या कवितेचे विषय होतात. तसेच जीवनसाथी बद्दल विचाराल तर, स्त्री पुरुष नातेसंबंध आणि प्रेमभाव तसेच शृंगारिक कविता या जिवनसाथीच्या अनुषंगाने येतात.

प्राजक्त झावरे पाटील : सद्य परिस्थितीवर भाष्य करणारे मग ते समाजकारण असेल किंवा राजकारण , अश्या आशयाच्या कविता करायला आवडते का..?

ज्योती भारती : नक्कीच आवडते, मला राजकारण आणि समाजकारण यावर लिहायला आवडते. पण माझा असा अनुभव आहे की स्त्री कवयित्री जेव्हा राजकारणावर भाष्य करते तेव्हा ते लोकांना पटत नाही किंवा अजूनही राजकारण हा स्त्रियांच्या लेखनाचा प्रांत नाही असा समज आपल्या समाजात रूढ आहे.

प्राजक्त झावरे पाटील : की स्त्रीवादी किंवा निसर्ग, प्रेम या उत्कट भावना कवितेत याव्यात म्हणून अट्टाहास असतो..?

ज्योती भारती: नाही असा काही अट्टाहास नसतो, जी भावना जशी मनात येते, ती भावना मी कवितेत रेखाटण्याचा प्रयत्न करते त्यावर काळ आणि परिस्थिती यांचा प्रभाव असतो.

प्राजक्त झावरे पाटील : हिंदी की मराठी आई आणि मावशी म्हणुया हवे तर..? कोण अधिक जवळच वाटते..? किंवा काय अधिकचे भावते..? त्यामागे काही कारण ..

ज्योती भारती : अर्थातच मराठी! कारण मराठी माझी मातृभाषा आहे. ती मला अत्यंत जवळची आहे; मात्र पूर्वीपासून मी हिंदीचे वाचन करते, वडील प्रेमचंद आणि हरिवंशराय बच्चन यांचे वाचन करायचे त्यामुळे तो त्यांच्याकडून आलेला प्रभाव आहे. मला मराठीचे रांगडेपण जितके प्रिय आहे तितकाच हिंदीचा गोडवासुध्दा अपूर्व वाटतो.

प्राजक्त झावरे पाटील : तुम्ही मराठी आणि हिंदी दोन्हीही शिकवत असतात..! कोणती भाषा लवकर शिकता येईल, असे वाटते..!?

ज्योती भारती : भाषाज्ञान हे प्रत्येक व्यक्ती आपल्या वैयक्तिक कुवतीनुसार घेत असतोच. ज्याला जी भाषा शिकावी वाटते ती व्यक्ती त्यासाठी प्रयत्न करू शकते, त्यात आवडीचाही भाग आहे. हिंदीची जास्त आवड असेल तर तो हिंदी लवकर शिकेल आणि मराठीची असेल तर मराठी लवकर शिकेल. अर्थात अभ्यास आवश्यक आहेच; पण दोन्ही भाषा तशा व्याकरण दृष्टीने आत्मसात करायला कठीण आहेत.

प्राजक्त झावरे पाटील : सोशल चौकट हा कवितासंग्रह नक्की आहे काय..? सगळ्या कविता स्त्री आणि तिच्या वेगवेगळ्या भूमिका यांवर आहेत की अजुन काही वेगळ्या..?

ज्योती भारती : “सोशल चौकट सोसण्या पलीकडची” हा काव्य संग्रह अर्थातच नावाला अनुसरून स्त्रीकेंद्री आहे आणि यामध्ये स्त्रीच्या दृष्टीने पुरुषाचे दुःखही व्यक्त करणाऱ्या (कातरवेळ, चंद्रकोर, किनारा) अशाही कवितांचा समावेश आहे. “स्त्री” हीच मध्यवर्ती असल्यामुळे तिच्यावरील अन्यायाचे विदारक चित्र जसे त्यात येते तसेच तिच्यातील प्रेम आणि ममत्व यांचे भावनीक चित्रंही कविता संग्रहात ओघानेच येते.

प्राजक्त झावरे पाटील : अमृता प्रीतम, भालचंद्र नेमाडे हे तसे समजण्यास थोडेसे सुलभ नसतात..! असा समज आहे..? आपल्याला त्यांच्यातले काय भावले..?

ज्योती भारती : अमृता प्रीतम या प्रत्येक संवेदनशील मनाला भिडतात, त्यांची साहित्यातून पुढे येणारी तत्व मनुष्य म्हणून स्त्रीला जगण्यास प्रवृत्त करतात. एकाकीपणाचे असंख्य पदर उलगडताना अमृताजी आपले डोळे करुणेने भरून टाकतात, ती सजग भाषा मला भावते. भालचंद्र नेमाडे यांच्या साहित्यातील मनोविश्र्लेशक अंगाने आलेली संवेदनांची अनुभूती मला उदात्त वाटते, तो अनन्यसाधारण अनुभव मला भावतो.

प्राजक्त झावरे पाटील : सुरेश भट जवळचे वाटतात..? भावगीत कार की गझलकार..?

ज्योती भारती : भावगीते आणि गजल यांच्या पलीकडे जाऊन एक दुर्दम्य संघर्षाचा झंझावात असणारे सुरेश भट मला खूप जवळचे वाटतात.

प्राजक्त झावरे पाटील : पार्टनरची तशी माझीही कित्येक पारायणे झाली आहेत..! ते आजही आपल्या भावनांना सहज जोडते..! तुमच्या लेखी व पूं चा पार्टनर कसा आहे..?

ज्योती भारती : व.पू. काळे यांचा पार्टनर एक मुक्त जगण्याचे प्रतीक आहे, जो प्रत्येक व्यक्तीच्या मनाला ओढ लावतो.

प्राजक्त झावरे पाटील : कॉलेज डायरीज हे स्व:कथन आहे की काल्पनिक मांडणी..?

ज्योती भारती : कॉलेज डायरी काही अंशी काल्पनिक आहे. समाजातील इतर लोकांचे कॉलेज काळातील अनुभव ऐकुन मी त्यावर आधारित काल्पनिक सदर लिहिते. अनुभव बऱ्याच अंशी सत्य आहेत, त्याभोवती असणारे कथन काल्पनिक आहे. जसे की पहिलीच “स्वप्न” ही कथा मुंबईत घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे.

प्राजक्त झावरे पाटील : भटकंती ही एक कला आहे, जी सृजनशीलतेला पोषक खत पुरविते, असे वाटते का.? असल्यास कसे..?

ज्योती भारती : हा एक छंद आहे, जो जगण्याला उत्साह देतो. भटकंती मधून निसर्ग आणि समाज भिन्नतेचे चित्र दिसून येते जे कथालेखन करण्यास मदत करते.

प्राजक्त झावरे पाटील : स्वत:ची कोणती कविता आवडते..?

ज्योती भारती : माझी “चंडी” ही कविता आवडते. हिंदीत मला माझी ” मै औरत हू” ही रचना जास्त भावते.

प्राजक्त झावरे पाटील : या कोरोनाच्या संकटकाळात काय संदेश द्याल..? कसे कवितांच्या जगात वावरता येईल..?

ज्योती भारती : सगळ्यांनीच या कोरोना काळात अनेक वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जातांना संयम बाळगावा. नकारात्मक घटनांचा विरोध करतांना आततायी होऊ नये. कोणत्याही माध्यमांचा प्रभावी उपयोग करून अतिवापर टाळावा. आपली आणि आपल्या कुटुंबीयांची सुरक्षितता बाळगावी आणि आपल्यातील सकारात्मक वृत्ती जिवंत ठेवावी.

प्राजक्त झावरे पाटील : धन्यवाद ज्योती जी आपल्या सोबत गप्पा मारताना रंगत आली.. कवितेला आणि युवा विचारांना एक वेगळा आयाम यातून समोर आला.. खूप खूप शुभेच्छा..! लिहीत रहा..!

ज्योती भारती : मलाही खूप मज्जा आली आणि आनंद ही झाला..! धन्यवाद प्राजक्त सर..!

2 Comments

  1. वाह ….
    खुप सुंदर प्रेरणादायी संवाद…. 👏👏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *