इंदिरा संत या मराठी कवयित्री आणि कथालेखिका म्हणून सुप्रसिद्ध होत्या. कोल्हापूर व पुणे येथून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. बी. ए., बी. टी. डी. व बी. एड. या पदव्या प्राप्त केल्यानंतर बेळगावच्या ट्रेनिंग कॉलेजात अध्यापिका म्हणून काम पाहण्यास त्यांनी सुरुवात केली. या कॉलेजात त्यांनी १९५६ ते १९७४ या काळात प्राचार्यपद देखील भूषवले. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातील सहाध्यायी नारायण संत यांच्याशी त्या १९३५ साली विवाहबद्ध झाल्या.
शिक्षकी पेशा स्विकारलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. १९५० च्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. आई, पत्नी, मुलगी या नात्यांतून भारतीय स्त्रीचे दिसणारे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले आहे.
इंदिरा संत आणि त्याचे पती नारायण संत या दोघांच्या कवितांचा एकत्रित असा संग्रह ‘सहवास’ या नावाने १९४० ला प्रसिद्ध झाला. दुर्दैवाने ना. मा. संत यांचे १९४६ साली निधन झाले. वेळीच सावरून या घटनेचा इंदिरा संत यांनी आपल्या कवितेवर परिणाम होऊ दिला नाही.
विशुद्ध रूपातील इंदिरा संत यांची कविता टीकाकार तसेच काव्यरसिकांनी उचलून धरली. आजमितीस इंदिरा संत यांची सुमारे पंचवीस पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. रमेश तेंडुलकर यांनी इंदिरा संत यांच्या निवडक कविता ‘मृण्मयी’ नावाने १९८२ साली संपादित करून प्रसिद्ध केल्या.
गर्भरेशीम ह्या काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेत वासंती मुझुमदार ह्यांनी इंदिरा संतांविषयी सांगितले आहे की, “आपला आनंद अक्का (इंदिरा संत) स्नेहीजनांना सुंदर भेटवस्तू देऊन जरी साजरा करत,तरी त्या स्वतः मात्र ह्या सर्वांतून अलिप्त असत. ही अलिप्तता त्यांना त्यांच्या आयुष्यातल्या खडतर अनुभवांनी मिळवून दिली होती. मात्र त्या खुल्या मनाने बदलांचं आणि नव्या गोष्टींचं स्वागत करत. यश आणि अपयश त्या एकाच मापाने तोलत असत.” एका उमद्या आणि जीवनाचा भरभरून आस्वाद घेत त्याच्याशी दोस्ती करण्याच्या त्यांच्या ह्या स्वभावधर्मामुळेच आपल्याला त्यांच्या कवितांतून गहिऱ्या, अंतरंग व्यापणाऱ्या कवयित्रीचे दर्शन घडते.
त्यांनी आठशेच्या वर कविता लिहिल्या आणि शिवाय त्याच तोलामोलाचे गद्यलेखन केले. १९५१ ते १९६० ह्या काळात त्यांचे कवितालेखन आणि कथालेखन समांतर चालू होते. ह्या दहा वर्षांत त्यांचे ‘शेला’, ‘मेंदी’, ‘मृगजळ’ हे कवितासंग्रह तर ‘श्यामली’, ‘कदली’, ‘चैतू’ हे कथासंग्रह प्रसिद्ध झाले. लवकरच कवितेशी असलेले आपले विशेष सख्य त्यांच्या ध्यानात आले. कविता ही फक्त आपली प्रतिभा नाही तर साथ सोडून गेलेल्या साथीदाराशी संवाद करण्याचा हा एक मार्ग आहे याची त्यांना जाणीव झाली . पन्नास वर्षं त्यांनी हा संवाद चालू ठेवला. त्यात सुरुवातीला चिरविरहाचे दुःखावेग जास्त डोकावले असले तरी पुढे ह्या नात्याची अनेक रूपे त्यांच्या कवितेतून प्रकट होऊ लागली. त्यात फक्त आठवणींतील गोडवा आणि वेदना नव्हत्या तर त्यातून त्या जणू नव्याने सहवास जागवत होत्या. जमिनीवर पडलेल्या बियांतून रोपे रुजावीत तसे. त्यांनी स्वतः काव्यलेखनाच्या प्रक्रियेचे एक छान वर्णन केले आहे. कापूस पिंजताना त्यातून अनेक म्हाताऱ्या हवेत तरंगू लागतात. त्यांतील एखादी खेळणाऱ्या मुलांच्या हाती लागते. तसे हे अनुभवांचे धूसर तरंगते काहीतरी हाताला लागते आणि त्यातून कविता निर्माण होते.
इंदिरा संत यांनी पंडित कुमार गंधर्वांविषयी लिहिताना म्हटले आहे, कुमारजींच्या स्वराला जिथं विजेसारखी धार आहे, तिथं तिला आकाशाची ओढ आहे. त्या ताना स्तिमित करतात आणि त्या वेळचं हातांचं नर्तन जोष आणतं. जिथं त्यांचा आवाज कोमल आहे तिथं त्याला जाईच्या वेलीच्या नाजूक तणाव्यांची झालर आहे; आणि त्या वेळच्या बोटांच्या नर्तनाला जललहरींचं मार्दव आहे. कुमारांचं गाणं म्हणजे शब्दांचं ‘शब्दपण’ कसं असतं ते सांगणारं आहे. स्वरवलयांनी शब्द नादमय करून त्यात रस भरावा, तर तो त्यांनीच. अशा सर्व शक्तीमुळे कुमारांचं गाणं हा एक शक्तिसौष्ठवाचा सहजाविष्कार वाटल्याशिवाय राहत नाही.
पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी त्यांची गाणी सुरेख गायली आहेत त्यांच्या कवितेचा भावार्थ आत्यंतिक आर्ततेने गाऊन जणू सोन्याला सुगंधच आणला आहे.
पुरस्कार :
साहित्य अकादमी पुरस्कार – गर्भरेशीम ह्या काव्यसंग्रहासाठी
अनंत काणेकर पुरस्कार – गर्भरेशीम ह्या काव्यसंग्रहासाठी
साहित्य कला अकादमी पुरस्कार – घुंघुरवाळा ह्या कादंबरीसाठी
महाराष्ट्र शासन पुरस्कार – शेला रंगबावरी, मृगजळ ह्या काव्यसंग्रहांसाठी
कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार
या प्रतिभावान कवियत्री इंदिरा संत यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन..
– प्रसाद जोग, सांगली
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .