महाराष्ट्र दिन विशेष – ही आहेत भारतरत्न प्राप्त महाराष्ट्राची नव रत्ने…!
नव रत्नांचा संक्षिप्त परिचय..!



भारतरत्‍न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या भारताची कीर्ती जगभरात वृद्धीगंत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते. अशा व्यक्तींनी उभी हयात यासाठी घालविलेली असते. अनेकांना तर हा सन्मान मरणोत्तर दिला गेला आहे. सेवा, कला, साहित्य, विज्ञान व विश्वशांती, मानव विकास, कारखानदारी इत्यादी क्षेत्रांतील लोकांना, सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींना व अन्य अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्यांना, हा अमूल्य पुरस्कार देऊन गौरविले जाते. हे पुरस्कार प्राप्त हे आहेत महाराष्ट्राचे सुपुत्र..!

१. महर्षी धोंडो केशव कर्वे :
भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित झालेले पहिले महाराष्ट्रीय व्यक्तिमत्त्व म्हणजे, महर्षी धोंडो केशव कर्वे. २९ ऑक्टोबर १९५८ रोजी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला. महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यासाठी त्यांनी आपलं १०४ वर्षांचं जीवन समर्पित केलं होतं. स्त्री शिक्षणासाठी त्यांनी हिंगणे येथे उभारलेल्या शाळेचेच पुढे भारतातील पहिल्या आणि एकमेव महिला विद्यापीठात रूपांतर झाले. सात्त्विक वृत्ती, चिकाटी, ध्येयनिष्ठा आणि धवल चारित्र्याच्या बळावर त्यांनी सामाजिक कामांचा डोंगर उभा केला होता.

२. पांडुरंग वामन काणे :
महाराष्ट्राला दुसरं भारतरत्न मिळालं १९६३ साली महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे यांच्या रूपानं. संस्कृत, धर्मशास्त्र, भारतीय विद्या (म्हणजे इंडोलॉजी), हिंदू तसंच मुस्लीम कायदा, याबरोबरच फ्रेंच आणि जर्मन भाषेचा अभ्यास असलेल्या पां. वा. काणे यांचा जन्म ७ मे १८८० मध्ये चिपळूणमधल्या पेढे परशुराम इथं झाला. दापोलीत शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते मुंबईत आले होते. काणेंनी संस्कृत साहित्य आणि इतर अनेक विषयांवर विपुल लेखन केलं. ‘हिस्टरी ऑफ धर्मशास्त्र’ या त्यांच्या ग्रंथाच्या चौथ्या खंडाला १९५६ साली साहित्य अकादमी पारितोषिक मिळालं होतं. केवळ भारतातच नाही तर भारताबाहेरही त्यांच्या कार्याचा गौरव केला गेला. केशवपन म्हणजे विधवांना केस कापून टाकण्याची सक्ती करणं, अस्पृश्यता यांसारख्या रुढींना त्यांनी तीव्र विरोध केला.

३. विनोबा भावे :
थोर गांधीवादी आचार्य व भूदान चळवळीचे प्रवर्तक विनायक नरहरी भावे अर्थात विनोबा भावे. जन्म ११ सप्टेंबर, १८९५ रोजी, गागोडे गाव, कुलाबा जिल्हा, महाराष्ट्र. १९२१ मध्ये वर्धा येथे सत्याग्रह आश्रमाची एक शाखा निघाली, तेव्हा तिचे नेतृत्व गांधीजींनी विनोबांवर सोपवले होते. व्यासंग आणि आचारशुद्धता यामुळे विनोबांना ‘आचार्य’ ही पदवी देण्यात आली. गांधीकुलाचे ते आचार्य होते. विनोबा हे गांधीजींचे अध्यामिक वारसदार होते. पुढे ते सर्वोदयी नेते म्हणून प्रसिद्ध झाले. समाज नेतृत्वासाठी दिल्या गेलेल्या रॅमन मॅगसेसे पुरस्काराचे पहिले मानकरी होते. त्यांना भारत सरकारने मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले.

४. डॉ. बाबासाहेब आंबेडकर :
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि थोर समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १९९० मध्ये भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. गरीब, शोषित, दलित आणि महिलांच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेलं काम अतुलनीय आहे.

५. जे. आर. डी. टाटा :
विश्वासाचं दुसरं नाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टाटा समूहाला आणि देशालाही नव्या उंचीवर घेऊन जाणारे दूरदर्शी व्यक्तिमत्व म्हणजे जे आर डी टाटा. वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी टाटा उद्योग समूहाची धुरा सांभाळली. त्या वेळी त्यांच्या २२ कंपन्या होत्या. ते निवृत्त झाले, त्या वेळी समूहाच्या ९५ कंपन्या होत्या. जे. आर. डी. टाटा हे देशातील पहिले परवानाधारक वैमानिक होते. १९३२ मध्ये त्यांनी सुरू केलेल्या ‘टाटा एअरलाइन्स’चीच आज ‘एअर इंडिया’ झाली आहे. जे आर डींना १९९२ साली भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.

६. लता मंगेशकर :
आपल्या स्वर्गीय स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना २००१ मध्ये सर्वोच्च भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

७. पंडित भीमसेन जोशी :
हिंदुस्थानी संगीताच्या स्वरप्रभेने सारे विश्व प्रकाशमान करणारे स्वरभास्कर, भारतीय संगीत विश्वातील इतिहासपुरुष, ख्याल गायकीचे अनभिषिक्त सम्राट, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांना २००८ मध्ये भारतरत्न प्रदान करण्यात आला होता.

८. सचिन तेंडुलकर :
‘क्रिकेटचा देव’ म्हणून जगात ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर म्हणजे महाराष्ट्राची शान अन् देशाचा अभिमान. आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात भारताचा झेंडा डौलानं फडकवण्यात मोलाची भूमिका बजावलेल्या ‘आपल्या सचिन’ला २०१४ मध्ये भारतरत्ननं गौरवण्यात आलं.

९. नानाजी देशमुख :
नानाजी देशमुख यांचा जन्म परभणी जिल्ह्यातील कडोली गावचा. शिक्षण पूर्ण करण्यासाठी राजस्थानच्या सिकर जिल्ह्यात गेले आणि तिथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर बिट्स पिलानीमधून महाविद्यालयीन शिक्षण घेतले. महाविद्यालयात असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा संबंध आला. नंतर त्यांनी राजस्थान, उत्तर प्रदेशात कामाला सुरुवात केली. पुढे जनसंघ व जनता पार्टी यांमध्येही ते सक्रिय होते. जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीत ते अग्रस्थानी होते. काही काळ ते खासदारही होते. वयाच्या ६० व्या वर्षी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतलेल्या नानाजी देशमुख यांनी चित्रकुटमध्ये जाऊन आदिवासी व मागास समाजात काम सुरू केले होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *