| नवी दिल्ली | पालघरमधल्या मॉब लिचिंगमध्ये दोन साधूंची हत्या झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारला अडचणीत आणण्याचं राजकारण झालं होतं. त्यानंतर अवघ्या काही दिवसात उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरात साधूंची हत्या झाल्यानं या प्रकरणावरुन टोलेबाजी सुरु झाली आहे. बुलंदशहरमध्ये झालेल्या दोन साधूंच्या हत्येबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरुन चर्चा करुन चिंता व्यक्त केली.
“अशा अमानुष घटनेच्या विरोधात आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत. ज्याप्रकारे आम्ही अशा प्रकारच्या घटनेत कठोर कायदेशीर कारवाई केली आहे, त्याचप्रकारे तुम्हीसुद्धा कराल आणि दोषींना कडक शिक्षा कराल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शिवाय या घटनांना धार्मिक रंग देऊ नये”, असं आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटरवरुन केलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री @myogiadityanath जी यांच्याशी फोनवर चर्चा करून उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथे घडलेल्या दोन साधूंच्या अमानुष हत्येवरून चिंता व्यक्त केली. अशा अमानुष घटने विरुद्ध आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत.
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) April 28, 2020
पालघरची घटना घडल्यानंतर या प्रकरणात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उद्धव ठाकरेंशी फोनवरुन चर्चा केली होती. पालघर प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न झाल्यानंतर या प्रकरणात अटक करण्यात आलेले १०१ लोकांपैकी एकही मुस्लीम नसल्याचं महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं होतं. याच प्रकरणाला धार्मिक रंग दिल्याच्या आरोपावरुन रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधातही काँग्रेस कार्यकर्त्यांनी एफआयआर दाखल केल्या होत्या.
परंतु उत्तर प्रदेश मध्ये घडलेल्या या प्रकरणावर पालघर प्रकरणावरून आकाश पाताळ एक करणारे भाजप नेते काहीही बोलण्यास तयार नाहीत. यावर ” इतना सन्नाटा क्यू है ” असे म्हणत काँग्रेसचे सचिन सावंत यांनी भाजपला अप्रत्यक्ष टोला देखील लावला आहे. तसेच सोशल मीडियातून योगी इस्तिफा दो हा ट्रेण्ड देखील सध्या झपाट्याने व्हायरल होत आहे.