डहाणू मधील आदिवासी विद्यार्थिनींची गिनीज वर्ल्ड बुक मध्ये नोंद, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले कौतुक..!

| पालघर | गांधीजींनी सांगितले होते कि खेड्याकडे चला, पण त्याकडे इतक्या वर्षात कोणी लक्ष दिले नव्हते. परंतु गेल्या काही वर्षात ग्रामीण भागातून अनेक चेहरे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात आपला ठसा उमटवीत आहेत याला आता आदिवासी बहूलजिल्हा असलेला पालघर जिल्हा ही अपवाद राहिलाय नाही. आपल्या देशातील विद्यार्थ्याच्या गुणांना वाव मिळावा यासाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन , स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ७ फेब्रुवारी २०२१ रोजी रामेश्वरम येथून लहान लहान १०० उपग्रह अंतराळात सोडून एक जागतिक विक्रम प्रस्थापित केला होता. यात देशभरातून १०००विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.

त्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले होते. तसेच नागपूर व पुणे येथे एका दिवसाचे वर्कशॉप ही घेण्यात आले होते. यावेळी त्यांनी लहान लहान फेन्टो सॅटेलाईट बनविले होते. हे उपग्रह हेलियम बलून च्या साहाय्याने सुमारे १०० उपग्रह एकाच वेळी अंतराळात सोडण्यात आले. त्यांची कृषी विषयक शास्त्रीय अभ्यासात उपयुक्त माहिती, तसेच पर्यावरणातील ओझेन चा थर , रेडिएशनची माहिती, ग्लोबल वॉर्मिग व इतर विविध प्रकारची शास्त्रीय माहिती या उपग्रहाद्वारे मिळणार आहे.

याची दखल घेत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये याची यशस्वी नोंद झाली असून आशिया बुक्स ऑफ रेकॉर्ड यांनी सुद्धा दखल घेतली आहे. इंडिया बुक रेकॉर्ड व वर्ल्ड बुक्स ऑफ रेकॉर्ड लंडन व असिस्ट रेकॉर्ड असे विविध विश्व स्तरावर रेकॉर्ड झालेले आहेत.

यामध्ये आपल्या ग्रामीण भागातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात आश्रम शाळा रानशेत येथील १० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यात आंबिवली गावातील एकदम गरीब कुटुंबातील मुलगी अंजु कमलाकर भोईर हिने प्रत्यक्ष सहभाग नोंदवून आपल्या हाताने उपग्रह तयार करून आपल्या कुटुंबाचे व गावाचे नाव मोठे केले आहे.

या सर्व सहभागी विद्यार्थ्यांना इंडिया बुक रेकॉर्ड, आशिया रेकॉर्ड, असिस्ट रेकॉर्ड, गिनीज बुक रेकॉर्ड कडून प्रमाणपत्र देण्यात आले . डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन , स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन ग्रुप यांचे सर्व पदाधिकारी, मिलिंद सर, जनरल सेक्रेटरी , मनिषा समन्वयक महाराष्ट्र राज्य, कोअर कमिटी यांचे तसेच आश्रम शाळा रानशेत येथील शिक्षक वर्ग व मुख्याध्यापक या सर्वांचे सहकार्य व मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले आहे. अंजुच्या या कामगिरीचे कौतुक होत असून तिचे अभिनंदन केले जात आहे.

याची दखल घेत महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या मुलींचे कौतुक केले तसेच भावी कारकिर्दीकरिता शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी त्यांच्या सोबत विश्वास फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.विश्वास वळवी हे देखील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *