द्रोणाचार्यांच्या नावाने आदर्श गुरूचा पुरस्कार आजही दिला जातो तर एकलव्य हा विद्रोही लोकांना प्रेरणा देतो. द्रोणाचार्य वेदांचे ज्ञानी व धनुर्विद्येचे श्रेष्ठ जाणकार असूनही दारिद्रय त्यांच्या पाचवीलाच पुजलेले होते. म्हणून ते त्यांचा बालपणीचा मित्र द्रुपद (पांचाल देशाचा राजा) ह्याच्याकडे साहाय्याकरिता गेले. एका दरिद्री ब्राम्हणाने आपल्याशी बरोबरीच्या नात्याने बोलावे हे द्रुपदाला सहन झाले नाही. द्रुपदाने त्यांना अपमानित केले. द्रोणाचार्य त्याच पावली परत फिरतात तेही सूडाचा निश्चय करून. द्रोणपत्नी कृपी ही कौरवकुलाचे पुरोहित कृपाचार्यांची बहीण. द्रोणाचार्य कृपाचार्यांच्या आश्रयाने राहतात. गुरूकुलातल्या राजपुत्रांचे शिक्षण ही मुख्य जबाबदारी द्रोणाचार्यांवर असते. भारतभरचे अनेक राजपुत्र त्यांच्याकडून शिक्षण घेत असत. या काळात हिरण्यधनू नावाच्या निषादराजाचा पुत्र ‘एकलव्य’ द्रोणांकडे धनुर्विद्येच्या शिक्षणासाठी आला. निषाद म्हणजे वनात राहणारी, शिकार करून जगणारी जात. ह्यामुळे द्रोणाचार्य एकलव्याचा स्वीकार करत नाहीत. या कारणाशिवाय द्रोणाचार्य राजपुत्र कौरवांच्या अस्त्र प्रावीण्यात गुंतल्यामुळे ते एकलव्याचा अव्हेर करतात, असेही महाभारतात स्पष्ट केले आहे. द्रोण ब्राम्हण व कौरव क्षत्रिय. द्रोणांनी नकार दिलेला कारण एकलव्य चातुर्वर्ण्याच्या पलिकडचा. द्रोणांनी त्यांच्या नकारात भीष्मांचे मतही विचारात घेतलेले असणारच. शेवटी द्रोण राजाश्रित गुरू होते. भीष्मांना आपल्या राजपुत्रांसमवेत निषादाने शिकावे हे रूचले नसावे, त्यामुळे त्यांनी नकार दिला असावा.
एकलव्याने द्रोणाचार्यांची मूर्तिका तयार करून, कठोर व्रताचरणी राहून, एकाग्रतेने धनुर्विद्येत असामान्य प्रभुत्व संपादन केले. अस्त्रांच्या ज्ञानाची त्याला प्राप्ति झाली. महाभारतात सोडलेले अस्त्र मागे घेण्याचा उल्लेख ‘ब्रम्हास्त्रा’शी जोडलेला आहे. अर्जुन ते मागे घेतो व एकलव्य ते मागे घेऊ शकत नाही याचा अर्थ असा होतो की एकलव्याने द्रोणांशिवाय ब्रम्हास्त्र प्राप्त केले असावे. अर्जुनाचा एकलव्याशी त्यापूर्वी परिचयही नव्हता. एक दिवस द्रोणांचे शिष्य मृगयेसाठी रथात बसून वनात गेले असता त्यांनी अघटित दृश्य पाहिले. भुंकणाऱ्या कुत्र्याच्या तोंडात सपासप बाण जाऊन कुत्र्याचे भुंकणे बंद झाले पण तरीही कुत्र्याला इजाही झाली नाही. त्या निषादाचे हे कौशल्य पाहून सगळे राजपुत्र अचंबित झाले. त्यांनी त्याला ‘तुझी ओळख तरी सांग’ असे विचारून त्याचे कौतुक केले. “हिरण्यधनु नामक निषाद राजाचा मी पुत्र आहे. मी द्रोणाचार्यांचा शिष्य आहे. मी त्यांच्याजवळ धनुर्विद्येचा अभ्यास केला आहे”, असे उत्तर त्याने दिले. एकलव्याच्या ह्या उत्तराने अर्जुन अस्वस्थ झाला. त्याने द्रोणाचार्यांना गाठून ही घटना सांगितली. अर्जुनाने विचारले, “आचार्य! माझा कोणताही शिष्य तुझ्यापेक्षा वरचढ होणार नाही असे तुम्ही मला वचन दिले असताना हा निषादपुत्र, तुमचाच शिष्य माझ्याहूनही श्रेष्ठ आहे याचा अर्थ मी काय समजू?” द्रोणांनी थोडा वेळ विचार करून मग अर्जुनाला आपल्या बरोबर घेऊन वनाकडे प्रयाण केले. धुळीने माखलेला, मस्तकावर जटांचा भार असलेला, अंगावर धड वस्त्रही नसलेला परंतु तन्मयतेने शरसंधान करणारा एकलव्य त्यांना दिसला. द्रोणांना पाहून तो हात जोडून उभा राहिला. त्याने विचारले, “आचार्य! मी आपलाच शिष्य आहे. मी आपल्यासाठी काय करू?”
द्रोण म्हणाले, “एकलव्या! तू माझा शिष्य म्हणवतोस, मी तुला धनुर्विद्येचे जे शिक्षण दिले त्याबद्दल मला गुरूदक्षिणा दे.” गुरू द्रोणांनी हात पसरले. “आपण वेदवेत्ते आहात. आचार्यांना जे हवे ते मी दिलेच पाहिजे. आज्ञा करावी”, शिष्य एकलव्य नतमस्तक होऊन म्हणाला. द्रोणांनी क्षणाचा ही विचार न करता एकलव्याकडे एक भीषण मागणी केली, “तुझ्या उजव्या हाताचा अंगठा मला गुरूदक्षिणा म्हणून दे.” उजव्या हाताचा अंगठा! उजव्या हाताचा अंगठा च नसेल तर बाण कसा चालवणार? इतक्या दिवसांची अभिलाषा, आतापर्यंतचे सगळे परिश्रम, सगळा अभ्यास – सगळंच व्यर्थ जाणार? कोणतीही खंत वा खिन्नता एकलव्याच्या मुखावर उमटली नाही. त्याने त्वरित उजव्या हाताचा अंगठा कापून द्रोणांच्या हातावर ठेवला आणि त्याच क्षणी एकलव्य इतिहासात अजरामर झाला. रक्ताळलेल्या हातानेच गुरूला प्रतिकात्मक वंदन करण्यासाठी त्याने बाण सोडला, पण त्याचा वेग पूर्वीसारखा नव्हता. एकलव्याच्या चेहऱ्यावरची अगतिकता पाहून अर्जुन सुखावला. अर्जुन आता सर्वश्रेष्ठ धनुर्धर होणार हे द्रोणवचन खरेच ठरणार, अर्जुनाशिवाय ह्याला तिसरा कोणी साक्षीदार नव्हता. महाभारतात याबद्दल द्रोणांच्या मुखातून कधीही चकारशब्द निघालेला नाही किंवा दु:ख वा हळहळा व्यक्त झालेली नाही.
व्यक्तिशः एकलव्याने असा कोणताही अपराध केलेला नसता द्रोण असे का करू धजले? त्यांची या मागची प्रेरणा काय होती? अर्जुनाला दिलेले वचन प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांना अर्जुनाला अधिक काही देता आले असते मग त्यांनी हाच पर्याय का निवडला? द्रोणपर्वात याचे उत्तर सापडते. द्रोणपर्वात श्रीकृष्ण अर्जुनाला कर्णासमोर आणण्याचे टाळतो. घटोत्कचाला रात्रीच्या युध्दात कर्णाचा वध कर अशी आज्ञा देतो. घटोत्कचाच्या राक्षसी थैमानापुढे कौरवांची पळापळ होते. दुर्योधन कर्णाला त्याची वासवी शक्ती घटोत्कचावर सोडायची आज्ञा करतो. घटोत्कच मारला जातो. श्रीकृष्ण आनंदाने अर्जुनाला मिठी मारतो. कर्ण आता वध्य झाला म्हणून हा आनंद होतो. त्यावेळी श्रीकृष्ण-अर्जुन संवाद सुरू असतो. “जरासंध, शिशुपाल, कर्ण व एकलव्य यांना मी तुझ्या विजयासाठी अनेक उपायांनी दूर सारले आहे. जरासंध, शिशुपाल यांचा वध तर तुझ्या देखत घडवून आणला आहे. कर्णाची विजयंती शक्ती नष्ट करून तुझे काम सोप्पे केले आहे. जरासंध, शिशुपाल, कर्ण आणि महाबाहू एकलव्य दुर्योधनाच्या आश्रयाला येऊन लढले असते तर दुर्योधनाचा विजय निश्चित होता. “तुझ्या हितासाठीच द्रोणांनी सत्याला स्मरून पराक्रम करणाऱ्या निषादपुत्र एकलव्याचे आचार्यत्व स्वीकारून कपटाने त्याचा अंगठा तोडावयास लावला.” श्रीकृष्णाचे हे वचन स्पष्ट आहे. एकलव्याच्या पराक्रमाचे वर्णन करताना श्रीकृष्ण पुढे सांगतो, “अंगुलीत्राण बांधलेला, अत्यंत पराक्रमी, अभिमानी, वनात संचार करणारा हा निषादपुत्र. राक्षस, नाग व प्रत्यक्ष देवांनीही जिंकता आला नाही तर इतरांची काय कथा? रात्रंदिवस धनुर्विद्येचा सतत अभ्यास करणाऱ्या एकलव्याचा तुझ्या हितासाठी मी युध्दाआधी घात केला.” याचा अर्थ असा की एकलव्याचा अंगठा तोडणे हे कृष्णकृत्य होते.
पण प्रश्न असा येतो की, श्रीकृष्णाने द्रोणांकरवी हे कृत्य का करविले असावे? एकलव्याचा आणखी एक संदर्भ हरिवंशात सापडतो. जरासंधाशी युध्द टाळण्यासाठी श्रीकृष्ण द्वारकेत जातो. पोंड्र राजा श्रीकृष्ण द्वारकेत नसताना द्वारकेवर हल्ला करतो. हा पोंड्र राजा स्वतः ला वासुदेव म्हणवून घेतो. श्रीकृष्णाची सर्व आयुधे नावासकट माझ्याजवळ आहेत, अशी प्रोढी मारतो. या युध्दात एकलव्य त्याच्या फोजेसह श्रीकृष्णाविरूध्द लढतो. वासुदेवासह अनेक यादव वीरांचा पराभव करतो आणि त्यांना पळवून लावतो. सात्यकी व बलराम अशा यादववीरांना आव्हान देतो. बलरामाशी त्याचे गदायुध्दही होते. बलराम त्याला जिवंत सोडून देतो. आपल्याच कुळातला म्हणूनही असेल. पुढे जरासंधाशी श्रीकृष्ण-बलरामाचे गोमंत पर्वतावर एक युध्द झाल्याचा उल्लेखही हरिवंशात आहे. गोमंत पर्वतच सभोवतालातून पेटवून देऊन श्रीकृष्ण-बलरामांना जाळून टाकायचे ठरते. परंतु या देवबंधूनी मैदानात येऊन युध्द केले आणि जरासंध विजयी न होता माघारी गेला. त्यावेळीही जरासंधाच्या मदतीला आलेल्या अनेक राजांसमवेत एकलव्य होता. मुद्दा एवढाच की एकलव्याचे श्रीकृष्णाशी शत्रुत्व होते आणि हे गृहकलहामुळे निर्माण झाले होते.
श्रीकृष्ण-बलराम हे वासुदेवाचे पुत्र परंतु सावत्र भाऊ होते. वासुदेवाचा पिता ‘शूर’. या शूराला दहा पुत्र. त्यातला एक देवश्रवा नावाचा. हा देवश्रवा वासुदेवाचा भाऊ. या देवश्रवाला शत्रुघ्न नावाचा पुत्र होता. पुढे या शत्रुघ्नाचा काही कारणाने कुटुंबाने त्याग केला होता. या त्यागाचे स्पष्ट कारण दिलेले नाही; पण अरण्यातील निषादांनी नंतर त्याचे पालन केले. तोच हा निषाद एकलव्य. म्हणजे एकलव्याचे आणखी एक रहस्य उलगडते ते म्हणजे एकलव्य हा श्रीकृष्णाचा चुलतभाऊ होय. याला घरातून त्यागण्याचे कारण त्याच्या निषाद नावाने सुचित होते. वर्णसंकराच्या व्याख्येत क्षत्रिय स्त्री व शूद्र पुरूष यांच्या संकरातून होणाऱ्या अपत्याला निषाद म्हणतात. हा शत्रुघ्न नावाचा पुत्र त्याच्या पित्याकडे सुपूर्द केला असावा असा तर्क त्याच्या त्यागावरून करता येतो. अशा नात्याने सूडाची भावना जन्माला येते. कर्ण अर्जुनाचा द्वेष करतो. एकलव्याच्या मनातही श्रीकृष्ण-बलरामांबद्दल सूडाची निर्माण झाली असावी. ही वाट दुर्योधनाच्या राजमार्गाकडे जाणारी होती. कर्ण सूतपुत्र म्हणून हिणवला गेला आणि एकलव्य निषादपुत्र म्हणून. श्रीकृष्णाच्या नीतीने हे दोन महाधनुर्धर योध्दे वध्य झाले. एक संदर्भ अजून उरतो. एकलव्य व द्रोणाचार्य ह्यांचे खरे नाते कोणते? याचाही संदर्भ हरिवंशात सापडतो. सिंधुराजाच्या प्रदेशात (जयद्रथाचे राज्य) रेवतक पर्वत होता. त्या पर्वतावर एकलव्याचे बराच काळ वास्तव्य होते. कर्ण जसा धनुर्विद्येतील प्रावीण्यासाठी वणवण भटकला तसा एकलव्यही भटकला असावा. एकलव्य तिथे असताना द्रोणही त्याच ठिकाणी वास्तव्यास होते. याच काळात हे गुरू-शिष्य एकत्र आले असावेत व द्रोणांनी एकलव्याला विद्यादान केले असावे.
महाभारतात सर्वच उल्लेख स्पष्ट नाहीत; पण एकलव्य व द्रोण यांचे जवळचे वास्तव मुद्दाम नमूद केले आहे. कर्णसुध्दा द्रोणांकडे ब्रम्हास्त्र मागायला एकांतातच गेला होता. एकलव्याचे रेवतक पर्वतावर जाणे हीसुध्दा गाजावाजा न केलेली गोष्ट वाटते. कर्णाला अर्जुनापेक्षा वरचढ व्हायचे होते. तसे तो द्रोणांना बोलूनही दाखवतो. पण द्रोण मात्र ब्रम्हास्त्र व्रतस्थ ब्राम्हण व तपस्या करणाऱ्या क्षत्रियालाच देता येते असे कारण सांगून त्याची बोळवण करतात. अर्जुनापेक्षा वरचढ होण्याच्या ईर्ष्येनेच एकलव्यही हस्तिनापुरात आला होता. कारण अर्जुनाच्या पसरणाऱ्या कीर्तीचा उल्लेख आहे. म्हणून एकलव्य ब्रम्हास्त्राच्या प्राप्तीसाठी आला असावा. पण निषादाला ते प्राप्त होण्याची शक्यताच नव्हती. कारण ब्राम्हण द्रोणांच्या नीतीतही ते न बसणारे होते, म्हणून त्यांनी एकलव्याचे शिष्यत्व त्यावेळी नाकारले.
एकलव्य व कर्ण या दोघांचा जन्म क्षत्रिय मातांच्या पोटी झाला. दोघांचाही त्यांच्या कुटूंबाने त्याग केला होता. दोघेही महान धनुर्धर झाले. दोघांनी दुर्योधनाच्या आश्रयाने पांडवांविरूध्द युध्द केले. श्रीकृष्णाच्या मंथनामुळे दोघांचाही नाश झाला. एका ब्राम्हणाच्या शापाने कर्णाच्या रथाचे चाक पृथ्वीने गिळले, तर दुसऱ्या ब्राम्हणाने एकलव्याचा उजवा अंगठा गुरूदक्षिणेत मिळवला.
धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी माझा जन्म आहे, असे श्रीकृष्णाने सांगितले.अधर्माच्या बाजूने लढणारा शत्रु जर अत्यंत प्रबळ असेल तर त्याच्या नाशासाठी अधर्म हाच धर्म व असत्य म्हणजेच सत्य अशी श्रीकृष्णनीती होती.एकलव्य व कर्ण हे श्रीकृष्णाने जरासंध व शिशुपाल यांच्या पंक्तीत बसवले ते याच अर्थाने. ते दुर्योधनाच्या पक्षाला मिळाले म्हणूनच श्रीकृष्णाने त्यांचा नाश करवला. असं म्हणतात की उजव्या हाताचा अंगठा कापून दिल्यावर एकलव्य तर्जनी आणि मध्यमा या बोटांचा प्रयोग करून बाण चालवू लागला. अशा पद्धतीने तिरंदाजीच्या आधुनिक पद्धतीचा जन्म झाला. निःसंदेह ही एक उत्कृष्ठ पद्धत असून आजकाल ह्याच पद्धतीचा अवलंब केला जातो.
एकलव्याची ही गोष्ट मनाला चटका लावून तर जातेच, पण आपण या गोष्टीतून हेही शिकतो की आपल्यात किती सामर्थ्य आणि चांगले गुण असले तरी ही जर आपण अन्याच्या किंवा दुष्टांच्या बाजूने लढलो तर आपला विनाश नक्कीच होतो.
– माधव भोळे
- कळसुबाईवर महिलांना प्रवेशबंदीचा ‘तो’ फलक अखेर हटवला; पण लावला कोणी ?…………
- व्यक्तिवेध : राजकीय नेते, पत्रकार या सर्वांचे अतिशय जिवलग मित्र ते देशातील आश्वासक तरुण चेहरा राजीव सातव..!
- व्यक्तिवेध : दाक्षिणात्य राजकुमार, स्टॅलिन झाले नवे सीएम..
- व्यक्तिवेध : एकनिष्ठ कार्यकर्ता नेता हरपला, ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड
- जग बदलणारी माणसं – बाबा आमटे