मुंबई : देशावर कोरोनाच्या रुपाने मोठं संकट आलं आहे. या संकंटाचा सामना करताना देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण येणार आहे. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे . शिवसेना आपल्या सर्व आमदार आणि खासदारांच्या एक महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहे. तर राष्ट्रवादीदेखील आपल्या सर्व आमदारांच्या एक महिन्याचं वेतन मुख्यमंत्री निधी तर खासदारांच्या एका महिन्याचं वेतन प्रधानमंत्री सहाय्यता निधीला देणार आहे .
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी याबाबत आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर माहिती दिली आहे. “कोरोना संसर्गावर मात करण्यास मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे शर्थीने प्रयत्न करीत आहेत. शेतकरी, कामगार, गोरगरिबांच्या मदतीसाठी शिवसेनेचे विधानसभा, विधान परिषदेचे सर्व आमदार आणि लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व खासदार एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देत आहेत”, असं सुभाष देसाई यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
कोरोना संसर्गावर मात करण्यास मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे शर्थीने प्रयत्न करीत आहेत. शेतकरी, कामगार, गोरगरिबांच्या मदतीसाठी शिवसेनेचे विधानसभा, विधान परिषदेचे सर्व आमदार आणि लोकसभा व राज्यसभेचे सर्व खासदार एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देत आहेत.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील अशाच प्रकारची माहिती ट्विटरवर दिली आहे. राष्ट्रवादीचे सर्व आमदार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत तर खासदार प्रधानमंत्री सहाय्या निधीत आपल्या एक महिन्याचं वेतन देणार, अशी घोषणा शरद पवार यांनी केली.