| मुंबई | कोरोना संकटात साखर कारखान्यांच्या दुरावस्थेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीले होते. त्यावर निलेश राणे यांनी खोचक कमेंट केल्याने आमदार रोहित पवार आणि त्यांच्यात ट्वीट युद्ध रंगलेले पाहायला मिळत आहे. हे दोघेही एकमेंकावर ट्वीटरवरुन टीका करत आहेत.
साखरेवर बोलल्यावर मिरची का लागली? असा प्रश्न उपस्थित करत मतदार संघावर लक्ष दे सगळीकडे नाक टाकू नकोस नाही तर साखर कारखान्यासारखी तुझी हालत होईल असा टोला निलेश राणेंनी रोहित पवारांना लगावला. अगदी रोहित पवार यांच्यावर देखील एकेरीत येऊन त्यांनी टीका टिप्पणी केली आहे.मी साखरेवर बोललो पवार साहेबांवर नाही… कुकुटपालनाची मागणी केली असेल तर तुझ्यासाठी चांगली आहे, तुला गरज आहे. साखरेवर बोल्यावर मिरची का लागली??? मतदार संघावर लक्ष दे सगळी कडे नाक टाकू नकोस नाही तर साखरकारखान्या सारखी हालत होईल तुझी. https://t.co/nEJDfyblX7
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 16, 2020
शरद पवारांनी पंतप्रधानांना पत्र लिहिल्यानंतर निलेश राणेंनी यावर टीका केली होती. साखर विषयावर किती पैसे महाराष्ट्रात खर्च झाले ह्यावर ऑडीट झालंच पाहिजे अशी मागणी राणेंनी केली. साखर कारखाने करोडोंची उलाढाल करतात, राज्य सरकार, राज्य बँक, जिल्हा बँका सगळे साखर व्यवसायाला वर्षों वर्ष साथ देत आलेत. तरी वाचवण्याची वेळ का आली ? असा प्रश्न राणेंनी उपस्थित केला होता.
यानंतर रोहित पवारांनी यात उडी घेत निलेश राणेंना टोला लगावला होता. साहेबांनी साखर उद्योगासह ‘कुक्कुटपालन’ आणि इतर उद्योगातील दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवून उपाययोजना सुचवल्या आहेत. साहेब प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असल्यानेच पंतप्रधान मोदीजीही त्यावर सकारात्मक विचार करतात. त्यामुळे काळजी नसावी असे रोहित पवार म्हणाले. रोहित पवारांचा ‘कुक्कुटपालन’ या खोचक शब्द निलेश राणेंना जास्त लागल्याचे त्यांच्या नंतरच्या ट्विट वरून सहजच लक्षात येते.
त्यानंतर निलेश राणेंनीही पलटवार करत या ट्वीटचे उत्तर दिले आहे. मी साखरेवर बोललो पवार साहेबांवर नाही. कुकुटपालनाची मागणी केली असेल तर तुझ्यासाठी चांगली आहे, तुला गरज आहे. साखरेवर बोलल्यावर मिरची का लागली ? असा प्रश्न निलेश राणेंनी उपस्थित केला. महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणात संपत्ती एका दिशेने जात असेल तर प्रश्न नाही विचारायचे? असा प्रश्न राणेंनी यावेळी उपस्थित केला.
दरम्यान, निलेश राणे हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे, मंत्री सुभाष देसाई, खासदार संजय राऊत यांच्यावर खालच्या पातळीवर जावून कायम टीका करत आहेत. परंतु या सर्वांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून राणे कुटुंबाला अनुउल्लेखानेच योग्य उत्तर दिले आहे. आता निलेश राणे यांनी थेट शरद पवारांवर टीका केल्याने हा वाद पवार राणे असा होतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.