महा आवास अभियान पुरस्कारावर ठाणे जिल्हा परिषदेची मोहोर; प्रधानमंत्री आवास योजनेत प्रथम तर राज्य पुरस्कृत घरकुल योजनेत तृतीय क्रमांकाचे मानकरी..!

| ठाणे | महा आवास अभियान कालावधीत जिल्हा परिषदेने अव्वल कामगिरी करत कोकण विभागाच्या महा आवास अभियान पुरस्कारावर मोहोर उमटवली. जिल्हा परिषदेला ‘सर्वोतोकृष्ट जिल्हा’चा पुरस्कार देऊन मा. विभागीय आयुक्त कोकण विभाग विलास पाटील यांनी सन्मानित केले. मा.अध्यक्ष जिल्हा परिषद सौ.पुष्पा पाटील, मा.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी कोकण भवन येथे पुरस्काराचा स्वीकार केला.

घरकुल योजना गतिमान करण्यासाठी राज्य शासनाने राबवलेल्या महा आवास अभियान काळात मा. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली घरकुल योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे जिल्हा परिषदेला कोकण विभागात प्रधानमंत्री आवास योजनेत प्रथम आणि राज्य पुरस्कृत योजनेत तृतीय क्रमांक मिळाला.त्याचबरोबर भूमीहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देण्यामध्ये कल्याण तालुक्यास प्रथम क्रमांक व शहापुर तालुक्यास द्वितीय क्रमांक मिळाला.

कोकण विभागात तालुक्यांना मिळालेल्या पुरस्काराचा स्वीकार मा.प्रकल्प संचालक दादाभाऊ गुंजाळ, कल्याण तालुक्याचे नायब तहसीलदार विठ्ठल दळवी, शहापूरच्या तहसीलदार निलिमा सुर्यवंशी, गट विकास अधिकारी अशोक भवारी, विस्तार अधिकारी रेखा बनसोडे, विस्तार अधिकारी संतोष पांडे यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *