ठाणे :- राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण झाल्याची तक्रार ठाण्यातील एका तरुणाने केली होती. कासारवडवली येथे राहणाऱ्या या अनंत करमुसे याने वर्तक नगर पोलीस स्टेशन येथे यासंदर्भात अनोळखी व्यक्तींबद्दल गुन्हा दाखल केला होता. या तरुणाच्या म्हणण्यानुसार त्याने रविवारी रात्री फेसबुक आणि ट्विटरवर केलेल्या पोस्टचा राग आल्याने जितेंद्र आव्हाड यांच्या सांगण्यावरून त्याला मारहाण करण्यात आली आहे. ज्यावेळी मारहाण झाली त्यावेळी आव्हाड हे समोर उभे होते असेही या तरुणाचे म्हणणे आहे..
परंतु यावर बोलताना आव्हाड म्हणाले होते की, खरं तर त्याला ज्यावेळेस मारहाण झाली त्यावेळी मी माझ्या कामात व्यस्त होतो. मी मारहाण झालेल्या ठिकाणी नव्हतो. गेल्या २४ तासांपासून मी माझ्या मतदारसंघात आणि सोलापूरमधला आढावा घेण्यात व्यस्त आहे. या अभियंत्याला मारहाण झाल्याचं मला सोशल मीडियावरूनच कळलं.
हा अभियंता गेल्या तीन वर्षांपासून माझ्या विरोधात नको त्या पोस्ट करत असतो, असेही ते म्हणाले.. या प्रकरणावरून वादंग निर्माण झाल्याने आव्हाड यांच्यावर मोठ्या प्रमाणात सर्वच स्तरावरून टीका होत होती. परंतु करमुसे या अभियंत्यांनाने केलेल्या अत्यंत घाणेरड्या आणि अश्लील पोस्ट तसेच शिवीगाळ, चारित्र्यहनन, विचित्र फोटो विद्रुपीकरण हे नेटकऱ्यांसमोर आल्याने त्यांंचा जितेंद्र आव्हाड यांना वाढता पाठिंबा मिळाला आहे.
लोकशाही देशात मारहाण करणे, मुस्कटदाबी करणे हे चूकच परंतु खालच्या पातळीवर येऊन मुद्दाम अतिशय घाणेरडी वयक्तिक टीका करणे हेही तितकंच चूक अश्या पद्धतीचा सुर आता उमटू लागला आहे. त्यातून जितेंद्र आव्हाड यांच्या बाजूने नेटकरी गोळा होऊ लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे.