संभाजी महाराजांच्या नावाची राष्ट्रवादीला अ‍ॅलर्जी आहे का.? चंद्रकांत पाटलांचा खडा सवाल..!

| औरंगाबाद | औरंगाबाद महापालिका निवडणूक नामांतराच्या मुद्द्याभोवतीच घुटमळणार असल्याचे संकेत दिसत आहे. औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याचा मुद्दा राज्याच्या राजकारणात दिवसेंदिवस तापताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी नामांतराच्या मुद्द्यावरून चंद्रकांत पाटील यांना सवाल केला होता. मिटकरींच्या प्रश्नाला उत्तर देताना चंद्रकांत पाटलांनी पलटवार केला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अहमदाबादच्या नावावरून चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. त्याला आज पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. आज झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पाटील म्हणाले,”देशामध्ये परकीय आक्रमणाची जी खाणाखुणा असलेली नावं आहेत. ती बदला. अहमदाबादचं नाव बदला, उस्मानाबादचं पण बदला, माझी काहीच अडचण नाही, पण औरंगाबादचं नाव बदलायचं नाही असं तुम्ही ठरवत असाल, तर तुमचं औरंगजेबावर प्रेम आहे? संभाजी महाराजांवर नाही. संभाजीमहाराजांबद्दल अ‍ॅलर्जी असेल, तर दुसरं नाव सांगा. औरंगजेबाचं नावं औरंगाबादला ठेवा कशासाठी?”, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

“अहमदाबादचं कर्णावती करायला माझी काहीच हरकत नाहीये. परंतु जिथे तुमची सत्ता आहे तिथली नाव आधी बदला ना… यांच्याकडे औरंगाबादचं संभाजीनगर करायची इच्छाशक्ती नाही. महाविकास आघाडीला केवळ महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राजकारण करायचं आहे,” अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

काय म्हणाले होते अमोल मिटकरी?

“औरंगाबाद मनपाची सत्ता हातात द्या, सत्ता आल्यावर “संभाजीनगर” नाव देऊ असं वक्तव्य करणारे चंद्रकांत पाटीलजी, आमच्या हातात गुजरात द्या आम्ही “अहमदाबाद”चे नाव बदलुन दाखवतो, वाटल्यास तुमचं नाव देतो. इतक्या वर्षांपासून सत्ता भोगुन ‘अहमदाबाद’ नाव बदलता येत नाही का?,” असं प्रश्न अमोल मिटकरींनी केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *