एकही आमदार नसलेल्या पुणे जिल्ह्यात शिवसेनेचा आमदार होणार..?
शिवतारे राज्यपाल नियुक्त आमदार होणार.?

| पुणे | सध्या माहाविकास आघाडीत राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत मोठा खल सुरू आहे. विधान परिषद सदस्यांसाठी सत्ताधारी आघाडीतील नेत्यांमध्ये आता रस्सीखेच सुरू झाली आहे. कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याचा पेच अद्याप सुटायचा आहे. तरीही प्रत्येक पक्षातील इच्छुकाने आपल्या आपल्या परीने फिल्डिंग लावण्यास सुरवात केली आहे.

शिवसेनेत सध्या मिलिंद नार्वेकर, वरून सरदेसाई यांच्या नावांची चर्चा सुरू असताना माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनीही आपली विधान परिषेदवर जाण्याची इच्छा पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली आहे.

शिवतारे यांच्या म्हणण्यानुसार आपण लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. माझ्याइतकी राष्ट्रवादीवर टीका कोणीच केली नाही. त्याचा पक्षाला विधानसभा निवडणुकीत उपयोग झाला. त्यामुळे साहजिकच अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत माझ्याविरोधात जंगजंग पछाडले. त्यांच्याविरोधात थेट टीका करणारा मी एकमेव होतो. त्यामुळे माझ्याविरोधात त्यांनी विखारी प्रचार करून माझा पराभव केला, अशी भूमिका त्यांनी आता पक्षश्रेष्ठींकडे मांडली आहे.

याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली आहे.  पुणे जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नसल्याचा मुद्दाही त्यांनी या निमित्ताने पक्षाकडे मांडला आहे. शिवतारे यांच्या या भूमिकेमुळे शिवसेनेकडे आमदारकी साठीची स्पर्धा आणखी तीव्र झाल्याचे दिसून येत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *