“आंतरभारती – भारत जोडो ” श्रमसंस्कार छावणीत विविध उपक्रमांची रेलचेल, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग.!

| चंद्रपूर: सोमनाथ प्रकल्प | “विचारांचा शाश्वत विकास तरुण पिढीने स्वतःमध्ये उजळून देशाला समोर नेण्यात पुढाकार घ्यावा. देशाला बाबांच्या ‘आंतरभारती भारत जोडो’ संकल्पना राबविण्याची गरज आहे.” असे उद्गार महारोगी सेवा समिती वरोराचे सचिव डॉ. विकास आमटे यांनी काढले. ते महारोगी सेवा समिती वरोरा द्वारा आयोजित ‘आंतरभारती – भारत जोडो’ श्रमसंस्कार छावणीत उद्घाटन करताना बोलत होते.

यावेळी लातूर येथील सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे, महारोगी सेवा समिती आनंदवनचे विश्वस्त अरुण कदम, सुधाकर कडू, शकील पटेल, भारत जोडो सहयात्री डॉ. सुधाकर बेलखोडे, गिरीश पद्मावार, दगडू लोमटे, पल्लवी कौस्तुभ आमटे इत्यादी मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थित होती.

पुढे बोलताना डॉ.विकास आमटे यांनी मुरलीधर देवीदास आमटे ते बाबा आमटे असा बाबांचा जीवनपट शिबिरार्थींसमोर उलगडला आणि चळवळींची व प्रकल्पांची माहिती दिली, यातून बाबा आमटे यांचे व्यक्तिमत्व उलगडून दाखविण्याचे काम डॉ. आमटे यांनी केले. आपल्या भाषणात त्यांनी शिबिरार्थीचे स्वागत आणि कौतुक करताना ते म्हणाले, “दोन वर्षाच्या कोरोनाच्या महामारीनंतर सगळ्यांचा उन्हाळ्याच्या सुट्टीत थंड हवेच्या हिलस्टेशनकडे जाण्याचा कल असताना तुम्ही ४५ ते ४८ डिग्री तापमानात सोमनाथसारख्या अशा जंगलात येऊन बाबांचे विचार घेण्याचा प्रयत्न करतात, ही कौतुकास्पद बाब आहे. तुम्ही विशेष आहात. ” या शब्दात शिबिरार्थींच त्यांनी कौतुक केले. यावेळी त्यांनी आनंदवनचा पूर्व इतिहास व भावी नियोजनाबद्दल माहिती दिली. यावेळी दादासाहेब थेटे यांच्या ” द भारतीय फाईल्स” या तिसऱ्या पुस्तकाच्या पोस्टर च प्रकाशन करण्यात आले.

ही छावणी १५ ते २२ मे, २०२२ या कालावधीत पार पडणार आहे. या छावणीत आनंदवनचा पूर्व इतिहास व भावी नियोजनाबद्दल माहिती देण्यात आली. या छावणीत भारतभरातून आलेल्या ३५० हून अधिक शिबिरार्थींनी भाग घेतला. शिबिरार्थींनी उत्साहवर्धक गीतांमधून व श्रमदानातून दिवसाची सुरुवात होते. कौस्तुभ आमटे व पल्लवी आमटे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या शिबिराचे संयोजन रविंद्र नलगिंटवार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.