| ठाणे | कोविडच्या महामारीत अहोरात्र कष्ट करून जनसेवा करताना मोजकेच लोकप्रतिनिधी आपल्याला दिसत आहेत. बाकी बरेच जण घरीच थांबून फक्त मोजून चुकाच शोधून या अविरत कष्टांना जाणीवपूर्वक कमी दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत. चुका जरूर दाखवा, पण त्याचे शूद्र राजकारण करू नका असे सगळ्या नागरिकांचे देखील म्हणणे आहे. तीच भावना अहोरात्र कष्ट करणाऱ्या कल्याणचे खासदार यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मधून व्यक्त केली आहे. काही वरिष्ठ पत्रकारांनी कोविड सेंटरला भेट देवून थेट कोविड वॉर्डात जावून आढावा घेऊन आपली मत मतांतरे मांडली होती. त्या सर्वांनी प्रशासनाचे कौतुक देखील केले होते, ही शूद्र राजकारण करणाऱ्यांना चपराक असल्याचे बोलले जात आहे.
या सर्व बाबतीत खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केलेली फेसबुक पोस्ट :
कल्याण आणि डोंबिवली महापालिका परिक्षेत्रामध्ये गेले काही दिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या वाढत्या रुग्णसंख्येला वेळेवर उपचार मिळावेत, सर्व गरजू रुग्णांना तात्काळ बेड उपलब्ध व्हावेत, ज्यांना रुग्णालयीन उपचारांची आवश्यकता नाही त्यांना क्वारंटाइन सेंटर्समध्ये ठेवणे शक्य व्हावे, यासाठी महापालिकेकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून डोंबिवली (पू.) येथील सावळाराम क्रीडा संकुलात २०० बेड्सचे अद्ययावत रुग्णालय कार्यान्वित झाले आहे. शीळ-कल्याण रोड येथील पाटीदार भवनमध्ये २०० खाटांच्या रुग्णालयाचे काम पूर्ण झाले आहे तसेच गौरीपाडा, कल्याण (प.) येथील महापालिकेच्या कोव्हिड लॅबचे कामही पूर्ण होत आले असून या दोन्ही सेवा लवकरच जनतेच्या सेवेत दाखल होत आहेत. कल्याण (प.) येथील आर्ट गॅलरीतही ५०० बेड्सच्या रुग्णालयाचे काम प्रगतीपथावर असून लवकरच तेही रुग्णसेवेत दाखल होणार आहे. अनेक खासगी रुग्णालयांनी पुढे येऊन कोरोना युद्धात अगदी पहिल्या दिवसापासून आपले योगदान दिले आहे. आयएमए-कल्याण, आयएमए-डोंबिवली व अन्य डॉक्टर्स संघटना खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. पहिल्या दिवसापासून कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता सेवाकार्यात गुंतले आहेत.
कल्याण – डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी नवनियुक्त असूनही त्यांच्या नेतृत्वाखाली प्रशासकीय यंत्रणा कुठेही कमी पडणार नाही, यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.
रुग्णसंख्या वाढते आहे, हे सत्य आहे, परंतु ती का वाढते आहे, याचा शोध घेऊन त्यावर मात करण्याचा आणि रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याचा आटोकाट प्रयत्न राजकीय नेतृत्व आणि प्रशासकीय यंत्रणा या दोहोंकडून सुरू आहे. सर्व काही योग्य सुरू आहे आणि कुठेही कसलीही कमतरता नाही, असा दावा कोणीच करणार नाही. परंतु, प्रयत्न मात्र अत्यंत प्रामाणिकपणे आणि तळमळीने सुरू आहेत. गेले जवळपास ५ महिने आपण या संकटाशी लढत आहोत. लॉकडाउनमुळे अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला, उत्पन्नावर गदा आली, घरच्या चुली पेटणं मुश्कील झालं. या सर्वांना सरकारने, राजकीय पक्षांनी मदत केली. घरोघरी अन्नधान्य पोहोचवलं आणि चूल पेटती राहील, याची काळजी घेतली. अडल्यानाडल्या प्रत्येकाच्या मदतीला लोक धावून जात होती, अजूनही जात आहेत, कारण संकट अद्याप संपलेलं नाही. कोरोना साथीने आपले दैनंदिन व्यवहार थांबवले असले तरी माणुसकीच्या झऱ्याला कुंपण घालणं मात्र या महामारीलाही शक्य झालेलं नाही आणि हीच आपली या संकटाचा मुकाबला करण्यातली प्रमुख ताकद आहे.
हे सर्व लिहिण्याचं कारण म्हणजे या कोरोना महामारीच्या संकटाचा आपण सर्वजण मिळून धैर्याने मुकाबला करत असतानाही काही मंडळी अनेक पातळ्यांवर क्षुद्र राजकारण करण्यात धन्यता मानत होती खरंतर अजूनही मानत आहेत. या प्रकारच्या साथीच्या संकटाला आपण सारे पहिल्यांदाच सामोरे जात असताना या संकटाच्या विरोधात लढत असताना गेल्या ५ महिन्यांच्या या अथक प्रयत्नांमध्ये यंत्रणांकडून थोड्याफार प्रमाणात कुठेतरी काहीतरी चूक होणार हे अपेक्षित होते. कधी वेळेवर मदत न मिळणं, कधी मिळालेल्या मदतीत कसला तरी अभाव असणं, हे स्वाभाविक आहे. कारण मदत कार्य यंत्रणेत काम करणारी तुमच्या आमच्या सारखीच हाडा मासाची माणसंच तर आहे आणि ते देखील या वैश्विक महामारीला प्रथमच सामोरे जात असून या अभूतपूर्व लढाईत ते स्वत:चा व आपल्या कुटुंबियांचा जीव धोक्यात घालून, प्रचंड अशा मानसिक तणावाचा मुकाबला करत अहोरात्र झटत आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्याकडून कधीतरी एखादी चूक होऊ शकते हे आपण मान्य करणे स्वाभाविक आहे. कधीतरी कुठेतरी रुग्णालयातल्या जेवणात एखादा खडा सापडतो, एखाद्या क्वारंटाइन सेंटरमधली एखादी पोळी कधीतरी अर्धकच्ची राहते. या मानवी चुका आहेत, त्याचबरोबर हजारोंच्या संख्येला पुरे पडेल, अशी व्यवस्था रोजच्या रोज उभारताना येणाऱ्या मर्यादांचाही त्यात वाटा आहे. आपल्या घरात चार पाच जणांचे जेवण बनवतानाही कधीतरी जेवणात खडा लागतो किंवा केस येतो, त्यावेळी आपण आपल्या आईला किंवा बायकोला घराबाहेर हाकलत नाही किंवा तिच्याविरोधात आकाशपाताळ एक करत नाही. परंतु, करोनाच्या या संकटाविरुद्ध एक होऊन लढताना मात्र कधीतरी एखाद्या वेळेस असा अनुभव आला तर काही ठराविक मंडळी त्याविरोधात आकाशपाताळ एक करित आरोप प्रत्यारोप सुरू करताना दिसत आहेत. जेव्हा दिवसरात्र कोरोना संकटाला फ्रंटवर उभे ठाकून लढणाऱ्या व्यक्तींच्या हेतूंवर शंका घेतला जातो, तेव्हा या लढाईत जीवावर उदार होऊन लढणाऱ्यांचं मानसिक खच्चीकरण होत आहे, हे आपण लक्षातच घेत नाही.
याचं ढळढळीत उदाहरण म्हणजे भिवंडी आणि कल्याणच्या सीमेवरील टाटा आमंत्रा येथील क्वारंटाइन सेंटर. कोरोनाची साथ सुरू होताच जिल्हाधिकारी राजेशजी नार्वेकर यांनी या प्रकल्पातील काही इमारती अधिग्रहीत करून तिथे भिवंडी-निजामपूर महापालिका आणि कल्याण-डोंबिवली महापालिका अशा दोन्ही महापालिकांमधील नागरिकांसाठी विभागून व्यवस्था उपलब्ध करून दिली. त्यातून दोन्ही महापालिकांच्या हद्दीतील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला. येथील तीन हजारहून अधिक घरांमध्ये क्वारंटाइन सुविधा करण्यात आली आहे. येथे क्वारंटाइन करण्यात आलेल्या रुग्णांवरील उपचार, त्यांचा चहा, नाश्ता, जेवण, स्वच्छता आदी सर्व व्यवस्था महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. या ठिकाणी अहोरात्र सेवायज्ञ सुरू असून येथे काम करणारी मंडळी आपल्यालाही या रोगाची लागण होईल, आपल्या कुटुंबियांनाही त्रास होईल, याची तमा न बाळगता स्वतःला रुग्णसेवेत झोकून देऊन काम करत आहेत. त्यांच्यावर असलेल्या ताणाची कल्पनाही आपण करू शकत नाही. अशा परिस्थितीत कधीतरी काही त्रुटी राहू शकतात, चुका होऊ शकतात. त्या समजून घेऊन, त्या दुरुस्त करून आपल्याला पुढे जायचं असतं.
परंतु, केवळ राजकारण करण्याच्या हव्यासापोटी सुतावरून स्वर्ग गाठत काही मंडळी सातत्याने टीका करण्यात धन्यता मानत आहेत. चूक जरूर दाखवा, कारण त्यातूनच सुधारणेला वाव मिळत असतो. पण कृपया राजकारण करू नका. कल्याण आणि डोंबिवलीतील काही पत्रकार मंडळींनीच या हीन राजकारण करणाऱ्या मंडळींचा बुरखा फाडण्याचं काम केलंय. त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावेत, तेवढे थोडेच आहेत. या पत्रकार मंडळींनी या क्वारंटाइन सेंटरला भेट दिली. पीपीई किट घालून त्यांनी स्वतः तेथील रुग्णांशी संवाद साधला. एकप्रकारे स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांनी हे काम केलं, त्यामुळे त्यांचंही कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. काय मिळणार होतं त्यांना यातून? वाचकांकडून दुवा की आपल्या व्यवस्थापनाकडून पाठीवर कौतुकाची थाप की पगारवाढ? यातलं काहीही मिळणार नसताना केवळ पत्रकारितेशी इमान राखून सत्याचा शोध घेण्याच्या भूमिकेने त्यांनी या केंद्राला भेट दिली. स्वत:च्या डोळ्यांनी तेथील परिस्थिती पाहिली, अनुभवली, रुग्णांशी संवाद साधला आणि त्यातून जे चित्र त्यांच्या समोर उभं राहिलं, ते त्यांनी लोकांसमोर मांडलं. कौतुकाच्या या चार शब्दांमुळे या केंद्रात अहोरात्र झटणारे डॉक्टर, परिचारिका, सेवक, कर्मचारी, महापालिकेचे अधिकारी आणि आमच्यासारख्या राजकीय कार्यकर्त्यांना देखील निश्चितपणे हुरूप आला आहे. कोरोनाच्या या काळात येणारा प्रत्येक दिवस नवी आव्हाने आणि अधिकाधिक वाईट बातम्या घेऊन येत असताना अशा प्रकारच्या कौतुकाची, दिलासादायक शब्दांची किती आवश्यकता असते, याची कल्पना आपण सगळेच करू शकतो. करोनायोद्ध्यांना आपल्या कौतुकफुलांनी औषधाची मात्रा देणाऱ्या या पत्रकार बंधुभगिनींचे खरोखर मनापासून आभार…
– डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे, खासदार
https://m.facebook.com/story.php?story_fbid=3103971556365765&id=573455786084034
*चुका अवश्य दाखवा,पण शुद्र राजकारण करू नका*या मथळ्याखाली कल्याणचे लोकप्रिय खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी ज्या पोटतिडकीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत,*त्या* खूपच मर्मस्पर्शी व मनाला भेदणाऱ्या आहेत.कारण त्यात विरोधी पक्षाच्या कोत्या मनाच्या लोकप्रतिनिधीबाबत वास्तव चित्र उभं केलं आहे.हिंदीमध्ये कहावत आहे की,*आपको किसीका अच्छा करना नही आता होतो, कम से कम बुरा तो नही करो*.2)खासदारांच्या म्हणण्यानुसार कोरोना ही noval अर्थातच जगाला अपरिचित अशी महामारी असल्याने शासकीय यंत्रणा काही ठिकाणी कमी पडली.तथापि त्या ठिकाणी अधिक ठोस उपाययोजना करून तेथील पोकळी आम्ही भरून काढली,याचे समाधान आहे.आणि लोकांनी, पत्रकारांनी,दूरचित्रवाहिनी व सामाजिक संघटनांनी आमच्या प्रयत्नांचे कौतुक केले.ही आमच्या व प्रशासन यंत्रणेच्या प्रामाणिक प्रयत्नांची पावती आहे.यासाठी खासदार या नात्याने डॉ.शिंदे यांनी सर्वांचे मनस्वी आभार मानले.3) *हाथी गये बाजार,कुत्ते भुके हजार*असं म्हटलं, तर त्यात काही वावगे होणार नाही.एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून माझे म्हणणे असे आहे की, बोंबा मरणाऱ्यांना मारू द्या,आपण आपले कर्तव्य पार पाडत राहायचं.कारण संत तुकाराम महाराज सांगून गेले आहेत की*,निंदकाचे घर असावे शेजारी*ह्या विघ्नकर्ता विरोधी लोकप्रतिनिधींच्या नादी न लागता,सर्वसामान्य लोकांचे जीव कसे वाचतील,यावरच लक्ष केंद्रित करणे,समाज हिताचे आहे.हे पुढारी कोरोनाला भिवून घरात बसले आहेत.अशा भीषण भयावह परिस्थितीतही यांना पाझर फुटत नाही,याचे नवल वाटते.यांना फक्त सत्ता पाहिजे.दुसरे काहीही करायचे नाही.सत्तापिपासू झाल्याने ते मानसिकदृष्ट्या आंधळे झाले आहेत.सत्ता हडपण्यासाठी ते कुठ्ल्याही थरावर जाण्यास तयार आहेत. कोरोना लढ्यात पक्षीय अभिनिवेश बाजूला सारून सत्ताधारी पक्षांना मदत करण्याऐवजी तीन पक्षांचं हे महाविकास आघाडी सरकार कसे अस्थिर होईल,यासाठी अहोरात्र षडयंत्र रचण्यात वेळ व्यतीत करीत आहेत..हे पोटशूळ आलेले लोकप्रतिनिधी. एनकेनप्रकारे विनाकारण कृतिशील सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या नसत्या चुका, उणीवा काढत राहणे,हा एकच धंदा यांच्या वाट्याला राहणे, घृणास्पद वाटते.आमची केंद्रात सत्ता आहे, मग राज्यात का नको,या हव्यासापोटी ही मंडळी कोरोना महामारीतले आपले मतदारांना वाचविण्याचे कर्तव्य सफशेल विसरले आहेत. देव यांना सुबुद्धी देवो,लोकांचे प्राण वाचविण्यासाठी,ज्यांनी त्यांना निवडून दिले आहे.अन्यथा हे सुज्ञ मतदार त्यांना पुढील निवडणुकीत जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत.असो. जो तो आपल्या कर्माचे फळ भोगेल.ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.एकनाथ शिंदे आणि त्यांचे सुपुत्र कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या कोरोना लढ्यातील कार्याला लोकांनी 100 पैकी 100 गुण दिले आहेत.जनमानसाचा कौल त्यांच्या पारड्यात आहे.हीच शिंदे पिता पुत्रा च्या कार्याची फलश्रुती आहे.जय महाराष्ट्र.💐🙏🚩🏹🇨🇮 🕘……. ज्येष्ठ पत्रकार रणवीर राजपूत, गवर्नमेंट मीडिया, म. शा.
टी