‘रोटरी सर्व्हिस वीक’ मध्ये महिलादिन साजरा, ठाणे मनपाच्या नूतन बांदेकर सन्मानित..!

| ठाणे | रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3142 कडून सुरू असलेल्या ‘रोटरी सर्व्हिस वीक 2020 21’ मध्ये महिला दिनाचे औचित्य साधून 3 एप्रिल रोजी आयोजित केलेल्या ऑनलाइन कार्यक्रमात ठाणे जिल्ह्यातील कर्तृत्ववान चार महिलांचा ‘वुमेन ऑफ अचीवमेंट अवॉर्ड’ देऊन सन्मान करण्यात आला. त्यामध्ये दुर्बल घटकातील मुलांच्या शिक्षणासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या तसेच कोरोना काळात अत्यंत गरजू लोकांना स्वयंप्रेरणेतून मदत करणाऱ्या ठाणे येथील शिक्षिका नूतन बांदेकर, सुप्रसिद्ध उद्योजिका श्वेता इनामदार, ऑटिझम या आजाराने ग्रस्त असणाऱ्या रुग्णांसाठी काम करणाऱ्या शीना रथ आणि महिला व दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सारिका सामंत यांचा समावेश आहे. तसेच ठाणे जिल्ह्यातील रोटरी क्लब च्या महिला प्रेसिडेंट असिस्टंट गव्हर्नर आणि आणि कोअर कमिटीच्या महिला सदस्य यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात ठाणे जिल्ह्यातील एकूण 90 रोटरी क्लबस सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. संदीप कदम आणि त्यांच्या पत्नी डॉ. रंजना कदम उपस्थित होते.

महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून सामाजिक कार्यकर्त्या व समुपदेशक सई लेले यांनी ‘महिलांसाठीचे कायदे’ या विषयावर मार्गदर्शन केले. महिलांना देवीचे रूप मानणाऱ्या आपल्या समाजात किमान माणूस सन्मान मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महिला तक्रार निवारण समितीकडे लॉकडाऊनच्या काळात नेहमीपेक्षा कितीतरी जास्त तक्रारी दाखल झालेल्या असल्याची माहिती त्यांनी दिली. महिलांचे सक्षमीकरण होणे ही सामाजिक गरज असून त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत असे मत मांडले. महिलांसाठी शासनाचे एकूण 1227 पेक्षा अधिक कायदे असून त्यापैकी काही महत्वाच्या कायद्यांची त्यांनी सविस्तर माहिती दिली.

शिक्षण क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या प्राध्यापिका डॉ. करुणा सिन्हा यांनी आपल्या भाषणात सांगितले की पुढच्या पिढीला सुसंस्कारित करताना आजच्या शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांवर मूल्यशिक्षणातुन महिलांचा आदर, सन्मान करण्याचे संस्कार करण्यात येणे ही आज काळाची गरज आहे.पूर्वीच्या काळी घरोघरी असलेले आजीआजोबा हे मूल्यशिक्षणाचे विद्यापीठ होते, आज परिस्थिती बदललेली असल्याने आपली जबाबदारी वाढलेली आहे, असे मत त्यांनी मांडले.

“विविध क्षेत्रात स्वयंप्रेरणेने काम करून स्वतःचा ठसा निर्माण करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देणे, हा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे,आज सन्मानित करण्यात आलेल्या चारही महिलांनी आपापल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करून स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे.” असे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. संदीप कदम यांनी आपल्या भाषणात सांगितले. ” आज येथे सन्मानित केलेल्या महिलांच्या कार्यापासून समाजातील सर्व महिलांना प्रेरणा घेता येईल,” असे उदगार डॉक्टर रंजना कदम यांनी काढले. तसेच सर्व मान्यवरांनी महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

सत्कारास उत्तर देताना नूतन बांदेकर रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3142 चे आभार मानत म्हणाल्या “कोरोना काळात गरजूंना मदत करण्यासाठी मला अनेक सुहृदांनी यथाशक्ती आर्थिक मदत केली, समाजासाठी काम करताना आपला वेळ देणे सुद्धा खूप महत्वाचे असते. लॉकडाऊनच्या भयंकर परिस्थितीमध्ये परमेश्वराने माझ्याकडून हे कार्य करून घेतलेआहे असे मी मानते.” महिला म्हणून बाऊ न करता आपण स्वयंप्रेरणेतून समाजोपयोगी काम करत रहावे, असेही त्या म्हणाल्या.

सदर कार्यक्रमाचे आयोजन ‘रोटरी क्लब झोन 2 – सुपर संदीप सनरायझर्स’च्या एकूण अकरा रोटरी क्लबसनी एकत्र मिळून केले होते. हा कार्यक्रम ठाणे जिल्ह्यातील नव्वद रोटरी क्लबचे प्रेसिडेंटस असिस्टंट गव्हर्नर्स आणि डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अशा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत अतिशय उत्साहात पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *