व्यक्तिवेध : एकनिष्ठ कार्यकर्ता नेता हरपला, ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड

माजी खासदार व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. आज बुधवारी (दि. २८ एप्रिल) सकाळी १० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. एकनाथ गायकवाड हे राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील होत.

ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने दु:ख व्यक्त केले आहे.

”काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक असून सर्वसामान्यांसाठी झटणारे एक अनुभवी आणि निष्ठावान नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.” असे महाराष्ट्र काँग्रेसने ट्विट करत म्हटले आहे.

एकनाथ गायकवाड यांचा जन्म १ जानेवारी १९४० रोजी सातारा येथे झाला होता. ते १९८५-९०, १९९०-९५ आणि १९९९-२००४ दरम्यान आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी धारावी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले होते. १९९३-९५ दरम्यान ते राज्यमंत्री होते. १९९९-२००४ दरम्यान राज्यमंत्री , आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, सामाजिक न्याय, कामगार, उच्च व तंत्र शिक्षण अशी विविध खाती त्यांनी भुषविली होती. त्यांनी खासदारकीच्या निवडणुकीत तत्कालीन लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांना पराभूत केले होते. २०१७-२०२० दरम्याने त्यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते..

साधी राहणीमान असलेले गायकवाड विक्रोळीत राहत होते. मात्र, त्यांनी धारावीवर आपली पकड ठेवली होती. धारावीतील प्रत्येक चाळीतील लोकांना ते नावाने ओळखत होते. गायकवाड हे काँग्रेसमधील असले तरी दलित चळवळीशी त्यांचं सख्य होतं. दलित चळवळीतील कार्यकर्तेही त्यांना मानत होते. सर्वच रिपब्लिकन नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात ते हिरहिरीने भाग घेत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *