| मुंबई | राज्यात २१ मे रोजी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. महाविकासआघाडीत कोणा-कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता असताना आता राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांची नावे जवळपास निश्चित झाल्याचे समजते. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे किंवा एखाद्याला प्रदेशाध्यक्ष पद देवून आमदारकी दुसरीकडे देण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीची नावेही निश्चित झाल्याचे कळते. शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि निलम गोऱ्हे यांची नावे यापूर्वीच निश्चित झाली आहेत, भाजपने निष्ठावान ज्येष्ठ नेत्यांना डावलून नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. तर आता फक्त काँग्रेसचे उमेदवार ठरायचे आहेत. त्यात काँग्रेस २ जागांसाठी आग्रही असल्याचे देखील समोर आले होते. त्यामुळे महाविकास आघाडीने सहावा उमेदवार देखील उभा करावा, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. विधान परिषद निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून प्रयत्न सुरु असताना आता काँग्रेसने २ जागांसाठी हट्ट केला तर मग निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे.
सध्याचे संख्याबळ पाहता भाजपचे १०५ आमदार असल्यामुळे चौथी जागा त्यांना मिळू शकते. पण त्यासाठी त्यांना काही अपक्ष आमदारांची देखील मदत घ्यावी लागणार आहे..