काल दादा सामंत यांची प्राणज्योत मावळली, दादा सामंत हे कामगार चळवळीतील मोठे नाव, याच दादा सामंत यांचा धाकटा भाऊ म्हणजे डॉ. दत्ता सामंत..! गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे सासरे..! आणि कामगार चळवळीतील पोलादी नेते.. त्या निमित्ताने त्यांचा हा व्यक्तीवेध..!
दत्ता सामंत (डॉ. दत्तात्रय सामंत) उर्फ डॉक्टर साहेब (२१ नोव्हेंबर १९३२ – १६ जानेवारी १९९७) हे एक भारतीय राजकारणी आणि गिरिणी कामगार चळवळीचे नेते होते, ते मुंबई शहरातील २ ते ३ लाख कापड गिरणी कामगारांचे नेते म्हणुन प्रसिद्ध होते. डॉ दत्ता सामंत यांचा जन्म कोकणातील देवगडचा, त्यांचे वडील साधारण शेतकरी आणि वैद्य होते, ते आयुर्वेदिक औषधी वनस्पती आणि जडीबुटीच्या आधारावर लोकांचे उपचार करत, वडीलांना त्या कामात मदत करताना, दत्ता सामंत यांना ह्या पेशात रस निर्माण झाला आणि त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले.
शिक्षण झाल्यावर त्यांनी मुंबईच्या घाटकोपर उपनगरातील पंत नगरात आपला दवाखाना उघडला. पंत नगरचा भाग हा खाणकाम मजुरांचा होता. हे मजूर डॉ. सामंताकडे उपचार घेण्यासाठी येत असत. त्यांची दयनीय अवस्था बघून डॉ सामंत अगदी माफक दरात त्यांचे उपचार करत असत. मजुरांच्या नेहमीच्या येण्याने , त्यांना त्यांच्या जगण्याचा संघर्ष दिसू लागला.. अथक मेहनत करून देखील कामगारांच्या पदरी आलेल्या अठरा विश्वे दारिद्र्याला बघून डॉ सामंत व्यथित झाले होते. अखेरीस त्यांनी ह्या कामगारांसाठी लढा उभारण्याचा निर्णय घेतला व त्यासाठी कामगारांचे संघटन उभे केले. हे करण्यासाठी त्यांना तत्कालीन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांनी मदत केली.
बघता बघता दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली खाणकाम मजुरांचा मोठा लढा उभा राहिला आणि संघर्षाला सुरुवात झाली. दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली अनेक उपोषण, काम बंद आंदोलन करण्यात आले, ज्याचा परिणाम म्हणजे कामगारांच्या अनेक समस्या सुटल्या. दत्ता सामंत यांचे नेतृत्व बघता, इतर कामगार संघटनाही त्यांच्याकडे येऊ लागल्या, त्यांना नेतृत्व स्वीकारण्याचा मागण्या करू लागल्या आणि दत्ता सामंत यांनी त्या कामगार संघटनांचे नेतृत्व स्वीकारले. दत्ता सामंत यांनी अनेक विविध उद्योगात काम करणाऱ्या अश्या वेगवेगळ्या जवळपास २०० कामगार संघटनांचे अध्यक्षपद आणि ५०० संघटनांचे उपाध्यक्षपद भूषवले होते.
१९७० च्या दशकात क्षितिजावर आलेल्या ह्या ताऱ्याने पुढील दोन दशके कामगार चळवळीचे नेतृत्व करत मायानगरीचे नभ झाकोळले होते. जॉर्ज फर्नांडिस या प्रखर कामगार नेत्या पाठोपाठ आता डॉक्टरांचे नाव देखील कामगार वर्गात गाजू लागले होते. दरम्यान दत्ता सामंत यांनी गिरणी कामगारांसाठी केलेल्या संघर्षामुळे त्यांची ख्याती सर्वदूर पसरली होती. मुंबईतल्या गिरण्या बंद पडून स्थलांतरीत होत होत्या, आजूबाजूच्या भिवंडी, मालेगाव, सुरत ह्या भागात ह्या गिरण्या जात होत्या, त्यामुळे मोठ्या संख्येत कामगारांवर बेरोजगारीचे संकट कोसळले होते. ह्यात गिरणी व्यवसाय बंद पडून तिथे असलेल्या जमिनीवर ताबा मिळवण्यासाठी बांधकाम उद्योजकांचा नजरा भिडल्या होत्या. गोदरेज पासून इतर गिरणी कामगारांचे नेतृत्व स्वीकारत दत्ता सामंत यांनी कामगारांचा एक मोठा मोर्चा मुंबईत काढला त्या मोर्चावर पोलिसांनी फायरिंग केली होती, त्यानंतर तो संघर्ष अजून चिघळला, या प्रकरणात ५० जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ह्यात डॉ दत्ता सामंत यांचे पण नाव पण होतेच.
परंतु दोनच वर्षांनी त्यांची सुटका करण्यात आली. ह्या घटनेमुळे दत्ता सामंत हे मुंबईच्या कामगार वर्तुळातले एक सर्वात मोठे नेतृत्व म्हणून उभे राहिले. या दरम्यान दत्ता सामंत ह्यांनी राजकारणात प्रवेश केला, ते त्यांच्या भागातून आधी निष्पक्ष नंतर काँग्रेसच्या तिकिटावर उभे राहिले आणि निवडून देखील आले. त्यांनी विधानसभेत असंख्य प्रश्न विचारले. कामगार प्रश्नापासून मुस्लिम पर्सनल लॉ पर्यंत अनेक प्रश्न दत्ता सामंत ह्यांनी विधान सभेत उपस्थित केले. ह्या प्रश्नांना मोठी व्हॅल्यु प्राप्त झाली होती. एका दिवसात सलग तीनवेळा प्रश्न विचारण्याचा विक्रम देखील त्यांनी प्रस्थापित केला होता.
पुढे मतभेद झाल्याने त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत लाल निशाण ह्या पक्षाची स्थापना केली. ज्या मार्फत त्यांनी डाव्या चळवळीच्या संघटनांना एकत्रित बांधण्याचा प्रयत्न केला कारण त्याकाळी उदयास आलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने तिथे मोठा वर्ग आपल्या पाठीशी उभा करत कामगार चळवळी व कम्युनिस्ट पक्ष्याला घर घर लावली होती. अश्यावेळी डॉ सामंत ह्यांनी कामगार संघटनांची मोट बांधली होती.
अगदी इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधी ज्या निवडणुकीत निवडून आले, ज्या निवडणुकीत काँग्रेसने तब्बल ४०० हुन अधिक जागा जिंकल्या होत्या, त्या लाटेत ही डॉ. सामंत हे कॉंग्रेसविरोधात उभे राहून मताधिक्याने निवडून आले होते.खासदार झाल्यावर देखील त्यांनी राष्ट्रीय स्तरावर कामगारांचे प्रश्न मांडणे चालू ठेवले होते. त्यांची सांसद म्हणून देखील उत्कृष्ट कारकीर्द होती. पुढे जाऊन त्यांनी पुन्हा कामगार चळवळीच्या लढ्यात लक्ष घातले. १९९१ ला आलेल्या जागतिकीकरणाच्या लाटेत कामगारांवर मोठे संकट कोसळले होते तेव्हा देखील दत्ता सामंतांनी लढा दिला होता. तहयात गिरणी कामगारांच्या प्रश्नासाठी ते लढत होते.
१६ जानेवारी १९९७ रोजी, आपल्या पवईच्या घरातुन आपल्या सुमो गाडीत निघालेल्या दत्ता सामंतांची अज्ञात भाडोत्री हल्लेखोरांकडून गोळ्या घालून हत्या करण्यात आली. रस्त्यावर सायकल घेउन खुनी उभे होते, त्यांनी बरोबर वेळ साधून हल्ला केला. त्यांची हत्या कुणी घडवून आणली हे आजपर्यंत न उलगडलेले रहस्य आहे. पण ह्यात भांडवलशाही समर्थक काही राजकीय प्रभुती होत्या असा आरोप त्यांचे अनुयायी करत असतात.
डॉ दत्ता सामंत हे एका वादळाप्रमाणे मुंबई च्या कामगार चळवळीत वावरले होते. इतर नेत्यांप्रमाणे सत्ता मिळाल्यावर त्यांनी कामगारांना वाळीत सोडून न देता एक मोठा संघर्ष उभारला होता. त्यांचा पाठीशी उभे राहिले. त्यांचे नेतृत्व केले. त्यांना संघटित केले. काँग्रेस व शिवसेना ह्यांच्या राजकीय डाव पेचात ही त्यांनी कामगार चळवळ बांधून टिकवून ठेवली. कदाचित त्यांचा ह्या कार्यामुळेच हितशत्रूनी त्यांची हत्या घडवून आणली होती. हत्येनंतर त्यांनी ज्या शहरात मोठा संघर्ष उभा केला होता ते शहर देखील हादरुन स्तब्ध झालं होतं आणि कामगार संघटना बापाविना पोरक्या झाल्या होत्या.!
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री