| अहमदनगर | राज्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज (सोमवार) लागत आहे. अनेक ठिकाणी मोठी उलथापालथ झाली आहे. महाराष्ट्रात एका ठिकाणी तर वडील आमदार, माजी मंत्री, माजी विरोधी पक्षनेते तसेच मुलगा खासदार असतानाही साधी गावातील ग्रामपंचायत राखता आले नसल्याची एक घटना समोर आली आहे. भाजप नेते व आमदार राधाकृष्ण विखे-पाटील व नगरचे खासदार सुजय विखे पाटील यांना आपल्या गावात अपयश आलं आहे.
एवढच नाही तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील, भाजप नेते नितेश राणे आणि माजी आमदार राम शिंदे यांच्या हातूनही ग्रामपंचायत निसटल्या आहेत.
नगरमध्ये लोणी खुर्द हे भाजप आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांचं गाव आहे. या गावातील ग्रामपंचायतीवर गेल्या २० वर्षांपासून विखे-पाटलांची सत्ता होती. मात्र, या ग्रामपंचायतीच्या १७ पैकी १३ जागा जिंकून परिवर्तन पॅनलने विखे-पाटलांना धोबीपछाड केलं आहे. राधाकृष्ण विखे-पाटील स्वत: भाजपचे आमदार आहेत. त्यांचे चिरंजीव सुजय विखे-पाटील हे खासदार आहेत. असं असतानाही विखे-पाटलांना स्वत:च्या गावातच पराभव पत्करावा लागल्याने विखेंच्या सत्तेला उतरती कळा लागल्याचं बोललं जात आहे.